सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे प्रशाला-संकुल हे पंचक्रोशीतील एक अग्रगण्य शैक्षणिक संकुल आहे. सन १९०६ मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी वाघीरे प्रशालेची स्थापना सासवड येथे झाली. २६ मार्च २०२५ रोजी विद्यालयाला ११९ वर्षे पूर्ण होत असून या वर्धापन दिनानिमित्त विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेची शैक्षणिक प्रगती आणि शाळेमधील विविध अभ्यासक्रमांची उपलब्धता दर्शविणारे एक प्रदर्शन देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये प्रशालेमधील व्यक्तिमत्त्व विकास केंद्र,अटल टिंकरिंग लॅब, एनसीसी, भूगोल, टेक्निकल, क्रीडा विभाग, शाळेच्या शारदा-विहार या वार्षिकाचे मागील अनेक वर्षांचे अंक, शाळेच्या शैक्षणिक उपलब्धी या सर्व विषयांवरील दालनांचा समावेश होता.
या प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी व त्यानंतर झालेला उद्बोधनपर कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि संस्कार भारतीचे कार्यकर्ते नंदकुमार ब्रह्मे, आणि सामाजिक कार्यकर्ते आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना शिक्षणासाठी चांगल्या सोयी देण्यासाठी प्रयत्नशील असलेले माजी विद्यार्थी रमेश पुरंदरे यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते. म ए सो च्या नियामक मंडळाचे सदस्य आणि यशस्वी उद्योजक अजय पुरोहित हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या खेरीज विद्यालयाच्या शाला समितीचे महामात्र सुधीर भोसले, विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्ताराम रामदासी, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत, बाल विकास मंदिर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे , पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा जांभळे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना नागनूर हे सर्व मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे यांनी केले. शाळेच्या देदीप्यमान कारकिर्दीचा त्यांनी आढावा घेतला विद्यालयाचे माजी विद्यार्थी व महाराष्ट्र राज्याचे पूर्वीचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचा शुभेच्छा संदेश त्यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचून दाखवला.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थी सर्वेश लवांडे आणि आर्या पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांतर्फे १९८२ च्या बॅचचे विद्यार्थी प्रमोद म्हेत्रे यांनी विद्यालयाला शुभेच्छा दिल्या. माजी शिक्षकांपैकी श्रीकांत देशपांडे यांनी विद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या प्रमुख भाषणामध्ये रमेश पुरंदरे यांनी विद्यालयाला आजवर तीस लाखापेक्षा अधिक रकमेची मदत रोटरी क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्याचे सांगितले व यापुढेही आम्ही अशीच मदत विद्यालयाला करत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. नंदकुमार ब्रम्हे यांनी आपल्या बालपणीच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला. संस्कारक्षम आणि राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा असा वाघीरे विद्यालयाचा लौकिक असून तो उत्तर वृद्धिंगत होत जावो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणामध्ये अजय पुरोहित यांनी उत्तम वक्तृत्व प्रदर्शित करणाऱ्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर विद्यालयाच्या भावी काळातील विस्तारासाठी माजी विद्यार्थ्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना केले.
माजी विद्यार्थी संजय काटकर, माजी उपमुख्याध्यापक मधुकर हेंद्रे, माजी मुख्याध्यापिका चंद्रसेना मुरकुटे, माजी शिक्षिका स्नेहल देशपांडे इत्यादी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक गणेश पाठक यांनी केले तर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांनी आभार प्रदर्शन केले.