’छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’ हे गाणे कालातीत झाले आणि आनंददायी शिक्षणासाठी प्रयत्न सुरू झाले. घोकंपट्टी करणारे पोपट तयार करण्यापेक्षा समजून उमजून अभ्यास व्हायला हवा, विद्यार्थी त्यात रमायला हवा यासाठी काही प्रमाणात काम सुरू झाले. वेगवेगळे उपक्रम, उपक्रमांवर आधारित अभ्यासक्रम, रंगीत आकर्षक पाठयपुस्तकं, नवोपक्रमातून शिक्षण असे अनेक घटक त्यात सामावले गेले.

या संपूर्ण बदल प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष विद्यार्थ्याबरोबर काम करण्यात सहभागी होते शिक्षक, विषयातील बदलांचे प्रशिक्षण घेऊन त्यात आपण अजून काय अधिक चांगले करू शकतो ही धडपड अनेक शाळांमध्ये अनेक शिक्षकांनी सुरू केली. परंतु शाळा आणि शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानापासून थोडेफार लांबच होते.

अचानक एक असा काळ आला की ध्यानीमनी नसताना एका विषाणूने शिक्षकांचा विद्यार्थ्यांबरोबर शिकण्याचा आनंद हिरावून घेतला. काही दिवस आता काय? हा प्रश्‍न खरोखरच निर्माण झाला होता. आधुनिक तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शिक्षकांसाठी खरंच अवघड होता. मुख्य म्हणजे ओळखीचा, सरावाचा विद्यार्थी समोर दिसणार नाहीत, त्यांचा प्रतिसाद खूपच मर्यादित स्वरूपात मिळू शकेल, काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यात अनेक समस्या येऊ शकतात, नेटवर्किंगची अडचण येऊ शकते या सगळ्यात शक्य असेल तसं शिकणं तर चालू राहिलं पाहिजे,

विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद तुटता कामा नये हा सगळा विचार करायला आणि तो कार्यवाहीत आणायला अतिशय तुटपुंजा वेळ. मग शिक्षकांची खरी धडपड चालू झाली.

कोणत्या माध्यमातून, कोणत्या तंत्रज्ञानातून आपण चांगल्या प्रकारे ही प्रक्रिया सुरू करू शकू ते शिक्षकांनी शोधलं. त्यासाठी संगणक प्रशिक्षण घेतलं. अन्ड्रॉईड फोनचे वेगवेगळे उपयोग कसे करता येतील त्यावर एकमेकांशी चर्चा केली. त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. त्याचा कमीत कमी वेळात जास्तीत जास्त सराव केला.

अभ्यासक्रमातला असा भाग शोधून काढणं की जो तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम प्रकारे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता येईल, अधिक आकर्षक आणि चांगल्या प्रकारे शिकवण्यासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणं, पाठ्यपुस्तकात असलेल्या घटकांबरोबर पूरक घरच्या घरी करता येतील असे उपक्रम करायला युट्यूबवर शोधणं किंवा स्वतः तयार करणं, अन्ड्रॉईड फोनवर कॅमेरा प्रेझेेंट करून काही व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवणं, यानिमित्ताने त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यासाठी बोलवणं, ऑनलाईन तास घेण्यासाठी मोबाईल स्टँड, ट्रीपॉड घरच्या घरी तयार केले, पालक कदाचित  ऑनलाईन तासाच्या वेळी घरी नसतील हे लक्षात घेऊन स्वतःचे युट्यूब चॅनेल तयार केले, लहान मुलांसाठी व्यायामाचे निरनिराळे व्हिडिओ तयार केले. असे अनेकानेक मार्ग या शिक्षकांनी झटपट शोधून काढले. शिक्षक खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांचे पालक झाले. परिस्थितीचा कुठलाही बाऊ न करता विद्यार्थ्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करत ह्या शिक्षकांनी समस्येचे संधीत रुपांतर केले. खरं तर हा एक दृष्टीकोन आहे, विचार आहे. अवघड परिस्थितीवर मात करून पुढे वाट चालत राहण्याचं धैर्य अशा शिक्षकांनी नकळत रुजवले आहे. शहरी भागातील शिक्षक तर हे प्रयत्न करतच आहेत पण ग्रामीण भागातील अनेकानेक शिक्षक सुद्धा हे शैक्षणिक पालकत्व निभावण्यासाठी प्रचंड मेहनत करत आहेत.

शिक्षकांनी या कामात मर्यादांवर मात करून स्वतःच्या कक्षा रुंदावण्यासाठी नक्कीच कष्ट घेतले आहेत. समाजमाध्यमातून, सोशल मिडियामधून या ऑनलाईन तासांबद्दल प्रचंड टिका होते आहे. मुलांचा स्क्रीन टाईम वाढतोय, डोळ्यांवर ताण येतोय, काय गरज आहे हे सगळं करण्याची अशी अनेक मतं मांडली जातायेत. ज्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही त्यांचं काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. शाळा आणि शिक्षकांशिवाय काय शिक्षण होणार नाही का असे प्रश्‍न विचारले जात आहेत. हा काळ अजून किती वाढेल याचा काहीच अंदाज नाही mind is devirs workshop म्हणूनच या प्रचंड ऊर्जा असलेल्या मुलांना चांगल्या उपक्रमात गुंतवून ठेवणं अतिशय आवश्यक आणि कठीण आहे.

आपल्या संपूर्ण समाजाचा विचार केला तर असे किती पालक आहेत जे स्वतः धडपड करून आवश्यक वेळ देऊन विद्यार्थ्यांचे शिकणं चालू ठेवू शकतील?

मुलांना जर योग्य व्यायाम करायला सांगितले तर जो 2 तासांचा वेळ मुले स्क्रीनसमोर घालवतात त्याचा डोळ्यांवरचा ताण नक्कीच कमी करता येईल. परंतु या व्यायामाची जबाबदारी पालकांनी नियमितपणे आणि निश्‍चितपणे घेतली तरच हे होऊ शकेल. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन तासांना बसणं सुविधांअभावी शक्य नाही त्यांच्यासाठी जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा काही वेगळे प्रयत्न होतीलच यात शंका नाही.

उत्साही विद्यार्थी, सजग पालक आणि मर्यादांना उल्लंघून प्रयत्नशील असणारे शिक्षक या सर्वांनी मिळून शिकण्याच्या कक्षा इतक्या रुंदावून टाकू या की कोणतही आव्हान आपण पेलू शकू.

- स्वाती देवळे