भीमदेवाचा आशीर्वाद

शिक्षण विवेक    14-Apr-2023
Total Views |

भीमदेवाचा आशीर्वाद
साठ सत्तर वर्षांपूर्वीची गोष्ट! पुण्याच्या नारायण पेठेतीलकेसरी’वाड्यात सूतिका सेवा मंदिर नावाचा दवाखाना होता. त्या दवाखान्यात अन्नपूर्णाबाई नावाच्या एक कष्टाळू परिचारिका होत्या. त्या मूळच्या सातारा जिल्ह्याच्या पाटस तालुक्यातील गारवडे या खेडेगावच्या; पण 1948मध्ये गांधी हत्येनंतर जी जाळपोळ झाली त्यात त्यांचं घर पूर्णपणेअग्नेय स्वाहा’ झालं. कुटुंब बेघर झालं. पदरी तीन मुलं! करणार काय? अन्नपूर्णाबाई बाहेर पडल्या. भिलवडीला दाईचं प्रशिक्षण घेतलं. मग या दवाखन्यात नोकरी मिळाली. पगार साठ रुपये. थोरला मुलगा हरी! मग तोही वृत्तपत्र टाकून, शिकवण्या करून स्वत:च शिक्षण घेत घराला हातभार लावू लागला. पुण्याच्याच भावे स्कूलमध्ये तो अकरावीत शिकत होता. पहाटे साडेचारला उठून वर्तमानपत्रांची लाईन टाकत होता. शंभर घरी पेपर टाकला की, महिन्याला दहा रुपये मिळायचे. वडीलही आचार्‍याचं काम करत होते.

