तुम्हाला कविता ऐकायला आवडतात का?आणि कविता म्हणायला?आणि म्हणता म्हणता असं वाटतं का की आपणही कविता लिहावी? नक्कीच वाटत असेल असं तुम्हाला. कविता या छंदबद्ध आणि मुक्त छंद अशा दोन्ही प्रकारच्या असतात. कविता छंदबद्ध होण्यासाठी यमक रचना, नादमय शब्द, अनुप्रास, लय, चाल हे सगळं आवश्यक असतं. कविता हे आपलं व्यक्त होणं असतं त्यासाठी संवेदन शीलता, भावुकपणा हे सगळं आवश्यक आहे. आपण दुसर्या वस्तूच्या,व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेऊन विचार केला पाहिजे. एखाद्या घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टींनी पाहिलं पाहिजे. तुमचं भावविश्व असेल त्यासंबंधी तुम्ही विचार करून लिहायला लागा. कविता हे आपल्या अभिव्यक्तीचे साधन असते.अनेकवेळा कविता लिहिली की आपल्याला बरं वाटतं,काहीतरी खूप साचलय,आणि त्यावर उतारा म्हणून कविता आपोआप लिहिली जाते. कधीकधी एखाद्या प्रसंगासाठी,दिवसासाठी,व्यक्तीसाठी,कविता लिहिली जाते.
आजकाल वॉट्सऍप,फेसबुक,ब्लॉग्स या माध्यमातून कविता लिहिल्या जातात आणि या माध्यमातून कविता वाचल्या सुद्धा जातात. अगदी लहानपणापासून आपण अंगाई गीत,बडबड गीत मग पुढे निसर्ग कविता, प्रेमकविता, सामाजिक आशयाच्या कविता, राष्ट्रभक्ती पर कविता, गझला, पोवाडे आणि बरच ऐकतो आणि लिहितो सुद्धा. कवितेचे हे सारे प्रकार वेगवेगळ्या धाटणीचे असतात.कविता वाचताना ती छंदबद्ध असेल तर तिच्या यमकरचनेनुसर वाचावी लागते.
विडंबन गीत असेल तर त्यातला विनोद लक्षात घेऊन, चारोळी असेल तर तिचा आशय बघून वाचता आलं पाहिजेत.
राष्ट्रभक्ती पर गीत ,पोवाडा,फटका हे प्रकार जोषपूर्ण वाचले पाहिजेत.
उदाहरणार्थ, जयोस्तुते, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशभक्तीपर गीत त्यातले कठीण शब्द आणि योग्य उच्चारासह जोशात गायले तरच ती राष्ट्रभक्ती तनामनात मुरत जाते.
निसर्ग कविता,भावकविता,प्रेमकविता या हळुवार भावना मांडतात त्यामुळे त्या वाचताना त्यातला भाव हरवून चालत नाही.
उदा.पिवळे तांबूस ऊन कोवळे
पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे
वाहूनिया दूर...
ही यमक बद्ध कविता वाचताना आपोआपच अंगात लय येते.
विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, बा.भ.बोरकर, शांता शेळके, फ. मुं.शिंदे,अशोक नायगावकर, सौमित्र, संदीप खरे या मराठीतील दिग्गज कवींनी कविता वाचनाचे जाहीर कार्यक्रम करून कविता सर्वदूर पोचवली. पूर्वी कविता वाचनाचे गेय कार्यक्रम गजानन वाटवे,बबनराव नावडीकर,सुधीर फडके आणि इतरांनीही गायनाच्या अंगाने प्रसिध्द केले. श्रेष्ठ कवी ग.दि. माडगूळकर यांच्या गीतरामायणाचे कित्येक प्रयोग सुधीर फडके,श्रीधर फडके यांनी केले आणि गीतरामायण घराघरात पोचवले. अर्थात ही त्या काळाची गरज आणि अभिरुची होती. काळ बदलला,दृश्य माध्यमे जोरात चालू लागली तरी कविता,गाणी ऐकायला लोकांना आवडतेच आहे.
कविता कशी वाचावी याचे एक तंत्र आहे. प्रासादिक कविता एकदा वाचली की लगेच कळते.मात्र थोडी गंभीर,सामाजिक आशयाची कविता ही दोनदा, तीनदा नीट वाचावी लागते. छंदबद्ध कवितेतील ओळी त्यातल्या अंगीभूत तालाने वाचल्या पाहिजेत.उदा.
माहेराची मौज निराळी
निवांत क्षण मोकळे ॥
माय बाप ते गहिवरलेले
दाटून येती गळे ॥
मुक्त छंदातील कविता वाचायचं वेगळं तंत्र आहे.त्यातल्या ओळींची रचना,त्या कुठे तोडायच्या, कुठल्या ओळी दोनदा म्हणायच्या ही कौशल्ये सरावाने येतात.
एकुणच कविता वाचण्याचा, ऐकण्याचा आनंद काही औरच असतो. कविता ही आपल्या दुःखाला, नैराश्याला, दूर करण्याचा प्रयत्न करते. उत्तम कविता मोजक्या शब्दात खूप मोठा आशय साठवते. कविता हे आपल्या ह्रदयीचे मर्म असते. तल्लख बुद्धी,भावनाशील मन आणि सिद्ध हस्त लेखणी असेल तर उत्तम कविता करता येते.काव्यानंदासारखा दुसरा आनंद नाही.
थोडक्यात काय,
अलगद येती शब्द आतूनी
नवथर ओले
त्या शब्दांनी कविता माझी
उत्सुक बोले!!!!!;
- चारुता शरद प्रभुदेसाई
पुणे,9922751819