पुस्तकाचे नाव :- मनू माऊ
मुलांना अधिक समजूतदार करणारं पुस्तक.
लहान मुलांसाठीच्या पुस्तकांचं आणि त्यातल्या गोष्टींचं जगच खूप खास असतं. त्यात बोलणारे प्राणी असतात. गाणारे पक्षी असतात. चमचमणाऱ्या पंखांच्या प्रेमळ पऱ्या असतात. मोठमोठ्या राजवाड्यात राहणारे राजपुत्र आणि राजकन्या असतात. अर्थातच या सगळ्या गोष्टी लहान मुलांना खूप खूप आवडतात. पण अनेकदा मोठ्या माणसांना असं वाटतं की गोष्टीत असं काय काय भारी भारी आणि मजेमजेचं असेल तरच ते लहान मुलांना आवडतं आणि कळतं.
पण अस्संच काही नसतं बरं का! मला माहिती आहे, एखादी गंभीर गोष्ट, एखादं अचानक आलेलं संकट, मोठ्या माणसांनाच फक्त समजू शकतील असं वाटणाऱ्या महत्त्वाच्या, समजून घ्यायच्या गोष्टी जर नीट समजावून संगितल्या तर त्या लहानांनासुद्धा व्यवस्थित समजतात. बरेचदा मोठ्यांना सुचणार नाहीत अशा कल्पना मुलांना सुचतात. लहान मुलंदेखील कधीकधी एखाद्या संकटातून मार्ग काढू शकतातच.
मी आज तुम्हाला ज्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे त्या पुस्तकातल्या मनूचं पण अगदी सेम असंच झालं होतं. तिचं लाडकं माऊ, ज्याच्याशी ती रोज खेळायची, दोघे एकत्र खाऊ खायचे, माऊला कुशीत घेऊन मनु झोपून जायची. थोडक्यात अगदी दिवसरात्र एकत्र असणाऱ्या मनु आणि माऊ पैकी माऊ एक दिवस देवाघरी जातो. रोज अवतीभवती वावरणारा माऊ एक दिवस असा अचानक दिसेनासा झाला म्हटल्यावर मनुला अतिशय वाईट वाटतं. खूप खूप रडू येतं.
माऊच्या जाण्याने मनूला खूप सारे प्रश्न पडतात. माऊ कुठे गेला? पण तोच का गेला? आता माऊशिवाय आपण कसं राहायचं? तो कधीतरी परत येईल का? हे आणि असे अनेक. माऊची सतत आठवण येत असते आणि त्या आठवणींनी सारखं रडू येत असतं.
मनू या दु:खातून बाहेर येते का? आईबाबा मनूची समजूत घालू शकतात का? माऊचं जाणं, माऊ आता अपल्याला पुन्हा कधीच प्रत्यक्षात भेटू शकणार नाही हे मनू समजून घेते का? माऊ गेल्यापासून मनूचा हरवलेला आनंद ती पुन्हा शोधू शकते का? त्यासाठी ती काय प्रयत्न करते? हे सांगणाऱ्या गोष्टींचं पुस्तक म्हणजे ‘मनूमाऊ'.
मनूमाऊ हे पुस्तक लिहिलं आहे दीप्ती देवेंद्र यांनी. आणि बरं का दोस्तांनो जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा जसं त्या पुस्तकातले शब्द वाचून आपण गोष्ट समजून घेतो तशीच त्या पुस्तकातली चित्रंदेखील ती गोष्ट आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी मदत करतात. तर या पुस्तकातली अशी छान चित्रं काढली आहेत योगिता धोटे यांनी.
मला खात्री आहे मनूमाऊ वाचताना मनूसारखेच तुम्हीही अधिक समजूतदार होत जाल. पुस्तक नक्की वाचाल ना? आणि हे पुस्तक वाचून तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा हं. आम्ही वाट बघतो आहोत.
पुस्तकाचं नाव : मनूमाऊ
लेखिका : दीप्ती देवेंद्र
चित्रं : योगिता धोटे
प्रकशक : वन झिरो एट लर्निंग प्रा. लि.
किंमत : 185/-