चल गं सये शिबिराला!

01 Apr 2023 10:57:14

चल गं सये शिबिराला!
‘‘नेहा लवकर आटप...अन्वी शाळेतून येईल आता.’’, आजी अन्वीच्या आईला म्हणाली. हातातलं काम टाकून अन्वीच्या आईने मोबाईल घेतला आणि अन्वीच्या स्कूल बसचा ट्रॅक बघितला. खरंच अन्वीची बस जवळच आलीय. सोसायटीच्या कोपर्‍यावरच आहे बस. ‘‘घेऊन येते तिला’’, असं म्हणून अन्वीची आई लिफ्टमधून खाली आली. अक्षरश: धावत पळत सोसायटीच्या गेटवर पोहोचते न पोहोचते तोच अन्वीची बस आली. एकमेकांना ‘बायऽऽ बायऽऽ...बायऽऽ बायऽऽ’ असं म्हणत काही मुलं खाली उतरली. त्यात अन्वीसुद्धा होती. बसमधल्या दीदींच्या मदतीनं दप्तर, वॉटरबॅग सावरत हात उंचावत आईकडं आली. आईनं अन्वीचं दप्तर घेतलं. दप्तराचं ओझं नव्हतंच मुळी. कारण परीक्षेचा आज शेवटचा पेपर होता. उन्हाळ्याची मोठ्ठी सुट्टी लागली आहे, हे अन्वीच्या चेहेर्‍यावरच्या आनंदातच कळत होतं. अन्वी अक्षरश: सशासारख्या टुणटुण उड्या मारत चालली होती. पेपर तर चांगला गेलाच होता, पण सुट्टीचा आनंद त्यापेक्षा खूप मोठ्ठा होता.
घरात पोहोचल्यावर अन्वीने जोरात म्हटलं, ‘‘आज्जी, परीक्षा संपली... सुट्टी लागली...’’ आई दप्तर घेऊन आत गेली. अन्वीने शूज काढले, रॅकमध्ये व्यवस्थित ठेवले, मोजे धुण्यासाठी वेगळे ठेवले. हात, पाय, चेहरा साबणाने स्वच्छ धुतला. अन्वी अक्षरश: हवेत तरंगत होती. मंजुळ मैनेसारखी गुणगुणत होती. ‘चल गं सये, चल गं सये शिबिराला’ हे ऐकून आज्जीला हसूच आलं. म्हणाली, ‘‘अगं नेहा, बघ तुझी लेक कोणतं गाणं म्हणतीये, चल गं सखे चल सखे पंढरीला...या गाण्यासारखं म्हणतेय काहीतरी.
नेहा खूप हसली. म्हणाली, ‘‘अगं आई, अन्वी खरंच शिबिराला जाणारे. सुट्टीतल्या शिबिराविषयी परीक्षा सुरू होण्यापूर्वी पालक-शिक्षक सभेत आम्हांला माहिती मिळाली.’’ ‘‘कसलं आहे हे शिबिर?’’, आज्जीने विचारलं. अन्वी जोरात म्हणाली, ‘‘आई, तू नको सांगू. मी सांगणारे सगळं...आधी तू मला वाढ. किती किती खमंग वास येतोय. वॉव! पनीर भुर्जीचा वास येतोय मला... खूप खूप भूक लागली आहे, लवकर वाढ. ए आई, थँक्यू... कारण तू आज सुट्टी घेतलीस. नाहीतर लॅपटॉप आणि कानावर हेडफोन्स असंच चित्र दिसतं. संध्याकाळी बाबा आल्यावर धम्माल करू आपण.’’, अन्वीची चिवचिव सुरूच होती. आज्जी म्हणाली, ‘‘चला जेवायला सुरुवात करा.’’ अन्वीने हात जोडले, खड्या आवाजात ‘वदनीं कवळ घेता’ म्हटलं आणि पहिला घास घेतला पनीर भुर्जीचा... आईनं हळूच गुलाबजामची वाटी अन्वीच्या ताटात ठेवली. अन्वी आनंदानं ओरडलीच! ‘वॉव! गुलाबजाम!!’ आई, आज्जी, अन्वी सगळेच खूप हसले. मस्त जेवण झालं. हात धुताना अन्वी पुन्हा गुणगुणू लागली. चल गं सये चल गं सये शिबिराला...
शिबिरातील या गाण्याविषयी अन्वीने आज्जीला सांगितलं. आई म्हणाली, ‘‘चला परवापासून शिबिराला जायचंय, तयारी करू या. बघू या काय काय लिहून दिलं आहे यादीमध्ये?’’ आज्जी कौतुकानं दोघींकडे पाहत पाहत आपल्या खोलीत वामकुक्षीसाठी निघून गेली.
