विज्ञान आपल्या सभोवती

शिक्षण विवेक    28-Feb-2023
Total Views |

 विज्ञान आपल्या सभोवती
 
तापानं आजारी असलेली तनिषा पंधरा दिवसांनंतर प्रथमच शाळेत आली. अभ्यासात हुशार, दिसायला चुणचुणीत असूनही निस्तेज आणि मलूल दिसत होती. वर्गातली सगळी मुलं तिच्या भोवती जमली. ती शाळेत आल्याचा सर्वांनाच आनंद झाला होता. इतर वर्गाची मुलं रोजची कामं करण्यात दंग होती. कुणी झाडांना पाणी टाकत होतं, तर कुणी झाडत होतं. कुणी कागदाचे कपटे, पानगळीनं सर्वत्र पडलेली झाडांची पानं उचलून कचराकुंडीत टाकत होतं.
संक्रांतीबरोबरच शिशिराचं आगमन झालं. प्रजासत्ताकदिन जवळ आल्यामुळे आपली शाळा स्चच्छ, सुंदर दिसायला हवी, यासाठी झाडून सारे कामाला लागले होते. स्वच्छता करता-करताही काही मुलं शिकत होती. झाडांची दहा-दहा पानं जमवून ‘झाला माझा दशक’ असं कौतुकानं मित्राला दाखवत होती. घंटा झाली. मुलं परिपाठाला जमली. वडाच्या विस्तीर्ण वृक्षाखाली प्रार्थनेचे सूर उमटले.
परिपाठानंतर सरांनी पल्स पोलिओ अभियानाबाबत माहिती दिली. ‘येणार्‍या रविवारी आपल्या घरातील, गल्लीतील पाच वर्षांखालील बालकांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओची लस देण्यासाठी आणा बरं का! टी.व्ही.वरील पल्स पोलिओची जाहिरात तुम्ही पाहिली आहे ना?’
‘दो बुँद जिंदगी के।’ असा मुलांचा सामूहिक स्वर उमटला, तेव्हा सर थांबले.
विद्यार्थी वर्गात गेल्यावर शिक्षकही आपापल्या वर्गात गेले. हजेरीनंतर राणे गुरुजींनी तनिषाला जवळ बोलावलं. ती फारच वाळकी आणि हडकुळी दिसत होती. तेव्हा सर म्हणाले, ‘कशी आहे तब्येत? ताप येणं थांबलं का?’
‘हो’, तिचा आवाज खोल गेला होता.
‘दवाखान्यात दाखवलं?’
‘हो सर’, तनिषा.
‘... आणि हे काय आहे?’ तिच्या हाताला बांधलेल्या लाल धाग्याकडे पाहून सर म्हणाले.
‘सर, माझा तापच उतरत नव्हता, मग वाडीतल्या बाबांकडे आई घेऊन गेली. त्यांनी बांधून दिला हा धागा. आई म्हणाली की, तुला बाहेरचं आहे...’
‘बाहेरचं म्हणजे...?’ या प्रश्‍नाचं उत्तर तिला माहीत नव्हतं. वर्गातल्या मुलांच्या नजरा विस्फारल्या होत्या. त्यांच्या नजरांमधील प्रश्‍न पाहून सर म्हणाले, ‘मुलांनो, आजारी पडल्यावर हातात, गळ्यात असे दोरे बांधणं, ही अंधश्रद्धा आहे. ताप का येतो तुम्हाला माहीत आहे का?’
‘आजारी पडल्यावर’, मुलं म्हणाली.
‘हो, बरोबर; पण आपण आजारी का पडतो? आपल्याला ताप का येतो? हे नीट ऐका हं!’
‘आपल्या निरोगी शरीराचे तापमान 37 ते 37.50 सेल्सियस असते. सभोवतालचे तापमान नेहमी बदलत असते, तेव्हा त्या वातावरणाशी जुळवून घ्यायला आपल्या मेंदूमध्ये एक ताप नियंत्रक असतो. तापमानामध्ये 1.50 सेल्सियस एवढा बदल सामान्यपणे होऊ शकतो. यापेक्षा जास्त बदल झालाच, तर आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जंतूंच्या संसर्गावर प्रतिकार म्हणूनही शरीर तापाच्या रूपाने प्रतिसाद देते. जंतूंच्या प्रभावामुळे काही रायायनिक पदार्थ बाहेर पडतात. ज्यांच्यामुळे मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्राचे काम बिघडते व ताप येतो. यावर डॉक्टरांकडे जाऊन ओषध घेणं हाच उपाय आहे. बाबांकडे जाऊन हातात दोरा बांधणं, ही अंधश्रद्धा आहे.’’
‘अंधश्रद्धा म्हणजे काय सर?’ नवीन शब्दामुळे मुलांचे कुतूहल जागे झाले. तेव्हा सर म्हणाले, ‘सभोवताली घडणार्‍या प्रत्येक घटनेमागे वैज्ञानिक कारण असते. ज्या घटनेला कार्यकारणभाव नसतो, तिला आपण अंधश्रद्धा म्हणतो. पूर्वी ‘देवी’ नावाचा रोग देवीच्या कोपामुळे होतो, असा समज होता. देवीच्या रोगावरील लसीचा शोध लागला. रोग नाहीसा झाला. अज्ञान गेलं आणि अंधश्रद्धाही गेली. अंधश्रद्धा या अज्ञानावर आधारित असतात. ज्ञानाच्या प्रकाशात त्या वितळून जातात. म्हणून सर्वांनी ज्ञानाची कास धरली पाहिजे.’
विविध धर्म, जाती, भाषा, चालीरीती, परंपरा यांमुळे भारतात अंधश्रद्धाही जास्त आढळतात. अशा परिस्थितीत विज्ञानाचं वातावरण निर्माण करणे, विज्ञानाने झालेल्या फायद्याचे अवलोकन करणे, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे यासाठी आपण दर वर्षी 28 फेब्रुवारीला ‘विज्ञानदिन’ साजरा करतो.
