गरिबाचे पोहे

19 Jun 2023 12:57:47

गरिबाचे पोहे
आपण आजपर्यंत सुदाम्याचे पोहे ऐकत आलो आहोत, पण ‘गरिबाचे पोहे' हा शब्द आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत. हा काय प्रकार आहे? हा एक खाद्यपदार्थ आहे आणि तो म्हणजे आपल्या सर्वांनाच परिचित असलेला ‘फोडणीचा भात.' माझी आजी (आईची आई) माझ्यासाठी रोज सकाळी न्याहारी म्हणून मला गरिबाचे पोहे करून देत असे. मी लहानपणापासूनच माझ्या आजीकडे राहत आहे.
केव्हापासून ते आठवत नाही, पण आजी जोपर्यंत स्वयंपाक करत होती, तोपर्यंत रोज सकाळची न्याहारी म्हणून गरिबाचे पोहेच करत होती. सकाळी न्याहारी करायची असते म्हणून त्याची पूर्वतयारी आदल्यादिवशी रात्रीपासूनच आजी करायची. रात्रीच आजी भात करत आसताना थोडा जास्तीचा भात करायची. आजीला सकाळी लवकर उठायची सवय होती.ती रोज सकाळी लवकर उठून झाडलोट आणि सडा-रांगोळी करत असे. आजीला दमा होता तरीपण ती सकाळी लवकर उठून ही कामे करायचीच. त्यानंतर अंघोळ करून लगेच पूजा संपन्न होत असे. हा तिचा नित्य-नियमाचा कार्यक्रम होता. ही सर्व कामे झाल्यावर आजी गरिबाचे पोहे करायची. गरिबाचे पोहे करताना त्यात जास्त काही पदार्थ टाकत नसे. साधीच फोडणी, कांदा आणि थोडे शेंगदाणे घालत होती, पण खूप स्वादिष्ट आणि चवदार होत असे. आमच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींमध्ये फोडणीच्या भाताला गरिबाचे पोहे म्हणूनच ओळखले जाते.
परवा माझ्या बायकोने फोडणीचा भात केला होता. लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी फोडणीचा भात खाल्ला आणि गरिबाच्या पोह्यांची आणि त्याचबरोबर आजीचीही आठवण झाली. आज आजीला जाऊन वर्ष झालं, पण गरिबाच्या पोह्यांच्या रूपात आजीची आठवण कायम स्मरणात राहील.
-सुजित मुगूटकर
Powered By Sangraha 9.0