गणपतीबाप्पाने मयुरेशाचा अवतार घेतला होता तेव्हाची ही गोष्ट आहे बरं का मुलांनो. या मयुरेशाची नगरी होती मयुरेशपूर. या मयुरेशपुराची ख्याती पार ब्रह्मदेवांपर्यंत पोहोचली. खूप सुंदर नगरी होती. सगळे नागरिक सुखात होते तिथे. इतकी म्हणजे इतकी ख्याती ऐकली ब्रह्मदेवानी की त्यांना जावसंच वाटलं मयुरेशपूर पाहायला. गेले की गुप्त वेषात ते पाहायला तर काय सारेजण गणपतीला म्हणजे मयुरेशाला खूप मान देत होते. त्याला सन्मानाने वागवत होते, त्याची तारीफ करत होते. ब्रह्मदेवाला वाटलं मी तर सृष्टीचा निर्माता आणि माझ्यापेक्षा जास्त्त मान याला, या लंबोदराला. अशी असूया निर्माण झाली आणि ब्रह्मदेवाने मयुरेशपुराचा नाशच करून टाकला. असं इतर कुणाच्या बाबतीत झालं असतं तर तो राजा चिडला असता, युद्ध केलं असतं किंवा निराश झाला असता पण मयुरेश म्हणजे गणपतीबाप्पा यापेक्षा वेगळं वागला तो चिडलाही नाही आणि निराशही झाला नाही. त्याने हे कृत्य ब्रह्मदेवाचं आहे हे ओळखलं आणि त्याने ती नगरी पुन्हा जिद्दीने उभी केली. जशी होती तशी. हाच तर कणखरपणा. जो आपल्याला बाप्पाकडून शिकायचा आहे. कितीही का संकटं येईनात, कितीही का कठीण परिस्थिती येईना, कणखरपणा आणि जिद्द सोडायची नाही. आपल्याला जे हवं ते जिद्दीने प्राप्त करून घ्यायचं निराश होऊन, चिडून किंवा हातावर हात घेऊन राहून काही साध्य होत नसतं.

- मेघना जोशी