नेत्राची संवेदनशीलता

शिक्षण विवेक    04-Apr-2023
Total Views |


नेत्राची संवेदनशीलता

नेत्रा कोपर्यात उभं राहून, गाल फुगवून बसली आहे, हे आईने पाहिलं आणि तिला विचारलं, ‘काय गं नेत्रा, गाल फुगवून बसायला काय झालं?’

अहं, मी नाही बोलणार जा!’ नेत्रा म्हणाली. ‘अगं, नेत्रा, तू मला सांगितलं नाहीस तर, मला कळेल कसं?’, आईने विचारलं. नेत्रा म्हणाली, ‘हो, पण मग तू मला बाहेर खेळायला का जाऊ देत नाहीयेस? काल मला एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं. त्याच्या पायाला जखम झाली होती. मला त्याला पाहायला जायचं होतं’, असं म्हणून नेत्रा अजूनच रडू लागली. आई आणि नेत्राचा भाऊ सोहम तिचं रडणं ऐकून बाहेर आले.

आईने नेत्राला खूप समजावलं; पण ती ऐकेल तर शपथ! ती रडतीय हे बघून सोहमने आईला लाडवांची आठवण करून दिली. आईने केलेले लाडू नेत्राला खूप आवडतात, हे सोहमला माहीत होतं. आईने एक लाडू वाटीत घालून नेत्राला दिला. तोवर सोहम आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला. ‘आई, अगं आई ऐक न. आपण ताईला बाहेर जाण्याची परवानगी देऊ या का? तिचा हेतू चांगलाय गं! आई, ते पिल्लू अगदी गोजिरवाणं आहे गं’, असं तो अगदी कळवळून सांगू लागला. आपल्या मुलांचं इतक समजूतदार आणि संवेदनशील असणं आईच्या मनाला भावलं.

आईने दिलेला लाडू नेत्राने अगदी चवीने खाल्ला, पण परत तिचा चेहरा हिरमुसला. शेवटी न राहवून आई पटकन बोलली, ‘जा, त्या पिल्लाला घरी आण. मलमपट्टी कर. दूध दे आणि परत त्याच्या आईकडे पोहोचव’, असं म्हटल्याबरोबर नेत्रा खुदकन हसली. तिने पटकन लाडूवर ताव मारला आणि हातावरील लाडूचे कण खातखातच ती पिल्लापाशी गेली.

- शांभवी जगदीश कुलकर्णी, 9वी,

सिद्धेश्वर विद्यालय मांजलगाव