पुस्तक परिचय

06 Sep 2024 11:09:12

 
पुस्तक परिचय

पुस्तक परिचय

प्रकाशन :- श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन, नाशिक

पुस्तकाचे नाव :- गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास

लेखक :- भरत आंधळे (IRS)

मूल्य :- 930 /- रूपये

खडतर सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती नशिबी आल्यानंतरही कठोर परिश्रम करून, मनात जिद्द, चिकाटी ठेवून, अविरत संघर्ष करत युपीएससी परिक्षेत यशस्वी ठरलेले भरत आंधळे म्हणजे सर्वच स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांचे आयडॉलच जणू. प्रत्येक स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्यांसाठी "गरुडझेप - एक ध्येयवेडा प्रवास " हे पुस्तक उपयुक्त ठरावे असे आहे.

नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यातील ठाणगाव या खेडेगावात संपूर्ण निरक्षर असलेल्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची होती. भरत आंधळे यांनी 'गरुडझेप' या पुस्तकामधून त्यांचा जीवनानुभव सांगितला आहे. अत्यंत बिकट परिस्थिती, संयम, चिकाटी यांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. एकूण पाच घटकांमध्ये विभागलेल्या या पुस्तकात भरत आंधळे यांनी त्यांच्या लहानपणीपासूनच्या गोष्टीपासून सुरुवात केली आहे.

आजोबांनी शिक्षकांशी वाद घालून मिळवून दिलेला शाळेचा प्रवेश, जुगाराचे व्यसन असलेले वडील अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शिक्षणासाठी धडपड करणारी व त्यांच्यामागे प्रत्येक वेळेस पहाडासारखी उभी राहिलेली त्यांची आजी व तिचे नातवावरचे प्रेम पाहून मनाला खूप आनंद होतो. " माझा नातू लई मोठा साहेब होणार आहे", हा तिचा विश्वास भरत यांना प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी खूप मोलाचा ठरला.

दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिक येथे आय.टी.आय.मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. कॉलेजच्या शिक्षणाबरोबरच त्यांनी काही दिवस कंपनीमध्येदेखील काम केले व पदवीचे शिक्षण पूर्ण करून कुटुंबातील पहिले पदवीधर ते बनले. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षा देण्याचे ठरवले. अनेक वेळा परीक्षेत नापास होऊनदेखील त्यांनी आपले ध्येय सोडले नाही:

प्रत्येक यशस्वी कहाणीमागे वेदनादायक भूतकाळ असतो...आणि प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते...

हा अत्यंत मोलाचा संदेश या अप्रतिम पुस्तकात दिला आहे. सलग १० वर्षे त्यांनी या स्पर्धा-परीक्षेमध्ये खूप सारे चढ-उतार पाहिले व त्यामधून एक नवीन अनुभव घेतला व शेवटी २०१०मध्ये ते IRS झाले. भरत आंधळे या एका यशस्वी अधिकायामधील जिद्द, चिकाटी, ध्येयाविषयी असणारे वेड या सर्व गोष्टींमध्ये त्यांना सहकार्य करणारी त्यांची आजी, पत्नी, त्यांचे जिवलग मित्र, आदरणीय सर्व शिक्षक यांच्याविषयी त्या पुस्तकांत माहिती दिली आहे.

प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक बनले आहे. या पुस्तकाच्या साहय्याने त्यांचे अनमोल विचार, अनुभव प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचत आहेत. मला या पुस्तकातून श्रम व अपार कष्ट, मेहनत यांची किंमत कळली. आपल्याला काहीतरी करायचे असेल तर आपल्या ध्येयापासून जराही आपण दूर गेलो नाही पाहिजे हा अनमोल विचार मला या पुस्तकातून मिळाला, म्हणूनच मला हे पुस्तक खूप आवडते.

-नागरगोजे कल्याणी बळीराम

१० वी, ई

विद्यामंदिर मांडा टिटवाळा

Powered By Sangraha 9.0