कलेतून राष्ट्रभक्ती

कलेतून राष्ट्रभक्ती

शिक्षण विवेक    09-Aug-2023
Total Views |

कलेतून राष्ट्रभक्ती
   मित्र-मैत्रिणींनो, वरील विषयात दोन विषय अंतर्भूत होतात. ते म्हणजे राष्ट्रभक्ती आणि कला. तसे हे दोन्हीही विषय आपल्या जिव्हाळ्याचे, जवळचे. चला तर मग थोडेसे त्याविषयी जाणून घेऊयात. ‘आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत, आपला देश, आपला समाज, आपली परंपरा, आपल्या देशाची संस्कृती, तसेच कला, साहित्य, इतिहास, आपल्या देशाचे भौगोलिक स्थान, निसर्ग याबद्दल आदर बाळगणे, त्यांचे संवर्धन करणे’ म्हणजे राष्ट्रभक्ती होय. ही भावना प्रत्येक भारतीयांच्या मनात असतेच. असायलाच हवी.
आता कला म्हणजे काय? कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी. कला म्हणजे अभिव्यक्ती. यावरुन असे म्हणता येईल की, अभिव्यक्ती जर राष्ट्रभक्तीच्या रुपातून जागृत झाली, विद्यार्थ्यांच्या वर्तनातून, शिक्षणातून ती प्रकट झाली तर या प्रचलित शिक्षणपद्धतीतून एक सुजाण आणि सुशील नगरिक आणि राष्ट्रभक्त नक्कीच निर्माण होतील.
   स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक ऐक्य आणि प्रबोधनातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारे लोकमान्य टिळक द्रष्टे होते. राष्ट्रभक्तीचा वसा जपत-जपत त्यांनी कलेतून जनसामान्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. अजुनही ती परंपरा कायम आहे. दरवर्षी गणेशसजावटीतून आपण विविध समाजोपयोगी संदेश चित्ररूपातून दाखवतो. यासारखे दुसरे राष्ट्रभक्तीचे जिवंत शिक्षण नाही असे मला वाटते. अगदी आपल्या शाळेत साजरे होणार्‍या रोजच्या सण-समारंभातून आपण आपल्या देशाची संस्कृतीच जपतो ना! ही तर आहे कलेतून राष्ट्रभक्ती. खडू, फळा, फलक यांच्या माध्यमातून काढलेली क्रांतीकरकांची चित्रे, त्यातून दिला जाणारा संदेश, लिहीले जाणारे दिनविशेष ही सुद्धा कलेतून व्यक्त होणार्‍या राष्ट्रभक्तीचीच उदाहरणे आहेत.
   शाळाशाळांमधून आयोजित करण्यात येणार्‍या विविध पर्यावरणपूरक स्पर्धा, पथनाट्ये, रांगोळी स्पर्धा यातून अनौपचारीक पद्धतीने राष्ट्राबद्दलची ओढ, आदर याचेच दर्शन होते ना! तसेच संगीत ही अशी शक्ती आहे की, ज्याद्वारे सगळा ताण, तणाव दूर होतो. अशा संगीताचा उपयोग राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी पूर्वीपासून करण्यात आला आहे. विविध राष्ट्रभक्तीपरगीते आपल्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवतात. स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हीच सर्व देशगीते, राष्ट्रगीते, आपल्याला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देत आलेली आहेत. छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहीलेलं वीर सावरकरांचे गीत, ‘हिंदू नृसिंहा’ असो, अथवा समर्थ रामदासांच्या रचना असोत किंवा लतादिदींच्या आवाजातील ‘ए मेरे वतन के लोगो...’ किंवा ‘हिंद की सेना...’ अशी अनेक गीते राष्ट्र शिक्षणाचे मूर्तीमंत उदाहरणे आहेत. तसेच चित्रपट सृष्टीदेखील याबाबतीत मागे नाही. क्रांतीवीर, क्रांती, चायना टाऊन, बॉर्डर यासरख्या अनेक चित्रपटातून राष्ट्रभक्तीचे दर्शन घडते.
अशा प्रकारे विविध कला-प्रकारांतून राष्ट्रशिक्षण घेता येते, देता येते, अनुभवता येते. ‘कला विहीन: साक्षात्पशु: पुच्छविषाणहीन:’ असे म्हणतात. म्हणजे साहित्य, संगीत आणि कला यांचा गंध नसलेली व्यक्तीही शिंगे आणि शेपूट नसलेल्या पशूसारखी असते. तसेच, असे म्हणावेसे वाटते की, साहित्य, संगीत, कला आणि नाट्य यांच्याशिवाय जे शिक्षण मिळते ते देखील तितकेच निरस ठरते.
चला तर मग, आपणही असे नवनवीन उपक्रम कलेच्या माध्यमातून निवडूयात आणि त्यातून राष्ट्रभक्ती जोपासूया!
 
-मुक्ता कौलगुड, सह.शिक्षिका,
सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला, पुणे.