अनुसया माळीण बाई, होत्या माझ्या शेजारी
गावभर ओळख त्यांची, भाजीवाल्या आजी
हिरवाहिरवा गार त्यांचा, गावानजीक मळा
मळ्यामध्ये पिकायचा कांदा, भाजी, मुळा
डोईवर घेऊन फिरायच्या, केवढी मोठ्ठी डाल
खुलून दिसे कपाळ त्यांचं, मळवटाने लाल
भाजी घ्या, भाजी म्हणी, घ्या गं कारले दोडके
ताजेताजे तोडून आणले, नाही सडके किडके
कमरेला होती पिशवी, ओळख साऱ्या गावात
माळीणबाई भाजी विके, परवडणाऱ्या भावात
शाळा नव्हत्या शिकल्या, तरी व्यवहाराचं ज्ञान
आजीबाईच्या कर्तृत्वाचा, सारेच करीत सन्मान
बुधवारच्या बाजारातून, विकत आणित भातके
नातवाला खाय म्हणीत, पाहिजे बाबा तितके
कांदा, मुळा, भाजी आणि जपला त्यांनी मळा
आजीबाईची आठवण येता, दाटून येतो गळा
-भानुदास धोत्रे