खाई त्याला खवखवे

शिक्षण विवेक    26-Mar-2025
Total Views |


खाई त्याला खवखवे!

चिंटू खूप आनंदात होता. घरी गणपती बाप्पा येणार म्हणून जय्यत तयारी सुरू होती. आजोबा, बाबा, काका, चिंटूची ताई अशा सगळ्यांनी बाप्पाच्या सजावटीची तयारी सुरूदेखील केली होती आणि आई, आजी, काकू या लाडू, चिवडा, चकली, मोदक यांच्या तयारीत बिझी ! या सगळ्यात मध्ये मध्ये चिंटूची लुडबुड सुरू होती. एवढ्यात फोनची रिंग वाजली. चिंटूने धावत जाऊन पाहिले तर त्याच्या अनिश मामाचा फोन होता.

"आई गं ! मामाचा फोन आहे."

चिंटू हातातला फोन नाचवत ओरडला आणि त्याच्या आईच्या हातात नेऊन दिला. आईने हात पुसून फोन घेतला, "हम्म, बोल रे अनिश. अरे वा! कधी येतोयस? उद्याच का? ग्रेट !! ये ये, वाट बघते.", असे म्हणत आईने फोन बंद केला आणि चिंटूला म्हणाली, "चिंटू, उद्या अनिश मामा येतोय रे, मग तुझी तर मज्जाच मज्जा !"

अनिश मामा येणार हे ऐकून चिंटू भलताच खूश झाला. अनिश मामा त्याचा लाडका होता आणि तो अनिश मामाचा लाडका ! दोघे एकत्र आले की नुसती धमाल !

त्या रात्री चिंटू मामाची वाट बघतच निजला. सकाळ झाली तशी त्याची, मामा कधी येणार ? म्हणत आईच्या मागे भुणभुण सुरू झाली. शेवटी वैतागून आई त्याला रागवली, तशी स्वारी फुरगटून गॅलरीत जाऊन उभी राहिली. तेवढ्यात त्याला पार्किंगमध्ये अनिश मामा दिसला आणि 'मामा आला, मामा आला' असे ओरडतच चिंटू खाली पार्किंगकडे पळाला. कधी एकदा मामाच्या कडेवर बसतोय आणि त्याचा गालगुच्चा घेतोय, असे चिंटूला झाले. मामा अशी मोठ्याने हाक मारत तो मामाला चिकटला. "अरे, हो हो!", म्हणत मामाने त्याला उचलून कडेवर घेतले. दोघेही घरी आले. मामा आला म्हणून चिंटू एकदम खूश झाला. मामाने येताना चिंटूसाठी भरपूर खाऊदेखील आणला होता बरं का! आणि त्यात होते चिंटूला खूप खूप आवडणारे खारवलेले काजू ! काकू तो खाऊ बघून म्हणालीसुद्धा, 'की मज्जा आहे बुवा एका माणसाची!' चिंटू लगेच खुदकन हसला आणि पुन्हा मामाकडे पळाला.

आईने ते काजू एका बरणीत भरून कपाटात ठेवले आणि रोज एकच काजू खायचा असे चिंटूला बजावले. पण ऐकेल तो चिंटू कसला ? त्याने तर खूप सारे काजू गट्टम करायचे ठरवले होते. दुपारी घरात सामसूम झाली. चिंटूने हळूच कानोसा घेतला आणि तो गुपचूप आवाज न करता किचनमध्ये गेला. तिथे ठेवलेली काजूंची बरणी पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले. हळूच बरणीचे झाकण उघडून मूठभर काजू त्याने तोंडात कोंबले आणि आणखी मूठभर काजू खिशात भरले. बरणी पुन्हा जागेवर ठेवून तो खेळायला पळाला. काजू खाण्याचा आपला प्लॅन यशस्वी झाला, म्हणून चिंटू खूप खूश होता. अगदी स्वतःची पाठदेखील त्याने थोपटून घेतली.

चार किंवा पाच वाजले असतील आता आजोबांची चहाची मागणी सुरू झाली. सगळ्यांना चहा देऊन आईने चिंटूला दूध पिण्यासाठी हाक मारली; पण चिंटोबा कुठे येतोय. तो आपला सोफ्याच्या कोपऱ्यात एवढुसे तोंड करून बसला होता. आईला कळेना चिंटूला एकदम काय झाले ते. तिने पुन्हा हाक मारली; पण चिंटूचे हूं नाही की चू नाही. आई चिंटूजवळ गेली आणि तिने विचारले, "काय चिंटोबा, अरे आज दूध प्यायचे नाही का? की मामाने आणलेले काजू खायचेत ?" आईने काजूचे - नाव काढल्या काढल्या चिंटूने घाबरून 'नाही नाही' - अशी मान हलवली आणि तो जोरजोरात रडू लागला. आईला कळेचना की काय झाले याला ? चिंटू रडवेला झाला. त्याला काही सांगताही येईना. तो फक्त एकदा काजूच्या बरणीकडे आणि एकदा आपल्या घशाकडे बोट दाखवत होता. आता सगळा प्रकार आई, आजी आणि मामाच्या लक्षात आला. एवढे सगळे काजू एकदम खाल्ल्याने चिंटूचा घसा आता दुखायला लागला होता आणि त्याला घशात खवखवत होते. आईने मग चिंटूला गरम दूधात हळद घालून दिली आणि पुढचे दोन दिवस अजिबात काजू खायचे नाहीत असे बजावले.

मामाने हसत हसत चिंटूच्या डोक्यात टपली मारली आणि चिंटूला म्हणाला, "चिंटोबा याला म्हणतात, खाई त्याला खवखवे !"

|| मानसी चिटणीस ||