गोष्ट गुलाबी डुकराची...

13 Sep 2023 12:58:48

गोष्ट गुलाबी डुकराची...
आज माझ्या घरच्यांनी मला ओळखलंच नाही. मी त्यांच्याजवळ जात होते, तर ते माझ्यापासून सगळे इऽऽऽ, शीऽऽऽ असं म्हणत दूरदूर पळत होते. मला खूप वाईट वाटतं होतं. सारखं मला उचलून मांडीवर बसवणारी लोकं, एकदम असं का वागायला लागली समजतच नव्हतं. मला काय काय आणि किती किती मज्जा सांगायची होती त्यांना आणि ही इना पण माझ्याकडे नुसती बघतंच बसली मगापासून. कोणालातरी तरी दुसर्‍यालाच बघावं असं...
मला किती वाईट वाटलं, राग आला, आश्‍चर्य वाटलं..
पण तुम्हाला प्रश्‍न पडला असेल ना असं कसं झालं? इतकी आवडणारी मीना; पण आज असे का वागतायत लोकं तिच्याशी?
तर कारण हे आहे की, आज मला माझे अजून काही मित्र भेटले, बागेत.. एकदम एक गठ्ठा.. आई आणि तिची पाच पिल्लं. माझ्यासारखी पण गुलाबी गुलाबी. त्यांचं नाव डुक्कर.
हे हे हे कसं आहे, नाव आहे ना त्यांचं. दिसायला पण खूप मजेशीर. छोटेसे डोळे एकमेकांपासून दूरदूर. मोठाले कान आणि umm केलेलं तोंड. umm केलेलं म्हणजे ओठाला ओठ लावून पुढे आलेलं. हा..हा..हा..हा. म्हणजे छोटीशी सोंडच, पण न हलणारी आणि मोठाले पोट असा त्यांचा अवतार.
मी बागेत फुलपाखराशी गप्पा मारत होते, तेव्हा ह्यांची फौज दिसली. लुटुलुटू, चिकटून-चिकटून चालणारी. आई पुढे आणि ही फौज मागे. मग मी पण त्यांच्यात सामील झाले. सहावी होऊन.
मग आमचा फौजफाटा बागेतल्या गेटच्या फटीतून बाहेर पडला. (मी तर नेहमी गेटवर उडी मारून भिंतीच्यावर चढून जाते हळूच रस्त्यावर) पण असू दे. ज्याची त्याची पद्धत.
आमची फौज रस्त्याच्या  कडेकडेनी जात होती, तेव्हा रस्त्यावरच्या शाळेतल्या मुलांना खूपच मज्जा वाटत होती, कारण माझी शेपटी वर आकाशाकडे बघत आणि त्याची गोल कुरळी होऊन, बघत होती. कुणास ठाऊक कुठे.
नुकताच पाऊस पडून गेला होता. त्यामुळे रस्त्यावर सगळा चिखल साठला होता, पाणी पाणी सगळीकडे, मला वाटलं जावं परत घरी. शीऽऽ किती हे पाणी आणि काय हा काळा काळा चिखल. आपलं काम नाही, ह्या घाणीत, पण मग विचार केला की, असं पळून गेलं तर कसं समजणार मला, माझे डुक्कर मित्र काय खातात, काय करतात, कसे राहतात ते.
तर बघताबघता आमचा फौजफाटा अचानक एका डबक्याजवळ जाऊन उभा राहिला. डुक्कर आईने काही तरी हू हू, फु फु करून आम्हांला सांगितलं आणि आम्ही म्हणजे (मी सोडून) सगळे एकदम त्या चिखलात जाऊन बसलो. बसलो काय चक्क लोळलो. मी मात्र बाहेर काठावर उभी, कारण मी शहाणी आहे ना.
पण थोड्यावेळाने त्यांची चाललेली मज्जा बघण्याचा मला कंटाळा आला आणि मी पण त्याच्यात उडी मारली. खरं तर तेव्हा मला कळलं, वेडेपणा करण्यात कसली गंमत असते ते.
त्यातला चौथा होता ना, तो माझ्याशी मग गप्पा मारायला लागला. तो म्हणाला की, ‘मी कशी कोणाच्या घरात राहते, तसे तेही राहू शकतात. म्हणजे अगदी घरात नाही पण अंगणात, बागेत, शेतात म्हणजे तेही पाळीव असू शकतात आणि ते पंधरा ते वीस वर्षे जगतात आणि त्याचं वजन ३५ kg ते ३५० kg असू शकतं.’ मी माझ्या घरातून बाहेर कुठेही गेले, तरी बरोबर माझ्या घरी येऊन पोहोचते. तसंच त्यांना पण खूप पूर्वीच्या गोष्टी आठवत असतात आणि माझ्यासारखाच त्यांना इतरांना राग आला आहे? का ते आनंदात आहेत? का-का आता त्यांना कसलं तरी दुःख झालं आहे? हेही समजतं आणि तेही माझ्यासारखे आपणहून कोणाला त्रास द्यायला जात नाहीत. खरं तर ते खूप लाजाळू असतात. त्यांना solid वासाचं ज्ञान आहे. म्हणजे माणसापेक्षा २000पट अधिक दूरचा वास त्यांना येतो आणि मला माणसापेक्षा १४पट जास्त दूरचा वास जाणवतो. पण मग हे असे चिखलात का बरं लोळत असतील? माझ्यासारखे स्वच्छ का बरं राहत नसतील? त्यांचं कारण की, त्याच्या शरीरातली उष्णता त्यांना जेव्हा त्रास देते तेव्हा ते चिखलात जाऊन लोळतात. म्हणजे ते मग थंड होतात.
आहे की नाही गंमत. मला तर जामच आवडली.
हे सगळं सांगायला धावत पळत घरी आले तर, लोकं अशी वागली माझ्याशी.
अरे बापरे हे कोण आहे, ही मी आहे. इऽऽऽ घाण.
शेवटी बहीण असणं किती छान असतं. इनाने न चिडता मला सगळं चाटून पुसून स्वच्छ करून टाकलं.
- प्रीता नगनाथ
Powered By Sangraha 9.0