पुण्यालाच भानुविलास टॉकीजसमोर एका वाड्यात आचार्य ना.वा. तुंगार नावाचे एक शिक्षक राहात होते. ते व्यासंगी, विद्वान होते. त्यांच्याकड हरी रोज टाइम्स ऑफ इंडियाचा अंक टाकत होता. शाळेत अर्धनादारी होती; पण आता फॉर्म परीक्षा जवळ आली होती. त्यासाठीही वेगळे पैसे भरावे लागणार होते.
एक दिवस आचार्य तुंगार एक कागदाचं भेंडोळं हातात घेऊन सकाळी आठ वाजताच त्यांच्या घराबाहेर रस्त्याच्या कडेला उभे असलेले हरीनं पाहिलं, ‘का हो सर, तुम्ही इथे का उभे?’ हरीने कुतुहलाने विचारलं.
अरे माझ्याकडे आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत. त्यासाठी मी उभा आहे.’
तुमच्याकडे? आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर? ते कशासाठी?’
बाबासाहेब बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करीत आहेत. ते बहुतेक धर्मांतर करणार आहेत. बुद्धवाङ्मय पाली आणि अर्धमागधी भाषेत आहे. मी त्यांना हवं असेल ते साहित्य मराठीत नकलून देतो. कारण मला पाली आणि अर्धमागधी भाषा येतात.’
तुंगार सर, माझी आणि बाबासाहेबांची ओळख करून द्या ना’, हरी म्हणाला.
हो नक्की देईन, पण आज नाही. आज मी त्यांना तुझ्याविषयी सांगून त्यांची परवानगी घेऊन ठेवेन. पुढच्या गुरुवारी पुन्हा ते माझ्याकडे याच कामासाठी येणार आहेत. त्या वेळी तुझी भेट घडवून आणतो’, तुंगार सर म्हणाले.
हरीला अजून पेपरची लाईन पूर्ण करायची होती. म्हणून तो थांबला नाही; पण पुढील गुरुवारचं आश्‍वासन त्याला मिळालं होतं. म्हणून तो मनातून आनंदून गेला होता. पुढच्या गुरुवारी सकाळीच हरीने सर्व घरं पूर्ण केली; पण अजून दोन-तीन घरीकेसरी’ टाकायचा राहिला होता. तेवढी घरं नंतर टाकू, बाबासाहेबांची भेट चुकू नये, असा विचार करून तो वाड्याच्या भिंतीला सायकल टेकवून दूर उभा राहिला. तुंगारसरही हातात कागदाचं भेंडोळं घेऊन उभे होतेच.
मोदी गणपतीच्या बाजूने एक काळी मोटार आली. ती मोटार बरोबर तुंगार सरांच्या जवळ येऊन थांबली. गाडीतून एक रुबाबदार, सुटाबुटातील व्यक्ती खाली उतरली. त्यांच्याबरोबर आणखी एक गृहस्थ होते. पहिले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते खासदार पां. ना. राजभोज! हरी काही अंतरावरून बघत होता. तुंगार आणि डॉ. बाबासाहेब यांचं बोलणं चाललं होतं. त्यांची चर्चा संपली. तुंगारांनी बाबासाहेबांना नमस्कार केला आणि डॉ. बाबासाहेबांनीही तुंगारांना अभिवादन केलं. मग तुंगार म्हणाले, ‘बाबासाहेब, मागील भेटीच्या वेळी मी तुम्हाला एका कष्टाळू मुलाविषयी बोललो होतो तो बघा. तिथे उभा आहे. त्याला तुमचं दर्शन हवंय.’
दर्शन? मी काय देव आहे का? ये पुढे’, असं मोठ्या आवाजात हसत बोलून बाबासाहेबांनी त्याला जवळ बोलवलं. पाठीवर कौतुकाची थाप दिली. हरी त्यांच्या पाया पडला. त्याला प्रेमभराने उठवत बाबासाहेबांनी विचारलं, ‘काय करतोस? पेपर टाकतोस ना? छान! असेच कष्ट कर, खूप मोठा हो. तुझ्याकडं आता कोणता पेपर आहे का?’ बाबासाहेबांनी विचारलं.
केसरी आहे सर. देऊ का?’
हो दे. मला केसरी हवाच होता; पण विकत दे’
हरीने बाबासाहेबांना केसरीचा अंक दिला. त्या वेळी केसरीची किंमत दोन आणे होती. बाबासाहेबांनी खिशातून एक रुपयाची नोट हरीला दिली. उरलेले चौदा आणे आदरणीय बाबासाहेबांना परत देण्यासाठी हरीने खिशात हात घातला तर, ‘राहू दे ते चौदा आणे तुझ्याकडेच. त्याची पुस्तकं विकत घे आणि खूप शिक. अशी कष्टाळू मुलं मला खूप आवडतात’, बाबासाहेब कौतुकाने म्हणाले.
बाबासाहेब आणि राजभोज गाडीत बसले. पेरूगेटच्या दिशेने गाडी गेली. हरी आणि तुंगार सर त्या दिशेकडे किती तरी वेळ बघत होते.
तुंगार सर, आज तुमच्यामुळे मला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली. आशीर्वाद मिळाला.’
अरे, भीमदेवाचा आशीर्वाद मिळालाय तुला. आता तुझं चांगलंच होणार’, सर म्हणाले. मग हरीने खरोखरीचइंटरनॅशनल बुक स्टॉल’मध्ये जाऊन चौदा आण्यांची पुस्तकं विकत घेतली. ती त्याची पहिली पुस्तकखरेदी; पण त्यानं ती नोट जाम जपून ठेवली होती. आईला खूप कौतुक वाटलं. वडिलांना आनंद झाला. भावे स्कूलमधील मुले, तुंगार सर आणि शुक्ल सर या आपल्या आवडत्या शिक्षकांनाही हरीनं ती हकिकत सांगितली. नोट दाखवली. सरांनी सगळ्या मुलांसमोर हरीचं कौतुक केलं.
ती एक रुपयाची नोट हरीने मराठीच्या पुस्तकात एक मोरपीस घालून जपून ठेवली होती. भीमदेवाच्या आशीर्वादाचा तो प्रसाद होता. फॉर्मपरीक्षा आली. फी भरायची होती. बरोबर एकच रुपया कमी पडत होता. त्या वेळी हरीने ती नोट वापरली.
पुढे हरी एस.एस.सी. झाला. खूप शिकला. एम.ए., एम. एड., पीएच.डी. झाला. त्याने खूप पुस्तकं लिहिली. डॉ. बाबासाहेबांचही चरित्र लिहिलं. त्या चरित्राला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचाउत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार’ मिळाला. हरी आता डॉ. हरी झाला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधकांनी पीएच.डी. मिळवली. त्यात एक होत्या मुंबईच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य अ‍ॅना फर्नांडिस! त्यांचा विषय होताडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणविचार!’ आणि मार्गदर्शक होते डॉ. हरी!
अशा तर्‍हेने हरीच्या जीवनात भीमदेवाच्या आशीर्वादाने प्रसादाने उत्कर्ष झाला.

- डॉ. न.म. जोशी

तळटीप : या चरित्रकथेचा नायक हरी म्हणजेच स्वतः लेखक डॉ.न.म. जोशी असून, ही सत्यकथा आहे.