शनिवार दिनांक २९ मार्च २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत यावर्षीच्या बहुआयामी तासिकेचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला. रमणबाग प्रशालेचे नामवंत माजी विद्यार्थी राष्ट्रभक्त युवा मंच चे संस्थापक व वंदे मातरम संघटनेचे पदाधिकारी श्री.वैभव वाघ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.समाजामध्ये कोणताही बदल घडवायचा असेल तर अगोदर स्वतःमध्ये बदल करण्यापासून आरंभ करा असा समाजसेवेचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.आपली रमणबाग शाळा कल्पवृक्षाप्रमाणे असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची इथे उपलब्धता आहे.शाळेतील मित्र व शिक्षकांच्या हृद्य आठवणी त्यांनी जागवल्या.शाळेला दिंडी सोहळा व गणेशोत्सव कार्यक्रमासाठी पालखी भेट देणारे सर्वेश पवार,ओंकार लांडे व सिद्धेश कामठे हे माजी विद्यार्थी सुद्धा अतिथी म्हणून उपस्थित होते. बिकट व प्रतिकूल परिस्थिती वर मात करून यशस्वी कसे व्हायचे हे शाळेने शिकवले असे मंदिर वास्तुशास्त्रज्ञ श्री.सर्वेश पवार यांनी सांगितले.विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तडफदार पोवाडा,बासरी पेटी व सिंथेसायझर वादन,गायन अशा छोट्याखानी ऑर्केस्ट्राची झलक संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली. शालाप्रमुख चारुता प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.हेमंत पाठक यांनी सूत्रसंचालन,रवींद्र सातपुते यांनी प्रास्ताविक,प्रतिभा जक्का यांनी अतिथींचा परिचय, सुवर्णा केदारी यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन आणि दीप्ती डोळे यांनी आभार प्रदर्शन केले.उपमुख्याध्यापक जयंत टोले,पर्यवेक्षिका मंजुषा शेलुकर व अंजली गोरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर व विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.