आरसा

04 Jan 2024 15:50:47

आरसा
अंतर्वक्र आरसे सलूनमध्ये आणि बहिर्वक्र गाडीवरच उपयोगी असतात. आपण मात्र नेहमी सपाट आरसाच वापरत असतो. कारण आपण खरे कसे आहोत ते तोच दाखवतो, कोणतीही लपवाछपवी न करता. शिक्षकाला तर त्याच्या मनाचा सपाट आरसा कायम जपावा लागतो आणि रोज तो घासून पुसून स्वच्छ करावा लागतो त्यामुळे स्वत:मध्ये झालेले, होत असणारे आणि होऊ शकणारे बदल त्याला व्यवस्थित पाहता येतात.
आज मी आरशावर प्रेम असणार्‍या माझ्या एका शिक्षिका मैत्रिणीबाबत सांगणार आहे. त्या आहेत मृदुला मॅडम. नाजूक चणीच्या, चटपटीत मृदुला मॅडम जिथे जातील तिथे विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच आवडत्या होतात. त्याचं कारण मी वर नमूद केलं आहे. आरशावर प्रेम असणार्‍या मॅडमचा वेषभूषेबाबत नेहमी कटाक्ष असतो. शिक्षिकेला साजेशी; परंतु आकर्षक वेषभूषाकरून त्या जेव्हा वर्गात प्रवेश करतात तेव्हा पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या मनात प्रसन्नता निर्माण होते आणि first impression is the last impression या न्यायाने त्या वर्गातून बाहेर पडेपर्यंत, वर्गात प्रसन्न माहोल भरून राहतो. आपल्या दिसण्यात, चालण्या-बोलण्यात आणि वागण्यातही नेहमी एक तजेला राहावा अशी इच्छा त्या नेहमी बाळगतात आणि त्यासाठी मनात एक आरसा बाळगतात.
हा मनातला आरसा सतत त्यांच्यासोबत असतो आणि त्यात त्या स्वत:ची प्रतिमा सतत न्याहाळत असतात आणि ती सुधारण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. याचं एक उदाहरण मला त्यांच्या वर्गाध्यापनासंदर्भात कायम पाहायला मिळालं. त्या रूजू झाल्या, त्या विज्ञानच्या त्यांच्या पदरात आठवी गणित शिकवण्याचंही दान पडलं. गणित शिकवायला सुरुवात केल्यावर पहिल्यांदा त्या जरा डळमळल्या. पण त्यांच्याजवळ असलेला हा नितळ, सपाट आरसा वापरायला त्यांनी सहजच सुरुवात केली. रोज वर्गातून बाहेर पडल्यावर किंवा मधल्या सुट्टीत वा रिकाम्या वेळात त्यांच्या हातात गणितचं पुस्तक तर असेच, पण सहकार्‍यांशी चर्चेमध्येही आज गणित शिकवताना मला अशीअशी अडचण आली, ही ही समस्या निर्माण झाली हे त्या निखळपणे मान्य करत आणि सहकार्‍यांनी सुचवलेल्या उपायांना आपल्या मनाच्या आरशात तपासून पाहत, योग्य तो उपाय दुसर्‍या तासिकेला वर्गात वापरताना आढळून येत.
सौंदर्य खुलावं म्हणून आरसा वापरणारे अनेकजण मी आजवर पाहिलेत, तुम्हीही पाहिलेले असतीलच. पण अध्यापन कौशल्यात सुधारणा व्हावी म्हणून आपल्या मनात सपाट आरसा बाळगणार्‍या मृदुला मॅडमची एक सुंदर छबी माझ्या मनात रुजली आहे. त्यांच्या मनाचा आरसा दोष मोठे करून दाखवणारा अंतर्वक्रही नाही आणि जुनंपानं उगाळत बसणारा बहिर्वक्रही नाही, ही त्यांची खासियत प्रत्येक शिक्षकाने अंगिकारण्यासारखी आहे हे नक्की.
 
- मेघना जोशी
 
Powered By Sangraha 9.0