"अग्गोबाई, ढग्गोबाई लागली कळ" हे गाणं आलं आणि घराघरातली लहान मुलं, आई-बाबा, आजी-आजोबा ते गुणगुणू लागली. आता तर लहान मुलांचा कुठलाही कार्यक्रम याशिवाय पूर्णच होत नाही. या गाण्यात 'पावसाची गोष्ट' आहे, शब्द सोपे आहेत, चाल आणि ठेका मस्त आहे, त्यामुळे मुलांनाच काय पण मोठ्यांनासुद्धा मजा येते. अशी जमून आलेली गाणी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला आवडत राहतात. का बरं ?
लहान मुलं असो नाहीतर मोठी माणसं, आपण सगळेच किंवा आपल्यातलं लहान मूल सगळ्यात जास्त कशात रमत असेल तर ते गोष्ट ऐकण्यात किंवा सांगण्यात. साधं शाळेत काय झालं हे विचारलं तरी खूप बोलायचं असतं, काय काय ऐकवायचं असतं मुलांना. मग हीच गोष्ट गाण्यातून सांगता आली की वेगळीच गंमत येते. त्याची सुरुवात 'इथे इथे बस रे मोरा' करत भरवलेला घास, 'डोल बाई डोला'ची म्हणत मांडीवर झोके घेण्यात, पाय रेटण्या इतकीच असते. मग हळूहळू 'ये रे ये रे पावसा', 'एक होती इडली', 'एक होतं झुरळ 'पासून छोटुकले प्रसंग येतात. मग येते मोठी गोष्ट, 'मी नाही अभ्यास केला', 'ससा रे ससा', 'नाच रे मोरा', 'जंगल झाडीत वाघोबा लपले', मी पप्पाचा ढापून फोन' वगैरे. प्राणी, पक्षी, झाडं, ढग, वारा, पाऊस, आई-बाबा-आजी-आजोबा, शाळा घेऊन गोष्ट मोठी मोठी होत जाते, जादुई दुनियेत पण फिरून येते. पण नुसती गोष्ट असून त्याचं गाणं होत नाही. एखाद्या चित्रात रंग भरावे, त्याला चौकट सजवावी, ते लावायला छान कोपरा शोधावा तसंच बडबडगीतांची, बालगीतांची मजा घ्यायची असते.
आता गोष्ट आहे म्हणजे शब्द आले, त्यात चढ-उतार आले, वळणे आली, आता पुढे काय होणार? याची उत्सुकता आली. 'झुक झुक आगीनगाडी'मध्ये मामाच्या घरी काय काय असेल, 'खोडी माझी काढाल तर' मी बघा हं कसा बघतोच तुमच्याकडे, 'किलबिल किलबिल पक्षी'मधला स्वप्नातला गाव, नुकत्याच झालेल्या 'मनीमाऊचं बाळ' कसं गोड आहे अशी कित्येक गाणी आहेत. या गाण्यांमध्ये अतिशय साधे, सोपे, रोजच्या वापरातले शब्द आहेत, त्यांना एक नाद (ध्वनी) आहे. उदा., टपटप (पाऊस), दुडू दुडू (धावणे), छम छम (छडी कशी लागते), लखलख (वीज), सळसळ/ सो सो सुम (वारा), ढुम् ढुम् (ढग) या शब्दांमुळे आपल्याला गाणं म्हणताना आवाज ऐकू येतात, डोळ्यांसमोर दृश्य दिसू लागतं. शिवाय माऊ-काऊ, छान-पान, कळ-झळ, फार-धार-दार, बंगला-चांगला, मोरा-चारा, पाळी-टाळी यांसारखे कितीतरी यमक जुळणारे शब्द कळतात आणि गाणं पटकन लक्षात राहतं. हेच शब्द अभ्यासात डोकावले की, आधी गाणं डोक्यात वाजतं आणि अर्थ लक्षात येतो.पण नुसतेच शब्द तरी काय कामाचे? चाल आणि ठेकापण तेवढाच मस्त हवा. म्हणजे शब्दांच्या साथीने त्यावर नाचता आलं पाहिजे आणि वाहणे, धावणे, पडणे, मारणे, ढापणे, रडणे, हसणे, रूसणे, बसणे सगळ्या क्रियाही करून बघता आल्या पाहिजेत, हो ना? 'नाकावरच्या रागाला औषध काय' गाऊन मला 'कसलातरी राग आलाय' हेसुद्धा गाल फुगवून व्यक्त करता आलं पाहिजे. 'घाबरलीस ना आई'सारखं मी नाही लांब जाणार आई म्हणत गळ्यात पडून रडता आलं पाहिजे, 'चॉकलेटचा 5 बंगला' बांधताना डोळे मिटून स्वप्नात घसरगुंडी - खेळता आली पाहिजे, चिऊताईला धरून गदागदा हलवून उठवता आलं पाहिजे आणि सुंदर - आकाश, प्रकाश दिल्याबद्दल थेट देवबाप्पाशी गप्पाही मारता आल्या पाहिजेत. कधीतरी सावकाश, गोड आवाजात 'तुझ्या गळा, माझ्या - गळ्या' म्हणावं तर कधी खूप दंगा घालत, ओरडून - घर डोक्यावर घेत 'दहावी फ'चा ढोलही बडवता आला तर व्यायामही होऊन जाईल, कसं? फक्त याचा आजूबाजूच्यांना त्रास नको, एवढी काळजी घेतली म्हणजे झालं. 'रविवार (माझ्या) आवडीचा' का असतो, चांदोमामा भागतो म्हणजे काय, शेपटीवाले प्राणी कुठले, आईला स्वयंपाकात कुठली मदत लागते ही कोडी मोठ्यांनी घालायचा अवकाश, की आधी ही गाणी पाठ असतील तर उत्तर तयारच असेल. अशी ही गंमतजंमत करतकरत आपण किती काय काय शिकत असतो ते आपल्यालाही कळत नसतं. ठेका पकडून, फेर धरून, सगळ्या रंगांची, फुलांची, फळांची, प्राण्यांची, झाडांची, चित्रविचित्र स्वप्नांची एक अजब दुनिया आपल्यासमोर उभी असते. आपण फक्त त्यात हरवून जायचं थोडावेळ आणि आईची हाक आली की मात्र निमूटपणे ती सांगते ते ऐकायचं, पण.. पण ओठांवर आणि मनात गाणं गुणगुणतच.
- नेहा लिमये