लहान मुले ही टिपकागदाप्रमाणे असतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व घटनांचे बारकाईने निरीक्षण करीत असतात. आमच्या शाळेत २६ जानेवारी रोजी आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या अकरावीच्या मुलीने लिहिलेले पुस्तक शाळेस भेट दिले. तसेच पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही ,विद्यार्थ्यांनी दर महिन्याला एक असे पुस्तक वाचन केले तर वर्षभरात त्यांची १२ पुस्तके वाचून होतात असे सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मी वर्गात शिकवत असताना मुलांनी पाहुण्यांनी सांगितलेल्या या गोष्टीबाबत चर्चा करायला सुरुवात केली. आपणही आपल्या वर्गासाठी पुस्तक वाचनालय सुरू करूयात का? असा त्यांनी मला प्रश्न विचारला. मग वर्गशिक्षक म्हणून माझेच म्हणणे विद्यार्थ्यांवर न लादता त्याबाबत वर्गातील अन्य विद्यार्थ्यांनाही आपली मते मांडण्यास सांगितले. मग आपले वर्ग वाचनालय सुरू करण्यासाठी आपणच काय काय करू शकतो ,याबाबत छोट्या बालगोपालांमध्ये मध्ये विचारविनिमय करायला सुरुवात झाली.
अखेर सर्व विद्यार्थ्यांनीआणि मी मिळून असा निर्णय घेतला की, जास्त महागाची पुस्तके आपण न आणता कमीत कमी किमतीचे पुस्तके (अगदी दहा रुपयापासून वीस रुपये पर्यंत) आपण आणू तसेच छोटी छोटी पुस्तके जी आपल्याला सहज वाचता येतील , प्रत्येकाने आपल्या आवडीचे असे पुस्तक आणायचे.
मग काय सर्व विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनालयास आवश्यक असणारी पुस्तके भराभर जमा केली. विद्यार्थ्यांपैकीच काही जणांनी कोणी पुस्तके दिली याची नोंद आपल्याकडे ठेवली. बघता बघता चार- पाच दिवसात ५० विद्यार्थ्यांची पुस्तके शाळेत जमा झाली. भाषा दिनानिमित्त आम्ही या वर्ग वाचनालयाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . ऋतुजा गवस मॅडम यांच्या हस्ते केले. मॅडमनी मुलांचे खूप कौतुक केले. तसेच गोष्टींच्या पुस्तकांबरोबरच छोट्या छोट्या कविता वाचनही करा, असे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सौ.ऋतुजा गवस मॅडम ह्यांनी त्यांचे स्वलिखित कवितांचे पुस्तकही वर्ग वाचनालयास भेट म्हणून दिले.असे हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी वर्ग वाचनालय सुरू केले. वर्ग वाचनालय सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मलाही माझ्या या चिमुकल्यांचा खूपअभिमान वाटला.
प्राथमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा