माझी मायबोली मराठी

शिक्षण विवेक    18-Jul-2024
Total Views |


माझी मायबोली मराठी

 

पृथ्वीवर मानवाची उत्पत्ती झाल्यावर एकमेकांमध्ये संवाद साधण्यासाठी ‌‘भाषा‌’ हे माध्यम विकसित झालं नव्हतं. तेव्हा मानव आवाज काढून किंवा हातवारे करून संवाद साधत असावा, असं निरीक्षण नोंदवलं जातं. मात्र, कालांतराने हळूहळू भाषेचा शोध लागला आणि आपण आज बोलतो त्या भाषेची निर्मिती झाली असावी, असं म्हटलं जातं. आज तर जगात अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकी एक भाषा म्हणजे आपली मराठी भाषा. माझी ‌‘माय मराठी‌’!मराठीबद्दल बोलायचं, तर शब्द अपुरे पडतील. भाषा हा शब्द ‌‘भाष्‌‍‌’ या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. भाषा म्हणजे बोलणे, भाषण करणे. भाषा सहजप्रक्रिया असते. भाषा ध्वनीरूप असते. भाषा ही संकेतांनी तयार झालेली आहे. विविध सौंदर्याने नटलेली माझी मायबोली मराठी ही नितांत सुंदर भाषा आहे. मराठी भाषा मुख्यतः महाराष्ट्रात बोलली जाते. मराठी भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी भारतात सर्वांत जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. महाराष्ट्रात ग्रामीण, बोलीभाषा, प्रमाणभाषा अशा विविध स्वरूपात मराठी बोलली जाते. शेकडो वर्षांच्या मराठी भाषेची परंपरा आपल्यापर्यंत आली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कवीश्रेष्ठ मराठीचा गौरव करताना लिहितात...लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठीधर्म, पंथ, जात एक जाणतो मराठीएवढ्या जगात माय मानतो मराठीमराठी भाषेचं सैांदर्य तरी किती आहे बघा! साहित्य, रचना, ओवी, पोवाडे, कविता, लोक, गद्य, पद्य, व्याकरण, गवळण, लोकगीते, कथा, कादंबरी, गाथा, संगीत अशा अनेक पैलूंनी आपली माय मराठी सजली आहे. माझ्या मराठी भाषेचं अक्षरसौंदर्यही वर्णन करावं असं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार वगैरेंनी ती नटली आहे. जणू काही हे सर्व तिचे अलंकारच आहेत.मराठीत विविध प्रकाराचे लिखाण झालेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, आद्यकवी मुकुंदराज, संत तुकाराम , संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास, बहिणाबाई, सखुबाई, दत्तोपंतजी पासोडी अश अनेक संत, महात्म्यांनी मराठी साहित्याची पायाभरणी केली.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर) यांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिन साजरा केला जातो. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची उदंड साहित्यसेवा करून तिला आणखी उंचीवर नेले. मराठी भाषेत अनेक श्रेष्ठ दर्जाचे कवी होऊन गेले आहेत. आजही अनेक नामवंत कवी, लेखक, मराठीत लिहीत आहेत. सरतेशेवटी म्हणावसं वाटतं की,

माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट ,

माझ्या मराठीचा छंद मला नित्य मोहवीत,

ज्ञानोबाची, तुकोबाची, मुक्तेशाची, जनाईची,

माझी मराठी चौखडी रामदास, शिवाजीची.

- श्रीया देशमुख