भारतात आधुनिक विज्ञानाचा पाया घालणार्‍या डॉ.सी.व्ही. रामन या थोर शास्त्रज्ञांनी 28 फेब्रुवारी 1928रोजी प्रकाशशास्त्रातील नवा सिद्धांत मांडला. त्यांच्या याच शोधाला 1930 साली नोबेल पारितोषिक मिळाले.
मुलं कान देऊन ऐकताहेत हे पाहून सरांनी विषय पुढे नेला. ‘..पण फक्त वर्षातून एक दिवस ‘विज्ञानदिन’ साजरा करून चालेल का? नाही तर वर्षातील 365 दिवस आपल्याला का? कसे? अशा शंका निर्माण झाल्या पाहिजेत. आपण प्रश्‍न विचारणारे व्हायला हवं. काजवा का चमकतो? झाडाची पानं का गळतात? तांबडं का फुटतं? पाण्यावर लाटा का निर्माण होतात? पोलिओ का होतो? झाडं जवळजवळ लावली, तर उंच का वाढतात? थंडीच्या दिवसांत तोंडातली वाफ का दिसते? असे अनेक.’
‘तुमच्याही मनात असेच काही प्रश्‍न असतील की नाही?’
‘हो सर, हिवाळ्यात वारंवार लघवी का लागते?’ मनोजच्या या प्रश्‍नाने वर्गाच एकच हशा पिकला.
‘गावातली पाण्याची टाकी उंच का असते?’ - प्रेरणा.
‘डोक्याला मार लागल्यावर टेंगूळ का येते?’ - सोहम.
‘अरे व्वा! असो जेव्हा तुम्ही नेहमी विचार कराल, तेव्हा खरा विज्ञानदिन साजरा होईल. तुम्हाला माहीत आहे का, आपल्याला उन्हाळ्यात खूप घाम येतो. तसा हिवाळ्यात येत नाही. उन्हाळ्यात शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते, तर हिवाळ्यात लघवी वाटे. गावातील प्रत्येक घरात योग्य दाबाने पाणी पोहोचवण्यासाठी पाण्याची टाकी उंच असते. द्रव पदार्थ समपातळीत राहतात हे त्यामागील तत्त्व आहे. अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला विज्ञानातील का व कसे?, मेडिकल जनरल नॉलेज अशा पुस्तकांमध्ये मिळतील बरं का! यासाठी तुम्हाला खूप वाचन, निरीक्षण करावं लागेल.
एखाद्या घटनेमागील विज्ञान जाणून घेणं म्हणजे जिज्ञासा. ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान’ ही घोषणा तुम्ही ऐकली आहे ना?
‘हो’, सर्व मुले.
‘विज्ञानाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र क्रांती घडवली. आज 21व्या शतकातील दुसरे दशक संपत आलं आहे, तेव्हा वैैज्ञानिक उपकरणांनी घराघरांचा ताबा घेतला. मिक्सर, कुकर, ओव्हन, इलेक्ट्रिक रवी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, गिझर अशी अनेक उपकरणे आपण वापरतो. या सर्वांशिवाय आपलं पानही हलत नाही. पण वापर करताना त्यांचं काम कसं चालतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
आपल्याला जाणवो अथवा न जाणवो, विज्ञान तर आपण जगत असतो ना? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञान पाठ सोडत नाही. तर्कसंगत विचार करायला विज्ञानच शिकवते.
निकिताच्या मनात चलबिचल सुरू आहे, तिला काहीतरी सांगायचं आहे, असं सरांच्या लक्षात आलं. ‘हं, बोल निकिता’, राणे सर.
‘सर, जेवताना ठसका लागतो, तेव्हा आई म्हणते की, मामाने आठवण काढली.’
‘बरोबर, असंच समजतात काही लोक; पण बाळांनो, तसं नाही बरं ते! जेवताना बोललं की अन्नाचा कण अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्‍वसनलिकेत जातो. पण हे धोक्याचं असतं म्हणून श्‍वासनलिकेतील हवा त्या कणांना बाहेर ढकलते, तेव्हा आपल्याला ठसका लागतो. अवयवांमधील सुसूत्रतेच्या अभावामुळे ठेच लागते. आपण मात्र कुणीतरी शिवी दिली, असं समजतो. ज्यात आपण स्वतःला निरखून पाहतो तो आरसा, त्यात उमटणारं आपलं प्रतिबिंब हे आणि अशा रोजच्या आयुष्यातील अगणित गोष्टी म्हणजे केवळ विज्ञानच आहे. कमी आहे ती या घटनांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. यशस्वी आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर बुवा-बाबांच्या भूलथापांना तर्कबुद्धीच्या कसोटीवर पारखून घेतलं पाहिजे. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्या ऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनातील विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते, तर हा देश अधिक सुखी झाला असता, असं पु.ल. देशपांडे म्हणत.
- संभाजी पाटील
9405669086