मनाली नावाची एक गोड मुलगी असते. ती शहरात राहत असते. एका नामांकित शाळेत चौथीच्या वर्गात शिकत असते. ती जशी दिसायला सुरेख असते; तशीच ती अभ्यास, खेळ यांतही हुशार असते आणि हरहुन्नरीही असते. तिचा आवाजही चांगला असतो. ती दर वर्षी खूप बक्षिसे पटकावत असे. सर्व जण तिचे खूपच कौतुक करत. तिला या कौतुकाची इतकी सवय झालेली असते की, तिला दुसर्या कोणाचे कौतुक केलेले, कौतुक झालेले आवडत नसे. दुसर्या कोणालाही हुशार, चांगले म्हटलेले सहन होत नसे, तो तिचा दुर्गुणच म्हणा ना.
अजून एक वाईट गोष्ट म्हणजे तिला स्वतःला कोणतीही गोष्ट येत नाही, समजत नाही; असे म्हणायला, मानायला आवडत नसे. आपल्यापेक्षा दुसरे कोणी हुशार असू शकते, हे तिला मान्यच नसे.
तिची आई नेहमी तिला सांगायची, ‘मनाली, तुझ्यापेक्षाही दुसरे कोणीतरी हुशार असू शकते, हे तू मान्य करायला शीक, अगं, सगळ्याच क्षेत्रांत तूच कशी सर्वांत पुढे असशील? तुझ्यापेक्षाही हुशार, प्रवीण, पटाईत मुले असणारच. जी गोष्ट तुझ्यात कमी आहे; तुला येत नाही, ती तू एक पाऊल मागे येऊन शिकत जा, तरच तू पुढे झेप घेऊ शकशील, चार पावले पुढे जाऊ शकशील आणि तुझ्या मेहनती स्वभावामुळे, उत्तम आकलनशक्तीमुळे अव्वल ठरू शकशील; पण तिला ते पटतच नसे. आपल्याला एखादी गोष्ट येत नाही, असे मानायला; म्हणायला तिला लाज वाटत असते, कमीपणा वाटत असतो.
मनालीच्या वडिलांची अचानक शहरातून एका खेडेगावात बदली होते. अर्थात, मनालीलाही तिची शहरातील शाळा सोडून खेड्यातील शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. शहरातील वातावरण वेगळे. शिक्षण, खेळ आधुनिक सोयी यात फरक पडतोच. शहरातील शाळेत असताना शाळा सुटल्यानंतर मनाली रोज शाळेत डॉजबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस खेळत असते, पण तशी सोय तिच्या खेड्यातील नवीन शाळेत नसते. सर्व मुले शाळा सुटल्यानंतर, अभ्यास उरकून, नदीकाठी निवांत पोहायला जात. मनालीही त्यांच्याबरोबर नदीकाठी जाऊ लागली; पण तिला पोहायला येत नसे. रोज ती काठावर बसून वर्गातील मित्र-मत्रिणींचे पोहणे बघत असते.
नदीकाठी गेल्यावर पहिल्याच दिवशी मित्र-मैत्रिणी तिला म्हणतात, ‘‘तुला येते का पोहायला? येत असेल तर उतर ना आमच्याबरोबर पाण्यात, खूप मज्जा येते पोहायला, नाहीतर आमच्याबरोबर असलेले काणेकाका शिकवतील तुला पोहायला, आम्हीसुद्धा आहोतच तुझ्याबरोबर.’’ पण ती सर्वांना सांगते, ‘‘मला येते पोहायला. शिकण्याची गरज नाही, पण सध्या मला जरा कंटाळा आल्यासारखे वाटते, दमल्यासारखे वाटते; म्हणून नाही येत मी पोहायला, मला वाटेल तेव्हा मी उतरीन पाण्यात.’’
मनाली खोटे बोलते. आपल्याला पोहता येत नाही हे सांगायला तिला कमीपणा वाटत असतो, लाज वाटत असते. तिला वाटत असते, आपण सात-आठ दिवस मैत्रिणींचे पाण्यात पोहणे, हात-पाय मारणे नीट पाहिले की, आपल्याला आरामात पोहायला जमेल. मनालीला काही जमणार नाही, अशी कोणतीही गोष्ट असूच शकत नाही.
एके दिवशी शाळा सुटल्यावर दुपारी ती ठरवून एकटीच नदीकाठी पाण्यात पोहायला येते आणि पाण्यात उतरायचे ठरवते. तिच्या मनात असते, ‘‘आज मी एकटीच पाण्यात मैत्रिणींचे पाहिल्याप्रमाणे हात-पाय मारून पाहीन, थोडा सराव करीन आणि उद्यापासून सर्वांबरोबर उतरीन पाण्यात. मला पोहायला जमणार नाही, असे होणे शक्यच नाही. मी सर्वांना दाखवून देईन मला पोहता येते.’’
