प ...प ...पक्षी

24 Mar 2022 11:51:49

pa...pa...pakshi 
 
छोट्या दोस्तांनो, अक्षरओळख करुन घेताना क ..क.. कमळ, ख..ख..खटारा, असे शिकत असाल ना ? त्याऐवजी क..क..कबूतर, ख..ख..खंड्या ... असे आपल्या पंखवाल्या मित्रांसोबत शिकायचे आहे का? तर मग हे नवे खिसा-पुस्तक तुमच्यासाठी लिहिले आहे वंदना लोखंडे यांनी.
प..प..पक्षी हा त्यांचा आगळावेगळा काव्य-संग्रह आहे. यात त्यांनी बाल-वाचकांना मराठीतील अक्षरांची पक्ष्यांबरोबर ओळख करुन दिली आहे. याबरोबरच अक्षरानुरूप 4 ओळींत त्या त्या पक्ष्याची वैशिष्ट्येही सांगितली आहेत आणि त्या पक्ष्याचे सुंदर प्रकाशचित्रही सोबत आहे.
खरे तर वंदनाताईंना कावळा, चिमणी, पोपट हे नेहमी दिसणारे पक्षी फक्त माहीत होते. एक दिवस खिडकीत आलेल्या एका सुंदर, लांब शेपटीवाल्या पाखराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे कुतुहल जागृत झाले आणि आपल्या परिसरातल्या पक्ष्यांच्या त्या मागेच लागल्या. मग पुस्तके आणून अभ्यास करणे, दुर्बिणीतून निरीक्षण करणे, कॅमेर्‍याच्या सहाय्याने फोटो काढणे सुरु झाले. तशातच एक दिवस कोतवाल पक्ष्याला पाहून --
क..क...कोतवाल आहे मुळी रखवाल
इवल्या इवल्या पिलांची करीत असतो देखभाल
या ओळी त्यांना सुचल्या आणि चारोळींचे बीज मनात रुजले. चारोळी म्हणजे चार ओळींची कविता. पक्ष्यांचे फोटो आणि माहितीच्या चारोळ्या जसजशा वाढू लागल्या, तसे पुस्तकाची कल्पना आकार घेऊ लागली.
सुप्रसिद्ध पक्षीतज्ञ किरण पुरंदरे सर पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात - वंदनाताईंनी पक्ष्यांचे स्वभाव, खोड्या, लकबी यांचे अचूक, शास्त्रशुद्ध वर्णन केले आहे. शास्त्र आणि साहित्य यांची गल्लत न करता तयार केलेल्या चारोळ्या म्हणजे हे पुस्तक ! याहून वेगळी शिफारस कुठली ? शिवाय हे आपल्याला कसे नाही सुचले - असा प्रश्नही पुरंदरे सरांना पडला !
या छोटेखानी पुस्तकातील काही रचना पाहू या --
च..च.. चीरक शेपटीखाली लाल भडक
काळा नर, तपकिरी मादी दगडाखाली घरट्याची वाटी ।
तसेच ,
छ..छ..छोटा निखार पोटावर फुलला जणू अंगार
लांब शेपटी, राखी डोके कपासारखे बांधतो घरटे
पक्ष्यांसाठी कवयित्रीने पुण्याचा परिसर पालथा घातलाच शिवाय पुण्याजवळचे भिगवण तसेच केरळ, सिक्किम, राजस्थानातील भरतपूर इ. अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आणि हवे ते प्रकाशचित्र, माहिती मिळवली. या संग्रहात डावीकडील पानावर पक्ष्याचा फोटो, त्याचे नाव आणि उजवीकडे वर्णनपर चारोळी अशी रचना आहे. अशाप्रकारे 57 अक्षरे आणि 57 चारोळ्या आहेत. तसेच सर्व पक्ष्यांची इंग्रजी नावेही दिली आहेत. या अस्सल सुंदर फोटोंसाठी वंदनाताईंची मुलगी श्रुती आणि मैत्रीण प्रीती सोनजे यांनी मदत केली आहे. अनेक पक्षी आपण पाहिलेले असतात, पण त्यांची नावे माहीत नसतात. या पुस्तिकेमुळे पक्षी नावासह ओळखणे सोपे होईल. माळढोक, पाकोळी, पिंगळा असे नष्ट होण्याच्या मार्गावर असणारे किंवा हुदहुद, स्वर्गीय नर्तक यांसारखे सहसा न दिसणारे पक्षी यात आपल्याला पहायला मिळतात. गिधाड हा निसर्गाचा सफाईकार आहे, शिंजिर हॉवरिंग करण्यात पटाईत आहे, भारद्वाजाचे डोळे नपिता लाल असतात अशा गंमतीशीर माहिती वंदनाताई देतात. भारद्वाज पक्ष्याचे एक नाव नपिता आहे, जे खेड्यातील लोकांनी ठेवले आहे, बरे का! खरोखर या पुस्तिकेच्या प्रत्येक पानात आपण गुंगून जातो.
वंदनाताईंनी शेवटचे अक्षर ज्ञ ची चारोळी लिहिताना
ज्ञ.. ज्ञ.. पक्षीविज्ञान सर्व विज्ञानांचे विज्ञान
सलिम अलींनी दिली जाण पक्षीसंवर्धनाची घेऊ आण। असे लिहून थोर पक्षीतज्ज्ञ सालिम अलींचे स्मरण, त्यांच्या कार्याची दखल, महत्त्व आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.
असे हा सुरेख पक्षी-चारोळी संग्रह आपल्या संग्रही हवाच.
प..प..पक्षी
कवयित्री : सौ. वंदना राजेंद्र लोखंडे.
वंदन पब्लिकेशन, पुणे-16.
 
- स्वाती दाढे 
Powered By Sangraha 9.0