5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन

05 Oct 2024 16:52:51

  5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन
5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन
आज पाच ऑक्टोबर आजचा दिवस हा जगातील शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. युनोस्को तर्फे हा दिवस इसवी सन 1994 पासून जगभर सुमारे 100 पेक्षा जास्त देशांमध्ये पाळला जातो. भावी पिढी समर्थ बनविण्यासाठी शिक्षकांना सक्षम बनविणे हा या दिनाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन त्यांना शिकण्यास मदत करणे आणि विद्यार्थी प्रभावीपणे शिकू शकतील आणि शिकतील अशी परिस्थिती निर्माण करणे ही शिक्षकांची भूमिका असते.
शिक्षक हे आपल्या समाजाचे आवश्यक घटक आहेत ते ज्ञानाचा आधारस्तंभ आहेत. आपल्या मुलांचे भविष्य घडवीत आहेत. प्रत्येक मुलांच्या जीवनावर कायम ठसा उमटवणारे आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक किंवा अभ्यासेतर क्रियाकलपामध्येच मार्गदर्शन करत नाही तर मुलांचे भविष्य घडविण्यासाठी त्याला एक चांगला माणूस घडविण्यासाठी शिक्षक देखील जबाबदार असतात. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, चांगली मुल्ये, परंपरा , आधुनिक काळातील आव्हाने आणि त्यांचे निराकरण करण्याचे मार्ग दर्शवितात.
ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळे कळतो
जगातील प्रत्येक देश आपआपले शिक्षक दिन साजरे करतात. पण जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जगात साजरा केला जातो. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी चिरस्थायी विकास साधने, गरिबी नष्ट करणे, शिक्षण, विज्ञान, संस्कृती, जनसंवाद आणि माहिती या माध्यमाद्वारे बौद्धिक संवाद घडवून आणणे हा संयुक्त राष्ट्र संघाचा हेतू आहे.
संयुक्त राष्ट्र संघ जगातील जागतिक स्तरावरची संघटना आहे. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण या क्षेत्रात शिक्षक कार्य बजावतात त्यांचा सन्मान व्हावा यासाठीच जागतिक शिक्षक दिनाची सुरुवात पाच ऑक्टोबर 1994 पासून झाली.
हा जागतिक शिक्षक दिन युनिसेफ, यु एन डी पी, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि एज्युकेशन इंटरनॅशनल या संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला जातो.
शिक्षक दिन साजरा करण्याची कल्पना 19 व्या शतकात अनेक देशात रुजली. इतर अनेक आंतरराष्ट्रीय दिवसापेक्षा भिन्न देश हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा करतात. उदा. अर्जेंटिनाने 1915 पासून ११ सप्टेंबर रोजी डोमिनो फाॅस्टिनो सर्मीएंटोच्या मृत्यूचे स्मरण म्हणून शिक्षक दिन साजरा केला आहे.
तर भारतात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन 5 सप्टेंबर हा यांचा जन्मदिवस 1962 पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. इसवी सन 2022 मध्ये शिक्षक दिन हा आभार दिन म्हणून साजरा करण्यात आला.
इतर देशात वेगवेगळ्या तारखांना शिक्षक दिन साजरा करतात. अलबेनिया देशात सात मार्चला शिक्षक दिन साजरा करतात.
लेबनॉन 9 मार्चला साजरा करतात.
मलेशिया 16 मे ला साजरा करतात चीन 10 सप्टेंबरला साजरा करतात. तैवान 28 सप्टेंबरला साजरा करतात पोलांड 14 ऑक्टोबरला साजरा करतात.
ब्राझील 15 ऑक्टोबरला साजरा करतात.
थायलंड 16 जानेवारीला साजरा करतात.
सिंगापूर एक सप्टेंबरला साजरा करतात.
कोरिया 8 सप्टेंबरला साजरा करतात.
अमेरिकेत मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी शिक्षक दिन साजरा करतात.
तर रशिया पाकिस्तान आणि रूसमध्ये पाच ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा करतात.
तसेच इराणमध्ये दोन मे ला साजरा करतात.
जर्मनीत 12 जूनला साजरा करतात.
शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती, शिक्षक म्हणजे संकटकाळात धैर्य देणारी स्फूर्ती, शिक्षक म्हणजे चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणारा शिल्पकार, शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांची स्वप्ने करतो साकार.
शिक्षकांचे समाजातील स्थान महत्त्वाचे आहे एका पिढीतील ज्ञान व तांत्रिक कौशल्य दुसऱ्या पिढीपर्यंत नेऊन पोहोचविणारा दुवा म्हणजे शिक्षक. शिक्षक केवळ व्यक्तीला मार्गदर्शन करतात असे नाही तर राष्ट्राचे भवितव्य घडवितात म्हणून शिक्षकांनी आपल्यावर असलेली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे. समाजाने देखील शिक्षकांचा योग्य तो आदर आणि सन्मान केला पाहिजे.
सर्व शिक्षकांना जागतिक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
श्रीमती करुणा कुलकर्णी बागले
राष्ट्र सेवा समिती बौद्धिक प्रमुख सेलू
भा शि प्र अंबाजोगाई शाखा सेलू
विवेकानंद प्रा शाळा सेलू.
शालेय समिती अध्यक्षा.
Powered By Sangraha 9.0