कथेची गोष्ट

दिंनाक: 23 Mar 2020 16:45:33


सर्वसाधारणपणे कथा म्हणजे गोष्ट असे म्हटले जाते.गोष्ट सांगणे व ऐकणे श्रवणसंस्कार,बोधपर अनुभूती आहे.कथन केली जाते ती कथा.कथा ही श्राव्य तसेच लिखित स्वरूपात असतेच.आजी-आईकडून गोष्ट सांगितली जाते.चिऊ-काऊ, परीकथा,वाघोबा, चल रे भोपळ्या ,चांदोबा मामा,फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट..अशा अनेक कथा आजीआईच्या बटव्यातून निघत.त्यांतून बोध तसेच मायेची ऊबही मिळत होती ...मिळते!
काळ बदलत गेला तसेच कथेचे स्वरूप बदलत गेले.देवकथा,परीकथा,गोष्ट, स्फुट गोष्ट,कथा,लघुकथा,नवकथा,अतिनवकथा,धाडसी,रहस्यमय, विनोदी, वैज्ञानिक कथा अशा विविध स्वरूपात कथेचा विकासक्रम आहे.
पहिली स्वतंत्र लालित्यपूर्ण कथा लिहिण्याचा मान हरिभाऊ आपटे ह्यांच्या 23ऑक्टोबर १८९० साली लिहिलेल्या "डिसेप्सीया" कथेला मिळतो.त्यापूर्वी कथा लिहिली गेली परंतु तिचे स्वरूप भाषांतरीत, रूपांतरित असेच होते.हरिभाऊंच्या कथेने लघुकथेच्या,नवकथेच्या पाऊलखुणा दाखविल्या आणि पुढील काळात एक समर्थ वाङमय प्रकार म्हणून तिचे विकसनही केले.त्यादृष्टीने ते लघुकथेचे जनक ठरतात.
(१८६१ - ६५) अरबी भाषेतील सुरसव चमत्कारिक गोष्टी हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे पुस्तक इतके लोकप्रिय झाले की,त्यानंतर १८८९ पर्यंत चिनी,फारशी,तुर्की, जर्मन भाषांतील पुस्तके रूपांतरीत करण्याची एक प्रथाच निघाली.कृष्णराज प्रभू ह्यांचे "हातिमताई " हे पुस्तक सात भागांत प्रसिध्द झाले.
१८१९ ते १९१० या दोन दशकांत करमणूक मासिकातून हरिभाऊनी ज्या स्वतंत्र मराठी कथा( स्फुट गोष्टी) लिहिल्या त्या कथांनी पुढील कथाकाराना कथेचा एक समृद्ध वारसा दिला.जानेवारी १८९५ मध्ये "मनोरंजन" हे कथेला वाहिलेले मासिक का.
र.मित्र यांनी सुरू केले.का.र.मित्र ह्यांनी काढलेल्या मनोरंजनाची धुरा पुढे "संपूर्ण गोष्ट" लिहिणाऱ्या गुर्जरांनी तसेच ए.पा. रेंदाळकरांनी पुढे चालविली.
तसेच काशीबाई कानिटकर, आनंदीबाई शिर्के,गिरीजाबाई हेळकर,वामनसुता स्रीलेखिका कथालेखन करत होत्या.वामनसुता या टोपणनावाने १९०९ पासून कथालेखन करणारी कथालेखिका त्यांच्या कथातील सरळ कथाशौली,ओघवती भाषाशौली,पात्र चित्रणशौली या विशेषामुळे वाचकांच्या लक्षात राहते.
समाजबदलाचे पडसाद कथालेखनातून दिसून आले.बंदिस्त कथालेखनाच्या वाटा मोकळ्या होत स्त्रीमुक्ती विचार उदयास आल्या.चार भिंतीच्या आतील कोंदणातून वाटा लेखनातून अभिव्यक्त होऊ लागल्या.समाजव्यवस्थथेला पूरक लेखन होऊ लागले.
कथा विविध स्वरूपात आकर आकार घेत आपल्यामोर येत आहे.आताच्या काळात स्रीलेखनाची नवी दृष्टी, शैली आपणास अनुभवायला मिळते.कमल देसाई,मेघना पेठे,उर्मिला पवार,प्रतिमा जोशी,निरजा,मोनिका गजेंद्र गडकरी,गौरी देशपांडे अशा अनेक स्रीलेखिका नी कथेला नवीन आयाम दिले.
कथा ही लहान थोर सर्वांना भावते.कथेमुळे वाचनलेखन संस्कृती समृद्ध होते.हल्ली तर कथालेखन वर्तमानपत्र ह्यात सदर असते.व्यासपीठ उपलब्ध होत आहे.शिक्षण विवेक मासिक अंतर्गत सांगू का गोष्ट स्पर्धा,कथा लेखन,नाट्य,सवांद लेखन स्पर्धा आयोजन करून वाचन लेखन अभिव्यक्ती मिळते.पात्र, सवांद,आशय,बोध -प्रतिभा ह्या सर्वांची सांगड घालत उत्तम कथा आकारास येते.
आपणही कथा वाचनलेखन संस्कृती समृद्ध करूया...
शाळेला सुट्टी आहे. आरोग्याची काळजी घ्या.बाहेर पडू नका.मग आता गोष्ट- कथा लिहा. पालक सोबतीला आहेतच! गोष्ट ऐका व ऐकवाच! बोधपर गोष्टींचा खजिना लुटूया!
                                                           सौ.ऋतुजा रविंद्र गवस.

                                                       विवेकानंद संकुल सानपाडा