"चिन्मय, तो टी. व्ही. बंद कर बघू आधी. अरे, कधीचा पाहतो आहेस तू. डोळेबिळे दुखत नाहीत का रे तुझे ? टी.व्ही. कधी आणि किती वेळ पाहायचा याचा काही ताळमेळ आहे की नाही ? बंद कर टी.व्ही. आणि पटकन अभ्यासाला बस. वार्षिक परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे ना तुझी ? तरी अजूनही अभ्यासाला सुरुवात केली नाहीस तू. अरे, तहान लागल्यावर विहीर खणून काय उपयोग?", आई काहीशी त्रासूनच चिन्मयला म्हणाली.
"अगं आई, पुढच्या आठवड्यात आहे परीक्षा. अजून अख्खा आठवडा आहे माझ्या हातात. नंतर करतो ना मी अभ्यास. थोडाच वेळ पाहू दे टी. व्ही. फक्त शेवटची दहा मिनिटं. हा बघ, सिनेमा संपतच आला आहे.", चिन्मय आर्जवाने आईला म्हणाला.
चिन्मयची आजी मायलेकाचा हा संवाद मेथीची जुडी खुडताखुडता शांतपणे ऐकत होती. शेवटी आई डोक्याला हात लावत म्हणाली, "आता हद्दच झाली या पोराची. सासूबाई तुम्हीच सांगा समजावून या चिरंजीवांना."
आजी चिन्मयच्या आईला म्हणाली, "शेवटची दहा मिनिटं म्हणाला आहे ना तो. बघू या त्याचं ऐकून. त्यानं आपलं ऐकावं, असं आपल्याला वाटतं ना; मग त्यालाही वाटत असेल की, आपणही त्याचं ऐकावं."
आई म्हणाली, "हा तुम्ही त्याचीच बाजू घ्या. कोणतीही गोष्ट त्याला करायला सांगा. नंतर करतो हे त्याचं उत्तर ठरलेलं; पण नंतरला अंतर असतं हे त्याला कळतच नाही. आता कालचीच गोष्ट बघा. मी काल दुपारी त्याला म्हटलं, चिन्मय बाजारातून दोन लिंबं आणून देतोस का? तर म्हणतो कसा, 'नंतर आणून देतो. आता बाहेर खूप ऊन आहे.' अहो, आज सकाळी त्याला म्हटलं, 'अरे चिन्मय तुझी वह्या, पुस्तकं कशी अस्ताव्यस्त पडली आहेत टेबलावर. ती जरा व्यवस्थित लावून ठेव.' तर हे महाशय म्हणतात, 'नंतर करतो. सिनेमा संपल्यावर. आज रविवार. सुट्टीचा वार म्हणे.'
आता मला सांगा, सुट्टीत इतर मुलं घरात मदत करत नाहीत का ? अभ्यास करत नाहीत का ? पण हे शेंडेफळ टी. व्ही. पाहण्यात गुंग."
आजी हसून म्हणाली, "ठीक आहे गं सुलभा. अवखळ आहे जरा तो. येईल समज त्याला हळूहळू आणि कळेल त्याला त्याची चूक."
आजीचं समजूतीचं बोलणं ऐकून आई ठीक आहे म्हणाली आणि ती स्वयंपाकखोलीत निघून गेली. आजीची आता सगळी भाजी खुडून झाली.
भाजीची देठं घेऊन ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी ती उठली. तिनं कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडलं, तर भपकन घाणेरडा वास आला. कारण ओल्या कचऱ्याचा डबा कचऱ्याने गच्च भरलेला होता. म्हणजे काल चिन्मयला ओला कचरा खाली जाऊन टाकून ये सांगितले होतं, पण त्याने ते काम केलंच नाही. नंतर करतो म्हणाला आणि विसरून गेला. सोसायटीने ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आवाराच्या एका कोपऱ्यात खड्डा खणून त्यात सर्वांनी ओला कचरा टाकायचा आणि त्यापासून खतनिर्मिती करायची. आजीनं भाजीची देठं त्याच कचऱ्याच्य • डब्यात कशीबशी दाबून भरली आणि हात धुतले.
सहज तिचं लक्ष खिडकीतल्या कुंडीकडं गेलं. कुंडीतलं गुलाबाचं रोपटं कोमेजलं होतं. चिन्मयला काल या रोपट्याला पाणी घालायला सांगितलं होतं. 'नंतर घालतो रोपट्याला पाणी' म्हणाला, पण नंतरला पडले अंतर आणि तो रोपट्याला पाणी घालायचं पार विसरून गेला.
आता पाणी न मिळाल्यानं रोपटं एकदम मलूल झालं होतं. आजीला वाईट वाटलं. चिन्मयची कानउघडणी केली पाहिजे. त्याला नीट समजावून सांगितलं पाहिजे, असं तिच्या मनात आलं; पण कसं समजावायचं, याचा ती विचार करू लागली.
दहा मिनिटांनी सिनेमा संपला. चिन्मयने टी.व्ही. बंद केला. तेवढ्यात आजीनं त्याला हाक मारली, "चिन्मय, अरे जरा खिडकीकडे येतोस का?" चिन्मय खिडकीकडे आला. आजीनं त्याला कुंडीतलं रोपटं दाखवलं. पाण्याअभावी मलूल झालेलं.
