सर सी. व्ही. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 ला आता आपल्याला माहीत असलेल्या त्यांच्या ‘रामन इफेक्ट’ या शोधाची घोषणा केली, ज्याच्यासाठी त्यांना 1930 चा नोबेल पुरस्कार मिळाला. यादिवशी विज्ञान दिवस साजरा करून आपण आपल्या शास्त्रज्ञांचा यथोचित सन्मान करतो; परंतु प्राचीन काळात आपल्या देशात होऊन गेलेल्या कित्येक थोर शास्त्रज्ञांची आपल्याला नावेही माहिती नाहीत. त्यांनी लावलेले शोध, त्यांना असणारी माहिती आपल्यापर्यंत आलेल्या विपर्यस्त इतिहासामुळे अज्ञातच राहिली.
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कोण असे विचारले तर सगळ्यांना आर्यभट्ट आणि फार तर ब्रह्मगुप्त माहिती असतात; पण इ. स. पूर्व 1500 मध्ये लगध नावाचा शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने वेदांग ज्योतिष हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर पाचव्या शतकात आर्यभट्ट पहिला, सहाव्या शतकात वराहमिहीर, इ.स. 600 मध्ये ब्रह्मगुप्त आणि भास्कर पहिला, इ.स. 700 मध्ये लल्ला, इ.स. 880 मध्ये वटेश्वर, इ.स. 932 मध्ये मंजुल, इ.स. 953 मध्ये आर्यभट्ट दुसरा, इ.स. 999 श्रीपती, इ.स. 1000 मध्ये भोजराजा, इ.स. 1114 मध्ये भास्कर दुसरा, इ.स. 1227 मध्ये श्रीधर दुसरा, इ.स. 1376 मध्ये परमेश्वर, ही नावेसुद्धा आपल्याला माहिती नसावीत ना? परकियांनी आपला चुकीचा इतिहास प्रसारित केला आणि सत्य लपवून ठेवले. तुम्ही म्हणाल परकियांनी असे केले तेव्हा आपले लोक का गप्प बसले? तर त्या वेळची परिस्थिती तशी होती असे म्हणता येईल; पण निदान आतातरी ती चूक आपण दुरुस्त करायला हवी ना?
मुलांचीही त्यात काही चूक नाही. त्यांना शिकवल्या जाणार्या गोष्टीच त्यांना माहिती असणार ना! आपल्या प्राचीन ज्ञानाबद्दल जर शाळेपासूनच मुलांना माहिती मिळाली तर त्यांना ते कळेल. आपोआपच आपल्या देशाबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान वाटेल आणि नेमकं हेच त्या वेळी ब्रिटिशांना नको होते, म्हणून त्यांनी आणि अनेक पाश्चात्यांनी प्राचीन भारतीयांना माहिती असलेले ज्ञान दडवून ठेवले. स्वतः मात्र त्याचा सखोल अभ्यास केला. त्यांनी तर असाही जावई शोध लावला होता की शून्याचा शोध हा ग्रीकांनी लावला आहे. भारतीयांना खूप कष्ट घ्यावे लागले आणि खूप दिवस वाट बघावी लागली इतरांना पटवायला की शून्याचा शोध भरतीयांनीच लावला आहे. गुजरातमध्ये एका शिलालेखावर शून्य लिहिलेले सापडले त्यामुळे पाश्चात्यांना ते मानणे भाग पडले. अर्थात त्यांनी मानले तरी बराच काळ त्यांच्या सर्वसामान्यांपासून हे लपवूनच ठेवले होते, अन्यथा त्यांनी भारताला थोरपण बहाल केले असते ना!
आता पाश्चात्यांनी जे विज्ञानात शोध लावले आहेत ते मूळ भारतीयांनी शोधलेल्या गणिताविना अशक्य होते. गणित आणि दशमान पद्धती ही भारताने जगाला दिलेली खूप मोठी देणगी आहे.
