जीवन घडू दे, अमुचे जीवन घडू दे
यश मिळू दे, आम्हां ध्येय मिळू दे
सूर्य, चंद्र, तार्यांसम जीवन उजळू दे ॥
आशेचे सूर दशदिशांत, दिगंतात निनादू दे
ध्येयाच्या वाटेने आम्हा उंच भरारी घेऊ दे
सूर्य, चंद्र, तार्यांसम जीवन उजळू दे ॥
ध्यास-श्वास, ध्येयाची आस, विश्वासाची साथ
तिमिराला मिटविण्या कर्माची प्रकाशवाट
परिश्रमाचा सार्थ अर्थ आम्हांला कळू दे ॥
निराशेला नसे थारा, हृदयात विजयाचा नारा
मनात नसो कधीही स्वार्थ, अहंकाराचा वारा
या जीवनात जगताना सदा हा जीव घडू दे ॥
नवी वाट, नवी दिशा, नित्य नवानवा विजय
सद्कार्याच्या कर्तृत्वाला सदा मिळो अभय
विश्वात स्नेह, माणुसकीचा आनंद उधळू दे ॥
- राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे, शिक्षक,
डी.ई.एस. सेकंडरी स्कूल, पुणे