आहार तोही परीक्षेला जाताना!

शिक्षण विवेक    04-Mar-2025
Total Views |


आहार तोही परीक्षेला जाताना

 

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये परीक्षेचा काळ जवळ आलेला आहे. सर्व मुले अभ्यासात मग्न असणार. प्रत्येकाला आपल्या मार्काची आणि पुढच्या करिअरची चिंता असणार. तुमची एक चिंता कमी करण्यासाठी मी ही खास माहिती तुम्हाला आज देत आहे. ती चिंता म्हणजे परीक्षेला जाताना आहार काय असावा याची.

फक्त परीक्षेला जाण्याआधी नव्हे, तर अभ्यासाच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवसांमध्ये आहार कसा असावा ? याबद्दल काही सोप्या टीप्स मी देणार आहे, नीट लक्ष द्या.

१. परीक्षेच्या एक ते दोन महिने आधी :

या दिवसांमध्ये तुम्हाला भराभर पाठांतरे, भरपूर अभ्यास कमी वेळेत संपवणे, नोट्स पूर्ण करणे, आकृत्या पाठ करणे अशा महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतात. समजा या महत्त्वाच्या दिवसांमध्ये तुम्ही अचानक आजारी पडलात तर ? किती गोंधळ उडेल ? याचसाठी परीक्षेच्या किमान एक ते दोन महिने आधीपासून बाहेरचे जंक फूड, मसालेदार पदार्थ, चाट, पिझ्झा, बर्गर, भजी, वडा, समोसा असे चटकदार पदार्थ हळूहळू कमी करत न्या. पूर्ण बंद करता आले तर अगदी उत्तम ! शिवाय ऐन अभ्यासाच्या दिवसांमध्ये व्हायरल किंवा पोटाचं इन्फेक्शन होऊन आजारी पडू नये यासाठी आइस्क्रीम, शीतपेये, आंबट पदार्थ कमी करावेत. कारण, ताप आला तर शाळा बुडणार आणि अभ्यासही बुडणार हे निश्चित. रोज घरी फ्रेश तयार होणारा ताजा आहार सर्वांत उत्तम. सकाळी नाश्त्याला अंडी, तूप वापरून केलेले भाज्यांचे पराठे, भाज्यांचा म्हणजेच व्हेजिटेबल उपमा, शेंगदाणे टाकून केलेले पोहे, रव्याचे भाज्या टाकून तयार केलेले डोसे, मिलेट्स, इडली असे पदार्थ खावेत.

दुपारच्या जेवणात पोळी-भाजी, वरण-भात, कडधान्याची एक वाटीभर उसळ, इतके पदार्थ नक्कीच घ्यावेत.

संध्याकाळी स्नॅक्समध्ये शेंगदाण्याची चिक्की, ड्राय फ्रूटचे दोन लाडू, खजूर आणि भिजवलेले बदाम यातील काहीही एक आणि कपभर दूध हा उत्तम स्नॅक्स आहे.

रात्री जेवणात शक्यतो हलका आहार म्हणजे मुगाच्या डाळीची आणि तांदळाची साजूक तूप वापरून केलेली खिचडी, व्हेजिटेबल दलिया, साधा वरण भात, असे हलके पदार्थ घ्यावेत.

रोज किमान दोन लीटर पाणी नक्की प्यावे. दिवसभरात किमान एक तरी ताजे फळ खावे.

२. परीक्षेच्या एक आठवडा आधी :

हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा असतो. या आठवड्यात सर्वांत जास्त काळजी शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये, याची घ्यावी. त्यासाठी उन्हात खेळणे काही काळ थांबवावे. रोज एकदा तरी पूर्ण ग्लास भरून लिंबू सरबत किंवा इतर कोणत्याही फळाचा ज्यूस, एक चमचा साखर आणि चवीपुरते मीठ टाकून प्यावे. चहा, कॉफी शक्य तितकी कमीतकमी प्यावी. कडधान्ये, पालेभाज्या आणि वेगवेगळ्या डाळी यांचा रोजच्या आहारात वापर करावा. तेल शक्यतो कमी वापरावे. तळलेले कोणतेही पदार्थ या आठवड्यात खाऊ नका.

३. परीक्षेला जाण्याआधी :

यात वेळेप्रमाणे काही बदल करणे अपेक्षित आहे. परीक्षा सकाळी लवकर असेल आणि घरातून खूप लवकर निघावे लागणार असेल, तर सकाळी चहा किंवा कॉफी आणि पोहे, उपमा, दलिया, डोसे, इडली असे ब्रेकफास्टचे पदार्थ खाऊन जावे. भरपेट जेऊन जाऊ नये. कारण, पेपर लिहिताना झोप येण्याची शक्यता त्याने वाढते.

थोडे उशिराची वेळ असेल; तर चहा, कॉफीऐवजी एखादा फ्रूट ज्यूस घेऊन इतर पदार्थ सेम ठेवावेत.

जर पेपर दुपारी असेल, तर शक्यतो जेवणात भात वगळावा. पोळीऐवजी ज्वारीची भाकरी खाणे जास्त चांगले. भाकरी खाल्याने पोट जड न होता हलकेपणा वाटतो. त्यामुळे पेपर लिहिताना सुस्ती येणार नाही.

शक्यतो परीक्षा संध्याकाळी नसते. परंतु, जर असलीच आणि तुम्हाला दुपारची झोप घेण्याची सवय असली तर दिवसा सकाळी वेळेत उठून नाश्ता आणि दुपारचं जेवण जरा नेहमीपेक्षा लवकर उरकून झोप पूर्ण करून घ्यावी. घराबाहेर जाण्याआधी किमान तीन तास आधी तुमची झोप पूर्ण झालेली असायला हवी. घरातून निघताना अर्धा तास आधी चहा किंवा कॉफी, आणि ड्रायफ्रूट लाडू किंवा चिक्की असे पदार्थ खाऊन निघावे. दूध किंवा फ्रूट ज्यूस घेतला तरी चालेल, पण अति प्रमाणात खाऊ नये.

आहाराची काळजी परीक्षेच्या दोन महिने आधी घेणे सुरू केले; तर ऐन परीक्षेला आजारी पडणे, सुस्ती आल्याने लिहायचा कंटाळा येणे, उत्तरे विसरून जाणे, चटकन न आठवणे अशा समस्या टाळता येतात.

काळजी घ्या आणि यशस्वी व्हा !

- दीप्ती कबाडे