सासवड शहर ता 28: सासवड येथील म.ए.सो. वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कायदे विषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका विधी सेवा प्राधिकरण, व सासवड, सासवड बार असोसिएशन व म.ए .सो. वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार २८ मार्च रोजी म. ए. सो. वाघीरे विद्यालय, येथे इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक साक्षरता शिबीराचे आयोजत करण्यात आले होते. या वेळी न्यायाधीश एस. के.देशमुख बोलत होते.
यावेळी दिवाणी व फौजदारी न्यायालय, सासवड येथील सह न्यायाधीश एस. के. देशमुख व एम. एस. भरड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कायद्याचा अभ्यास करणे गरजेचे असून कायद्याच्या आभ्यासाने सहजासहजी घडणाऱ्या चुकांना आळा बसेल. त्या आभ्यासाचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होईल. असे न्यायाधीश एस. के. देशमुख यांनी सांगितले. विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी यांनी सासवड बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या कायदे विषयक साक्षरता शिबीराबद्दल कौतुक केले. यावेळी ॲड. पंकज बोरावके, ॲड. महेश बारटक्के, ॲड. महेश जाधव व ॲड. तेजस खाडे यांनी विविध कायद्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यालयातील चित्रकला शिक्षक उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवा, देश वाचवा या विषयावरील काढलेल्या विविध चित्रांची पाहुण्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या सुंदर चित्रांबद्दल पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक केले. मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त व वाघीरे विद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲड. विश्वास पानसे, ॲड. प्रकाश खाडे, ॲड. सुनील कटके, ॲड. सचिन कुदळे, ॲड.ज्योती जगताप,ॲड अशपाक बागवान आदी विधीज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षक शिवहार लहाने यांनी केले. फोटो : सासवड (ता.पुरंदर) येथे पर्यावरण वाचवा, देश वाचवा चित्र दाखविताना विद्यार्थी .