पाऊलवाटा शोधताना...

शिक्षण विवेक    16-Jul-2024
Total Views |

 

 
पाऊलवाटा शोधताना...
 
 
वाटेलाही प्रश्न पडावा, पाऊलवाटा शोधताना

पावलांनीच उत्तर द्यावे, वाटेवरूनी चालताना॥

   जीवनाच्या ध्येयाकडे मार्गक्रमण करत असताना कितीतरी वाटा आपल्या डोळ्यांसमोर असतात. परंतु, योग्य आणि ध्येयपूर्ती करणारी वाट आपल्याला निवडावी लागते. खरं तर वाट आणि पाऊलवाट यामध्ये किंचित तफावत आपल्याला जाणवते, ती म्हणजे वाट आपल्याला शोधावी लागते आणि पाऊलवाट आपल्या अगोदर कोणीतरी तयार केलेली असते. अशीच एक आपल्या जीवनातील प्रमुख आणि अमीट असणारी ‌‘शाळेची पाऊलवाट‌’. खरं तर आपल्या जीवनाला एक प्रमुख आधार देण्याचं, पावलांना ताकद देण्याचं आणि पंखात बळ देण्याचं काम हीच पाऊलवाट करते. या पाऊलवाटेवरून चालत असताना कितीतरी विषय आपल्याला शिकायला मिळतात आणि त्या विषयांतून आपल्या आयुष्याच्या पुस्तकाची अनेक पाने ज्ञानाने उजळून निघतात. हेच ज्ञान आपल्याला जीवनात उंच भरारी घेण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर वरचेवर प्रगती करत असताना अनेक चांगले विचार आपल्याकडे असणे गरजेचे आहे आणि हेच विचार अंगीकारण्यासाठी संतांच्या पाऊलखुणांवर चालणे आवश्यक ठरते. त्यातीलच महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अहिंसा, चांगली वागणूक, इतरांची मदत अशा कितीतरी बाबींचा समावेश आपल्यात असायला हवा. तेव्हाच आपण इतरांसाठी सद् विवेकाची पाऊलवाट तयार करू शकतो. वाटेपेक्षा पाऊलवाटेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण एकामुळे ती तयार झालेली नसते, ज्या वेळी एकाच वाटेवरून अनेक जण गेलेले असतात तेव्हाच पाऊलवाट तयार झालेली असते. म्हणजेच ज्या विचारांचा जास्तीतजास्त स्वीकार झालेला असतो, तेच विचार आपल्या यशाची गुरुकिल्ली असतात. याच कारणामुळे आपण यशाचे उंच उंच शिखर गाठतो.

पाऊल ही अडखळते, वाटेचा निरोप घेताना

वाटेचे ही नयन भिजावे, पावलांना निरोप देताना

- शांभवी रत्नाकर बोर्डे