दुर्वांकुरच का?

दिंनाक: 30 Aug 2020 13:43:40


मित्रांनो, गणपतीबाप्पाला शमी का वाहतो आपण त्याची गोष्ट काल पाहिली. आज दुर्वा का आवडतात बाप्पाला, याचं कारण आणि बरोबर दुर्वांचा औषधी गुणधर्म लक्षात ठेवण्यासाठीची एक गोष्ट आपण पाहू. यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाची अप्सरा होती. ती नाच करत असताना अचानक यमाने तिचा नाच थांबवला. म्हणून तिलोत्तमेला खूप राग आला. आणि त्याच वेळी अनलासुर नावाच्या एका राक्षसाने तिलोत्तमेची बाजू घेतली. तो म्हणाला, ' हे यमधर्मा, मी अनलासुर, तू तिलोत्तमेला थांबवलेस काय, थांब तुला आता खाऊनच टाकतो.' यावर त्याने एवढा मोठ्ठा आवाज केला की त्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने यम घाबरलाच आणि त्याने तिथून पळ काढला.

इकडे अनलासुर जे मिळेल ते खाऊन टाकू लागला. त्याने काही ऋषीमुनीना खाल्ले आणि चक्क काही देवही खाल्ले. उरलेले देव जीव मुठीत धरून भगवान विष्णुकडे गेले. तोवर अनलासुरही तिथे पोहोचला. त्याला पाहताच विष्णुंचाही धीर सुटला आणि त्यांनी लगेचच श्रीगणेशाला बोलावले. गणपतीबाप्पा आल्यावर अनलासुराने बाप्पाला मुठीत पकडला गिळून टाकण्यासाठी. आणि त्याला तोंडात टाकणार तोच गणेशाने एकदम विराट रूप धारण केले. एवढे विराट की मस्तक स्वर्गात आणि पाय चक्क पाताळात आणि अनलासुराने बाप्पाला गिळण्याऐवजी बाप्पानेच अनलासुराला गिळून टाकले अगदी सबंधच्या सबंध.

पण अनलासुर म्हणजे प्रत्यक्ष आगीचा लोळ. तो पोटात गेला मात्र गणपतीबाप्पाच्या सर्वांगाची आग होऊ लागली. इंद्राने गणेशावर अमृत शिंपडले, विष्णुने त्याला कमळ दिले, वरुणाने पाऊस पाडला, नागाने सावली धरली डोक्यावर पण हाय गणेशाच्या अंगाची आग काही शमेना. शेवटी अठ्ठ्याऐशी हजार ऋषींनी मिळून गणेशाला दुर्वा वाहिल्या आणि काय आश्चर्य आग शमली की त्याच्या शरीराची.

मित्रांनो, पुराणकथांमध्ये अशा अनेक अतिशयोक्तीपूर्ण कथा आढळतात, पण आपण त्यातली अतिशयोक्ती कानाआड करायची आणि लक्षात ठेवायचं की बाप्पाला दुर्वा आवडतात कारण दुर्वा थंड प्रकृतीच्या आहेत आणि याचाच औषधी वापर वैद्यांच्या सल्ल्याने करायचा. काय जमेल ना?

मेघना जाेशी