सर्व विज्ञानाची राणी असे गणिताला जसे आज समजतात तसेच तीच भावना 3000 वर्षांपूर्वी लगधाने त्याच्या ‘वेदांग ज्योतिष’मध्ये एका श्लोकात व्यक्त केली आहे.
यथा शिखा मयूराणां नागानां मण्यो यथा ।
तद्वद्वेदांग शास्त्राणां गणितं मुर्धनिस्थितम ॥
(मोराच्या डोक्यावर जसा तुरा किंवा नागाच्या डोक्यावर जसा मणी तसेच सर्व वेदांग शास्त्रात गणित अत्युच्च पदी अढळ असते.)
हडप्पा संस्कृती किंवा सिंधू खोर्यातील संस्कृती ही इ.स. पूर्व 2200 च्या सुमारास उदयाला आली. हडप्पा, मोहेंजोदारो, लोथल इत्यादी शहरे त्यात होती. त्या शहरांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सुनियोजित नगररचना. साहजिकच त्यासाठी लागणारी अचूक मापनपद्धती, व्यावहारिक अंकगणित आणि प्रायोगिक भूमिती या गणिती शाखा त्यांना चांगल्या अवगत असल्याशिवाय अशी नगररचना करता येणे शक्य नाही. या ठिकाणच्या उत्खननात वर्तुळ काढण्यासाठी कंपास सदृश्य साधन, कोन मापकासारखे साधन, मोजपट्ट्याचे तुकडे इत्यादी सापडले आहेत. मोजपट्टीतील दोन विशिष्ट बिंदूतील अंतर पाच समांतर रेषांनी विभागले असून या समांतर रेषांच्या प्रत्येक जोडीतील अंतर सर्वत्र अगदी समान आहे. ठिकठिकाणी सापडलेल्या ओळंब्यांचे गोळे 0.05, 0.1, 0 5, 2.5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 अशा प्रमाणात होते. वजन व लांबी यांच्या मापनात दशमान पद्धतीचा अवलंब होत होता हे सरळ सरळ दिसते.
वेदकाळातसुद्धा संख्या पद्धतीचा पाया 10 होता. 10 च्या पायावर आधारित फार मोठ्या संख्यांना विवक्षित नावे दिलेली संस्कृत वाङ्मयात आढळतात. उदाहरणार्थ, यजुर्वेद संहिता (वाजस्नेयी), तैत्तिरीय संहिता (मैत्रायणि) आणि काठक संहिता यामध्ये एक ते परार्धपर्यंत स्थानमूल्ये दिली आहेत. नियुत = 1011 पासून ते तल्लक्षणा = 1053 अशा मोठमोठ्या संख्यांची नावेसुद्धा दिली आहेत. ऋग्वेदात ऋचांची संख्या अशी सांगितली आहे, एकच उदाहरण देते, चत्वारिवाव शतसहस्त्राणी द्वात्रिंशच्चा क्षरसहस्त्राणी = 4,32,000. पायथागोरसच्या आधी शे-दोनशे वर्षे आपल्याकडे तो सिद्धांत माहिती होता. बौधायन आणि आपस्तंभ यांनी तर त्यातली त्रिकुटेपण दिली आहेत, उदा. (3,4,5), (5,12,13), (8,15,17) इत्यादी.
खगोलशास्त्रातही आपण मागे नव्हतो. वर दिलेल्या यादीतील लल्ला याने ठाम प्रतिपादन केले होते की राहू सूर्याला ग्रहण लावत नाही. त्याने ग्रहणाची सुयोग्य शास्त्रीय कारणमीमांसा दिली आहे.
पृथ्वी गोल आहे ही गोष्ट तर आपल्या पुराणातसुद्धा सहजरित्या येऊन जाते, ती गोष्ट कळायला पाश्चात्यांना किती काळ लागला आपल्याला माहितीच आहे.
पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या सायणाचार्यांच्या ऋग्वेदावरील ‘ऋग्वेद संहिता’ या ग्रंथात प्रकाशाच्या वेगासंबंधी उल्लेख सापडतो तो श्लोक असा आहे,
तरणिर्विश्व दर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य।
विश्वमाभासी रोचनम॥
योजनानां शते द्वे द्वे शते द्वे च योजने ।
एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोस्तुते॥
ऋग्वेद संहिता (1-50-4)
अर्थ : हे सूर्या, तुझी गती शीघ्र असल्यामुळे तुझ्यापर्यंतचे अंतर कापणे अवघड आहे. एका निमिषार्धात म्हणजे अर्ध निमिषांत जो 2202 योजने अंतर पार करतो त्या प्रकाशाला माझा नमस्कार असो.
योजना व निमिष यांचे मूल्य वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळे दिलेले आहे. आर्यभट्टांच्या काळात इसवी सन 476 मध्ये एक योजन = 12 किलोमीटर होते. तर दीडशे वर्षानंतर आलेल्या ह्यू एन त्संग त्याच्या भारतभेटीनंतर ली या चिनी एककात एक योजने = 5 मैल = 8 किलोमीटर इतके होते असे लिहितो. इसवी सन 1000 मध्ये अल्बिरूनी त्याच्या इंडिका या ग्रंथात एक योजन = 32000 यार्ड असे नोंदवतो. एका दिवसाचे 1,72,800 निमिष होतात. याचा अर्थ एक निमिष म्हणजे अर्धा सेकंद, 1 यार्ड = 0.9144 मीटर ही मूल्ये गृहीत धरून गणित केल्यास प्रकाशाचा वेग येतो 2.58×108 मीटर/ सेकंद. हा वेग प्रत्यक्षातल्या वेगाच्या खूपच जवळ जातो.
नुकतेच निलेश नीलकंठ ओक यांनी खगोलशास्त्रीय उल्लेखावरून महाभारत युद्धाचा अचूक काळ शोधून काढला आहे आणि तो आहे इ.पु. 5561. सप्तर्षी तारकासमूहातील अरुंधती या वसिष्ठ तार्या जवळच्या छोट्या तार्याच्या पुढे जाण्याचा उल्लेख एके ठिकाणी आला त्यावरून त्यांनी हा कालनिर्णय केला आहे. या उदाहरणावरून आपले पूर्वज किती सूक्ष्म निरीक्षण करत होते ते लक्षात घ्या.
रोहिणी शकट भेद हा असाच एक प्रकार आहे त्याचा उल्लेख आपल्या प्राचीन वाङ्मयात येतो. वृषभ राशीतील वृषभाचे मस्तक उलट्या त्रिकोणाने दाखवले जाते. त्यातील एक कोनावर रोहिणी नावाची तारका आहे. या वृषभाच्या मस्तकातून म्हणजे रोहिणीच्या जवळून शनी किंवा मंगळ हे ग्रह गेले तर रोहिणी शकट भेद झाला असे म्हणतात आणि त्यामुळे पृथ्वीवर महाभयंकर उत्पात होतात, आपत्ती कोसळतात असा प्राचीन समज होता. इ.स. पूर्व 3200 मध्ये असा शकट भेद झाला असल्याचा उल्लेख आढळतो. यावरचे सखोल संशोधन भांडारकर संस्थेच्या ‘बोरी’ या मासिकात वाचायला मिळेल.
मुलांनो, हे सर्व तुमच्या समोर विस्ताराने सांगायचे कारण तुम्ही उद्याचा भारत घडवणार आहात. तुम्हाला आपल्या पूर्वजांची, त्यांनी कमावलेल्या ज्ञानाची, आपल्या उत्तम संस्कृतीची माहिती असणे गरजेचे आहे. तुम्हाला अभिमानच वाटेल असा आपला इतिहास, आपली संस्कृती आणि आपली परंपरा आहे. त्यात मोलाची भर घालून भारताला विश्वगुरू बनवण्याच्या कामी तुमचा हातभार लागायला हवा. आपल्या प्राचीन वाङ्मयाचा मनापासून अभ्यास करा, तुमच्या हाती मोलाचा खजिना लागल्याशिवाय राहणार नाही!