हुशार बकरा आणि लोभी कोल्हा

शिक्षण विवेक    06-Mar-2025
Total Views |


हुशार बकरा आणि लोभी कोल्हा

 

एका सकाळी एक छोटा बकरा उंच टेकडीवर चरायला गेला. तो गवतावर यथेच्छ ताव मारत असताना एका खडकामागून एक कोल्हा बाहेर आला. तो स्वतःसाठी अन्न शोधत होता. त्याची नजर गवतावर यथेच्छ ताव मारणाऱ्या बकऱ्यावर पडली. हा बकरा किती चविष्ट असेल नाही? असे मनात येऊन त्याचे डोळे चमकले आणि त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

त्याची ही इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून तो ती उंच टेकडी चढून जाण्याचा प्रयत्न करायला लागला. पण तो सारखा घसरून पडत होता. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याने बकऱ्याला खूप गोड आवाजात हाक मारली आणि विचारले, “अरे, तू एकटा तिकडे काय करतो आहेस ? इकडे ये खाली, इकडचे गवत तिथल्या वरच्या गवतापेक्षा खूपच गोड आहे." परंतु बकरा एकदम हुशार होता. कोल्ह्याचा धूर्तपणा त्याला चांगलाच माहीत होता. त्याने विचार केला शत्रूवर विश्वास ठेवण्यात काहीच शहाणपणा नाही. अतिशय गोड हसत तो बकरा कोल्ह्याला म्हणाला. मित्रा, तुझे खूप आभार; पण मला की नाही इथल्या गवताचीच चव जास्त आवडते आहे.

बिचारा कोल्हा, बकऱ्यावर ताव मारण्याचे त्याचे स्वप्न हवेतच विरून गेले.

- स्वाती मेहेंदळे 

शिक्षक, मुरलीधर लोहिया मातृमंदीर शाळा