अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्यसंस्था व श्री खंडेराय प्रतिष्ठान, बालेवाडी आयोजित २९वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्यसंमेलन २०२० श्री म्हातोबा तुकाराम बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्षपदी प्रा.प्रवीण दवणे हे होते तर स्वागताध्यक्ष श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. गणपतराव बालवडकर हे होते. उद्घाटन योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले.

शनिवारी दि.८ फेब्रुवारी ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. यात संमेलनाध्यक्ष प्रवीण दवणे गणपतराव बालवडकर, ज्ञानेश्वर तापकीर सहभागी झाले.यावेळी डॉ.न.म.जोशी ल.म.कडू अ शोकराव मुरकुटे, राजीव तांबे, महावीर जोंधळे, दादासाहेब भडकवाड, शिरीष चिटणीस व नवचैतन्य हास्य क्लब चे सदस्य उपस्थित होते.

उद्घाटन मा. ज्ञानेश्वर तापकीर यांनी केले.यावेळी पूर्व संमेलनाध्यक्ष डॉ.अनिल अवचट यांची विशेष उपस्थिती होती. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ.संगीता बर्वे यांनी प्रास्ताविक केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रवीण दवणे यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यमच आपण मुलांपासून हिरावून घेत आहोत. आज मुलांना कोणतीच भाषा धड बोटं येत नाही कारण आजी हि संस्थाच घरातून गायब झाली आहे. मुलांच्या भावजीवनात भाषा पेरली तर त्यांची मुले भक्कम होतील.

लहान मुलांचे निरागस भावनाविश्व कुमारवयातले त्यातील बदल तंत्रज्ञानाच्या व समाज माध्यमांच्या विळख्यात अडकलेले त्यांचे बालपण या व अशा  सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारे त्यांचे भाषण सर्वांना मार्गदर्शन करणारे ठरले.

 

भोजनानंतरच्या सत्रात रेणू गावस्कर व माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ‘हासती, नाचती, खेळती मुले जिथे’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता मेहेंदळे यांनी केले.

यानंतर विद्यार्थी कवी-कवयित्रींचे कविसंमेलन झाले. अध्यक्षपदी बाळ पोतदार हे होते. पुणे व  आसपासच्या परीसराबरोबरच  बीड औरंगाबाद परभणी फलटण कल्याण संगमनेर अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आशयघन कविता सादर केल्या. त्यांना उपस्थितांनी मनापासून दाद दिली. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन फारुख काझी यांनी केले.

दुसऱ्या दिवशी रविवारी ९ फेब्रुवारीस सकाळच्या सत्राची सुरुवात संमेलनाध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांच्या मुलाखतीने झाली. त्यांच्याशी श्रीकांत चौगुले यांनी संवाद साधला. तर विद्यार्थी संवादक संतोष जाधव व कल्पना सदाफुले यांनीही या मुलाखतीत दवणे यांच्याशी संवाद साधला.

यानंतरच्या सत्रात ‘ऐका माझी गोष्ट’ हा मुलांच्या कथाकथनाचा व भाषणांचा कार्यक्रम झाला.

अध्यक्षपदी  ज्योतिराम कदम होते. यात सातारा नांदेड मुंबई पुणे आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन अनिता येलमाटे यांनी केले.

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मा. शंकर सरडा, डॉ.संगीता बर्वे, बबन शिंदे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. मुलांसाठी काम करण्यात वेगळा आनंद मिळतो व कोणतीही मदत करण्यास मी तयार आहे असे ते म्हणाले. 

भोजनानंतरच्या सत्रात ‘सुंदर माझी शाळा’ हा बालगीतांचा सांगीतिक कार्यक्रम श्रीराम पोतदार आणि सहका-यांनी सादर केला, कवी गणेश घुले यांच्या रचनांना चाल लावून गायलेल्या या

गीतांनी बहार आणली. 

समारोपाच्या सत्रात श्री खंडेराय प्रतिष्ठानचे सचिव डॉ. सागर बालवडकर प्रमुख अतिथी होते. प्रास्ताविक सुनील महाजन यांनी केले तर आभार प्राचार्य शांताराम पोखरकर यांनी मानले.