तारकांचा मिलाफ

शिक्षण विवेक    27-Mar-2025
Total Views |


tarakancha milaf

आजपासून काही वर्षे पुढील भविष्यात, काही पृथ्वीवासी मुले यांनी आपल्या अंतराळ सफारीला सुरुवात केली. त्यांना 'प्रॉक्झिमा सेंटॉरी' या ताऱ्यापर्यंतचा प्रवास करायचा होता. हा तारा आपल्या सूर्याच्या सर्वांत जवळचा तारा आहे. वैज्ञानिकांचे असे मत होते की, या ताऱ्याच्या जवळ एखादा मानवास वस्ती करता येऊ शकेल असा एखादा ग्रह असावा. याच कारणास्तव विद्यार्थी वैज्ञानिकांचा एक गट या ताऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता.

'कॉस्मिक एक्सप्लोरर' या नावाचा हा वैज्ञानिकांचा गट एका अत्याधुनिक यानाने 'प्रॉक्झिमा सेंटॉरी' या ताऱ्याकडे कूच करीत होता. या यानाचे नाव 'युनीटी एक्सप्लोरर' असे होते. यानामध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा बसवण्यात आलेल्या होत्या. यापैकीच एक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणारी अशी धोकासूचक प्रणालीदेखील या यानामध्ये होती. या सर्व वैज्ञानिकांपैकी 'अॅलेक्स' हा खगोलशास्त्रज्ञ होता, तर 'माया' ही तंत्र वैज्ञानिक होती. 'लियाम' हा जैवशास्त्रज्ञ आणि गंमत म्हणजे 'इमा' ही एक वैज्ञानिक आणि कवयित्रीदेखील होती.

जसजसे युनीटी एक्सप्लोरर हे यान पुढे सरकत होते, तसतसे या यानाच्या खिडकीमधून अनेकानेक अद्भुत नजारे त्या वैज्ञानिकांना पाहावयास मिळत होते. या प्रवासात त्यांनी नव्या ताऱ्यांचा जन्म, विविध रंगी तेजोमेघ, तसेच लहान मोठ्या लघुग्रहांचा पट्टा असे विविध खगोलीय चमत्कार पाहिले होते. त्यांचा प्रवास फक्त विज्ञाननिष्ठ उरलेला नसून तो मानवासाठी एक मोठी प्रेरणा देणारा ठरत होता.

एके दिवशी या प्रवासात या यानाला एका खगोलीय विसंगतीला सामोरे जावे लागले. ती विसंगती म्हणजे एक असे खगोलीय वादळ, ज्यामुळे या यानाचा निश्चित असलेला रस्ताच बदलला गेला. या वेळी सर्व वैज्ञानिकांनी एकत्र येऊन आपापले कसब दाखवले. 'माया'ने यानाची रस्ता दाखवणारी प्रणाली री-प्रोग्राम केली. 'अॅलेक्स'ने सर्वांत जवळचा रस्ता गणन करून शोधला. 'लियाम'ने सर्व जण व्यवस्थित असल्याची खात्री करून घेतली आणि ‘इमा’ ने या कठीण काळातसुद्धा सर्वांची मानसिक अवस्था नीट राहील याची काळजी घेतली. युनीटी एक्सप्लोरर यान पुढे सरकत होते. सर्व वैज्ञानिकांना एका अशा संकटाचा सामना करावा लागत होता, ज्याबद्दल विज्ञानासदेखील काहीही ठाऊक नव्हते. यातच एक गूढ असा संदेश यानाला मिळू लागला. तो सदेश एका अज्ञात ग्रहाच्या दिशेने येत होता. या सदेशाबद्दलचे कुतूहल वैज्ञानिकांना शांत बसू देत नव्हते, त्यामुळे वैज्ञानिकांनी या सदेशाचा, तसेच या गूढ आणि अज्ञात ग्रहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. नंतर थोड्या दिवसांनी त्यांनी आपले यान त्या ग्रहावर उतरवले.

ग्रहावर उतरल्यावर या वैज्ञानिकांनी आजूबाजूच्या प्रदेशात शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना एक ज्ञान ग्रहण करू शकणारी अशी एक उपरी प्रजाती मिळाली. या प्रजातीचे नाव ल्युमॅरियन असे होते. ही प्रजाती आवर्त कंपनांद्वारे संवाद साधू शकत असे. हा संवाद चालू असताना ध्वनी आणि प्रकाश यांचा सुरेख मेळ देखील आपल्या वैज्ञानिकांना पाहायला मिळाला. या प्रजातीचा काही दिवस अभ्यास केल्यानंतर वैज्ञानिकांच्या असे लक्षात आले की ते यांच्याशी भाषेपलीकडे जाऊन संवाद साधू शकत आहेत आणि या प्रजातीमध्ये आणि त्यांच्यात शब्दांपलीकडील एक नाते निर्माण झालेले आहे.

या मैत्रीमुळे आपल्या वैज्ञानिकांना, ल्युमॅरियन प्रजातीने विश्वाविषयी अनेक चमत्कारिक गोष्टी सांगितल्या. जसे की ही प्रजाती वापरत असलेली आवर्त कंपने अनेक काळ टिकू शकतात, त्यामुळे फार दूरवर संदेश पाठवता येणेदेखील शक्य होते, तसेच या प्रजातीने वैज्ञानिकांना सांगितले की, लहानात लहान लघुग्रह ते प्रचंड विशाल असा तर हे सर्वच वेगवेगळ्या प्रकारची कंपने उत्सर्जित करून विश्वाचा समतोल राखून ठेवतात. आपल्या वैज्ञानिकांना एक गोष्ट मात्र लक्षात आली की, आपले ज्ञान हे समुद्रामधील एखाद्या थेंबाप्रमाणे तोकडे आहे. याचप्रमाणे वैज्ञानिकांना लक्षात आले की, अशी प्रत्येक संस्कृती ही एकंदर विश्वाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत जरुरीची आहे.

नवीन प्रजातीने दिलेले विश्वाबाबातीचे नवे ज्ञान घेऊन आपले सर्व वैज्ञानिक हे जणू विश्वाचे दूत म्हणूनच पुन्हा पृथ्वीवर अवतरले. त्यांनी पृथ्वीवरील नागरिकांबरोबर आपले ज्ञान प्रदान केले. आपल्या या विश्वरूपी घराचे सर्व पृथ्वीवासी सुजाण नागरिक व्हावे म्हणून या वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला.

हे सर्व वैज्ञानिक पुढे भरपूर नावारूपाला आले. पृथ्वीवरील अनेक ठिकाणी त्यांनी नागरिकांमध्ये बदल घडवून आणले आणि या कॉस्मिक एक्सप्लोरर या गटाची कहाणी पुढे अनेक वर्ष सांगितली गेली आणि वर्षानुवर्षे पृथ्वीवरील नागरिकांना यातून प्रेरणा मिळाली.

-अक्षय भिडे