गजानन आणि गजासुर

दिंनाक: 28 Aug 2020 15:57:05


गजासुर हा महिषासुराचा मुलगा. देवीने महिषासुराचा वध केलेला आपल्या सर्वांना माहीत आहेच. ह्या वधामुळेच गजासूर खवळला होता. देव व देवींचा द्वेष करीत होता. पितृवधाचा बदला घेण्यासाठी त्याने देवदेवतांचा नाश करण्याचा विडाच उचलला आणि श्री शंकराची उपासना करण्यास सुरुवात केली. यथावकाश शंकर प्रसन्न झाले तेव्हा त्याने 'ब्रह्मांडाचे राज्य आणि ब्रह्मांडामधील कोणत्याही प्राण्याच्या हातून वध होऊ नये असा वर मागितला आणि शंकरानी तो दिलाही. मग काय, गजासुर भयंकर माजला, देवांना मारण्यासाठी अरण्यात गेला. देवांना मारणं काही जमलं नाही पण देव त्याला शरण आले. तेव्हा देवांना म्हणाला, "आपल्या दोन्ही हातांनी आपले दोन्ही कान धरून माझ्या पायावर मस्तक आपटून साष्टांग नमस्कार करण्याचे जर का कबूल केलेत तर तुम्हाला जिवंत ठेवतो आणि हे करण्यासाठी त्या वक्रतुंडालाही आणा. नाही आलात तर पहा, दिवस भरलेच तुमचे." देवांनी हे कबूल केले आणि देव घाबरून गजाननाकडे गेले. देव किती दीन झाले आहेत ते पाहण्यासाठी गजानन म्हणाला, गजासुराने सांगितलाय तसा नमस्कार मलाही करा. तत्क्षणी देवांनी गजाननला पायावर डोकं ठेवत साष्टांग नमस्कार केला.

हे पाहून गणपती लगेच सरसावला आणि देवांसह गजासुराच्या नगरीवर चालून गेला. देवदानवांचे अतिघोर युद्ध सुरू झाले, पण तिथे देवांचे काही चालेना. शेवटी गणपतीबाप्पा स्वत: युद्धासाठी सरसावले आणि त्यांनी गंमतच केले. गजासुर मल्लयुद्धास तयार होत असताना आपल्या बुद्धीच्या आधाराने त्याला विश्वरूप दर्शन घडवले. गजासुर गांगरलाच आणि बुद्धीने एकदम नम्र झाला. तोच बाप्पाला म्हणाला, 'मला परशुने ठार करा म्हणजे मी पापमुक्त होईन' बाप्पाने त्याला होकार भरला. पुन्हा एकदा बुद्धीची शक्तीवर मात.

 

- मेघना जोशी