आजी म्हणाली, "तू या रोपट्याला काल पाणी घातलं नाहीस. आज बघ रोपटं कसं मलूल झालं आहे ते. अरे, आपल्याला जशी तहान लागते. तशीच या झाडालासुद्धा तहान लागते रे.
आपल्याला वेळेवर पाणी मिळालं नाही, तर आपला जीव कसा तहानेनं कासावीस होतो. तसंच झाडाचंसुद्धा असतं." त्या मलूल, कोमजलेल्या रोपट्याकडे पाहून चिन्मयलाही फारच वाईट वाटलं. धावत जाऊन तो मगभर पाणी घेऊन आला आणि त्यानं त्या रोपट्याला पाणी घातलं.
मग आजीनं त्याला ओल्या कचऱ्याच्या डब्याचं झाकण उघडायला सांगितलं. त्यानं डब्याचं झाकण काढताच भपकन घाणेरडा वास त्याच्या नाकात शिरला. डबा कचऱ्यानं गच्च भरलेला दिसला त्याला.
आजी म्हणाली, "कळली का तुला तुझी चूक ? काल हा ओला कचरा तुला आवरातल्या खड्ड्यात टाकायला सांगितला होता. तू म्हणालास 'नंतर जातो' आणि नंतर विसरलास. अरे, या ओल्या कचऱ्यापासून खत तयार केलं जातं. तेच खत आपल्या बिल्डिंगच्या आवारातील झाडांना वापरलं जातं. खतामुळं आणि पाण्यामुळं झाडं जोमानं वाढतात, पण तुझा नंतर काही उगवलाच नाही. कचरा तसाच डब्यात पडून राहिला. आता बघितलंस ना त्या कचऱ्याचा किती घाणेरडा वास सुटला आहे ते. अरे, अशानं रोगराई वाढेल. आपण आजारी पडू. तुझा निष्काळजीपणा केवढा महागात पडेल माहिती आहे? अरे, वेळच्यावेळी काम करण्याची आपल्याला सवय नसेल, तर त्यामुळं आपलंच नुकसान होऊ शकतं. हे कसं कळत नाही तुला. म्हणतात ना, ज्याचा हात मोडेल तो त्याच्याच गळ्यात पडेल."
"आजी चुकलं गं. आता आधी हा कचरा खाली टाकून येतो. केवढा वास सुटलाय." चिन्मय कचऱ्याचा डबा घेऊन पटकन खाली गेला. सगळा कचरा खड्ड्यात टाकून डबा घेऊन घरी आला. त्याला पाहून आजी लगेच म्हणाली, "जा आधी पटकन हातपाय स्वच्छ धुवून ये."
चिन्मयनं बाथरूममध्ये जाऊन स्वच्छ हातपाय, तोंड धुतलं. मग टॉवेलनं तोंड पुसत तो बाहेरच्या खोलीत आजीजवळ आला. आईसुद्धा तिथंच बसली होती. आजी म्हणाली, "बस माझ्याजवळ. तुला ना आज एक गोष्ट सांगते. तालकथा कथाकाव्य. आवडते ना तुला?"
चिन्मयने मानेनंच होकार दिला. आजी तालकथा भारीच सांगते, हे त्याला ठाऊक होतं.
आजी म्हणाली,
एक सरदार घोड्यावर, दूरवर फिरून आला
फिरताना त्याच्या घोड्याचा, नाल निखळून गेला
माझ्या पुढ्यात एवढं काम, वेळ आहे कुणाला केव्हातरी मारू नाल, सरदार मनात म्हणाला घरी येऊन पाहतो तर, राजाचा हुकूम आला रणभूमीवर युद्धासाठी, बोलावले होते त्याला घोड्यावर तो स्वार होऊन, रणभूमीवर आला घोडा मात्र वेगाने, आज पळेनासा झाला नाल नाही खुराला, घोडा हळूच चालला सरदाराचा चाबूक, घोड्याशी खूप बोलला वेग मंदावला घोड्याचा, सरदार मागे राहिला शत्रूच्या हाती सापडून, बंदिवान अखेर झाला
म्हणून कुठल्याही गोष्टीचा, वेळीच विचार करावा
वेळच्या वेळी कामाचा, सतत आग्रह धरावा गोष्ट संपल्यावर नेहमीच टाळ्या वाजवणाऱ्या चिन्मयनं या वेळी मात्र टाळ्या न वाजवता आजीचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "आजी, माझी चूक मला कळलीय गं. मी तुला वचन देतो. आजपासून मी आजचं काम उद्यावर कधीच ढकलणार नाही. वेळीच्यावेळी हातातली कामं करत जाईन."
आई म्हणाली, "अरे, चुकतो तो माणूस. तुला तुझी चूक कळली. वेळेचं महत्त्व तुला समजलं. आणखी काय हवं आम्हांला बाळा."
"आई, खरंच चुकलो गं. तूही मला क्षमा कर. पुन्हा कधीच मी अशी चूक करणार नाही." त्याचे डोळे पाणावले. आईनं मग त्याला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला, तर आजीनं त्याला आवडणारा डिंकाचा लाडू त्याच्या हातावर ठेवला. चिन्मयच्या गालावरची खळी आता पुन्हा खुलली.
-एकनाथ आव्हाड