गणपतीला शमीची पत्री वाहतात माहीत आहे ना तुम्हाला? शमीची गोष्ट आपण आज पाहणार आहोत. पांचाल देशामध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो मोठा झाला वयाने आणि त्याला कुष्ठ आलं म्हणजे त्वचेचा एक आजार झाला. शरीराला पुष्कळ भोकं पडली, त्यातच तो अंध झाला. त्याचे खूप हाल होत होते, त्या वेळी त्याचे आईवडील एकदा अत्रिऋषींकडे गेले आणि आपल्या मुलाची दुर्धर आजाराची बातमी सांगितली. त्यांच्यासमोर गुडघे टेकत त्यांना आर्जवं केली आणि म्हणाले, "आमच्या मुलाच्या या दुर्धर आजारावर काही औषध सुचवा" असे परोपरीने विनवले. ऋषींना त्यांची दया आली आणि त्यांनी सांगितलं गणेशाची उपासना करा आणि मुलाला चतुर्थीच्या दिवशी पूर्ण दिवस शमीवृक्षाखाली त्याला नेऊन ठेवा. त्यांनी त्या प्रकारे उपचार सुरु केले. तो मुलगा प्रत्येक कृष्ण पक्षातील चतुर्थीदिवशी शमी वृक्षाखाली बसून गणपतीची उपासना करू लागला. अशा काही चतुर्थ्या झाल्या आणि त्या मुलाचा आजार पूर्ण पळाला आणि त्याला पूर्ववत दिसूही लागले.

आपणही गणपतीची पूजा करताना त्याला शमीची पत्री वाहतो. पण मुलांनो गणपतीला शमी वाहताना ही गोष्ट लक्षात घेऊन मोठं झाल्यावर तुम्ही किंवा आता कार्यरत असणाऱ्या वैद्यानी शमीच्या या गोष्टीवरून शमीपत्र अशा कोणत्या आजारावर उपयोगी आहे का याचा चिकित्सक अभ्यास तर करता येईल ना. झाला असेल असा अभ्यास तर त्याबाबतही इंटरनेटवरून माहिती मिळवा आणि शोधा बरं.

- मेघना जोशी