ती एकटीच नदीच्या पाण्यात उतरते. पाण्यात तरंगण्याचे तंत्र अवगत नसल्याने, हात-पाय नीट न मारता आल्यामुळे तिच्या नाका-तोंडात पाणी जाते. ती पाण्यात गटांगळ्या खाऊ लागते, खूप घाबरते; मदतीसाठी ‘वाचवा,वाचवा’ अशी हाकही ती मारू शकत नाही. मनालीच्या सुदैवाने त्याच वेळेला तिच्या शाळेचे शिपाई रामूदादा सायकलवरून तिथून जात असतात. ते तिला पाण्यात गटांगळ्या खाताना पाहतात. ते आपली सायकल टाकून धावतच तिथे जातात, मनालीला पाण्याबाहेर काढतात, पोटावर झोपवतात, नाका-तोंडातील पाणी काढतात. थोड्या वेळातच तिला बरे वाटू लागते. ते तिला आपल्या सायकलवरून घरी पोहोचवतात. ते तिच्या आईला सांगतात, ‘‘जपा हिला. थोडक्यात वाचली बुडताबुडता. एकटीलाच पाठवत जाऊ नका नदीवर पोहायला, संध्याकाळी सर्व मुलांबरोबरच पाठवत जा. तेव्हा काणेकाका असतात पाण्यात मुलांबरोबर.’’ मनाली खूप घाबरलेली असते.
ती आईच्या कुशीत शिरून रडू लागते. आईला खूप आश्चर्य वाटते. आई म्हणाली, ‘‘अगं मनाली, तू एकटीच कशी काय गेलीस पोहायला नदीकाठी, मला न सांगता आणि तुला कुठे येते पोहता? काणेकाकांनी तुला शिकवले असतेच की पोहायला, काय घाई होती तुला, सगळ्या मुलांबरोबर नाही का जायचे नदीकाठी?’’
मनाली आईला सांगते, ‘‘पहिल्याच दिवशी नदीकाठी गेल्यावर वर्गातील मैत्रिणींनी मला विचारले होते, तुला येते का पोहायला? नाहीतर काणेकाका शिकवतील तुला पोहायला. पण मी त्यांना खोटेच सांगितले मला पोहता येत म्हणून. मला पोहता येत नाही, हे सांगायची मला लाज वाटली आणि कमीपणा वाटला; कारण त्यांना सर्वांना पोहता येते हे मी पाहिले होते. म्हणून मी सात-आठ दिवस त्यांचे पोहणे पाहून, पाण्यावर तरंगणे; हात-पाय मारणे पाहून एकटीच पोहायला गेले. मला वाटले होते, जमेल पोहायला. मी उद्या त्यांना दाखवून देणार होते की, मलासुद्धा तुमच्यासारखे पोहता येते. कारण मी त्यांना तसे सांगितले होते, पण मला नाही जमले.’’
आई तिला म्हणते, ‘‘मी तुला नेहमी सांगत असते की, तुला एखादी गोष्ट येत नसेल, तर तू मान्य करत जा. पण तुला कमीपणा वाटतो. आज जिवावर बेतले असते. थोडक्यात वाचलीस. जर पोहता येत नाही, हे मान्य करून काणेकाकांकडून पोहायला शिकायला सुरुवात केली असतीस, तर ही वेळच आली नसती.’’
मनाली दुसर्या दिवशी सर्व मुलांबरोबर नदीवर जाते आणि काणेकाकांकडून पोहायला शिकायला सुरुवात करते. थोड्याच दिवसांत रोजच्या सरावामुळे ती पोहण्यात तरबेज होते. प्रामाणिकपणे मेहनत करून ती पोहण्याच्या स्पर्धेतही अव्वल ठरते. आयुष्यात चार पावले पुढे जायचे असेल, पुढे झेप घ्यायची असेल, उत्तम यश मिळवायचे असेल, काही अवगत करायचे असेल, तर आधी एक पाऊल मागे घ्यावेच लागते. त्यात कमीपणा, लाज वाटायला नको.
ते एक पाऊल मागे घेणे खूपच महत्त्वाचे आहे, हे मनाली शिकली ते तिला आयुष्यात धडा मिळाल्यानंतर, बुडताबुडता वाचल्यावर.
- रश्मी गुजराथी
9822260779