अन्वीचं शिबिर सुरू झालं. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. एक आठवडाभर शिबिर होतं. अन्वीला घेऊन यायचं काम आज्जीवर सोपवलं होतं.
शिबिराची सुरुवात छानशा प्रार्थनेनं झाली. त्यानंतर शिबिर गीत सर्वांनी म्हटलं, ‘चल गं सये चल गं सये शिबिराला.’ जे गीत शाळेमध्ये अन्वीच्या बाईंनी शिबिराविषयी माहिती देताना सांगितलं होतं. ते अन्वीला खूप आवडलं होतं. मग सर्वांनी आपआपली नावं सांगितली. बाईंनी विचारलं, ‘‘व्यक्तिमत्व म्हणजे काय हे माहीत आहे का तुम्हाला?’’, तर चंदू नावाचा मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘बाई, तुमचं चुकतंय. फळ्यावर तुम्ही चुकीचा शब्द लिहिलाय. व्यक्तिमत्व शब्दात ‘ह’ लिहिलाच नाही तुम्ही! बोलतानाही विसरताय. व्यक्तीमहत्त्व असं असेल ना ते?’’, असं बोलून तो आणि त्याच्या शेजारचा मुलगा फिदीफिदी हसू लागला. बाईंनी न चिडता त्याला खाली बस म्हटलं आणि नीट समजावून सांगितलं. ‘‘व्यक्तिमत्व हा शब्द बरोबर आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून कसे दिसता, कसे वागता, तुमच्यातले गुण, तुम्ही मिळवलेलं ज्ञान, तुमचे छंद, कला हे सगळं मिळून व्यक्तिमत्व तयार होतं, अशा गुणी व्यक्तिमत्वाच्या व्यक्तींचं महत्त्व समाजात आपोआप वाढतं.’’
बाईंनी पुढं सांगितलं की, ‘‘असा व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी या शिबिराचा उपयोग होणार आहे. आता तो उपयोग कोण कसा करून घेतो हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.’’ बाईंनी गट तयार केले. गायन, कथाकथन, अभिवाचन, चित्रकला, हस्तकला आणि खेळ आवडणार्‍या मुलांचे गट तयार केले. पण त्या आधी एकेकाला पुढं येऊन आपली ओळख सांगायला लावली. काय काय आवडतं, छंद कोणते हे सांगतांना सभाधीटपणा किती आहे हे बाईंनी ओळखलं. अन्वीनं तर छंदांची भली मोठ्ठी यादीच सांगितली.
पहिला दिवस खूप मजेत गेला. संध्याकाळी तर गंमतच झाली. तो खोडकर, व्रात्य मुलगा चंदू, त्याचे बाबा आले होते त्याला घ्यायला. ते बाईंना म्हणाले, ‘‘बरं झालं या शिबिरामुळे आमच्या घरात शांतता आहे. नाहीतर या कार्ट्याला सुटी लागली की घरात नुसता उच्छाद मांडतो. आमच्या झोपेचं खोबरं करतो.’’, हे ऐकून सगळे खोखो हसायला लागले. बाई चंदूच्या बाबांना म्हणाल्या, ‘‘असं नका म्हणू. शिबिर म्हणजे मुलांना डांबून ठेवणारा कोंडवाडा नाही, तर मुलांना हसत खेळत फुलवणारा, त्यांच्यातील कलागुणांचा विकास करणारा एक सुट्टीतला उपक्रम आहे. आम्ही चंदूला हस्तकला आवडते म्हणून भरपूर रंगीत कागद दिले. त्याने सुंदर वस्तू केल्या. अगदी मन लावून करत होता तो! तुम्ही मुलांमधला सुप्त गुण ओळखत नाही आणि मुलांवर चिडता. आता बघा चंदू एक गुणी मुलगा आहे असं तुम्ही म्हणाल.’’
शिबिरातून घरी येताना अन्वीनं अभिनयासहीत हा किस्सा आज्जीला सांगितला आणि डोक्याला हात लावून म्हणाली, ‘‘आज्जी, झोपेचं खोबरं होणं म्हणजे काय गं?’’, आज्जी म्हणाली, ‘‘झोप मोडणे, झोपेचा सत्यानाश होणे, तुमच्या नव्या भाषेत झोपेची वाट लागणे. ए अन्वी, उद्या तुम्ही सारे म्हणी वाक्प्रचारांचा खेळ खेळा.’’ अन्वीला आज्जीची आयडिया खूप आवडली. शिबिराचा पुढचा दिवस कधी उजाडतोय असं तिला झालं.
अन्वी उड्या मारत चालत होती आणि गुणगुणत होती, चल ग सये, चल ग सये शिबिरालाऽऽऽ
- डॉ. प्रतिमा जगताप
Powered By Sangraha 9.0