मधुर व पौष्टिक सीताफळ

शिक्षण विवेक    22-Mar-2025
Total Views |


मधुर व पौष्टिक सीताफळ

 

हिवाळ्यातील थंडीत झाडांवर तयार होणारे एक सर्वांचे आवडते फळ म्हणजे 'सीताफळ'. सीताफळाचा मूळ उगम दक्षिण अमेरिकेतील असला, तरी आता त्याची लागवड जवळजवळ जगभरात केली जाते. भारतातदेखील सीताफळाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात यशस्वी लागवड केली जाते. हे फळ शेतकऱ्यांना उत्तम आर्थिक नफा मिळवून देते.

सीताफळाची रोपे बियांतूनदेखील सहज उगवतात, पण लागवडीसाठी मोठ्या डोळ्यांच्या फळांची कलमी रोपे वापरतात. जितका बाहेरच्या सालावरील डोळा मोठा तितका आतील फळात गर जास्त.

सीताफळ हे चवीला गोड व रवाळ असते. अजूनही शहरात फेरीवाले 'गोड माल सीताफळ' अशी आरोळी देत गाडीवर सीताफळे विकताना दिसून येतात. या फळातील गोड गरामुळे यास इंग्रजीत 'Custard Apple' म्हटले जाते.

झाडावर सीताफळ पक्व झाल्यावर ते खायला पोपट, बुलबुल यांसारखे फलाहारी पक्षी येतात. त्यामुळे बरेचदा सीताफळ तयार व्हायच्या जरासे आधीच झाडांवरून उतरवून ते विक्रीकरता पाठवले जाते. विक्रेत्यांकडे सीताफळे दिल्यावर थोड्या दिवसांत ती पिकून तयार होतात.

सीताफळ हे शीत गुणधर्माचे असून त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास ते कफदोष वाढवणारे ठरते; पण या फळाचे माफक प्रमाणात सेवन केल्यास हे फळ अत्यंत आरोग्यदायी ठरते. कारण सीताफळामध्ये जीवनसत्त्व अ, ब६, क असून त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमदेखील आढळते. त्यामुळे सीताफळ त्वचा, केस, डोळे, हृदय यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते; तसेच अपचन झाल्यास, स्नायू कमजोर झाल्यास सीताफळ खाल्ल्याने फायदा होतो.

सीताफळापासून रबडी, आईस्क्रीम, मिल्कशेक असे चविष्ट पदार्थ तयार केले जातात. सीताफळाची स्मूदीदेखील चवदार व आरोग्यदायी असते.

दोस्तांनो, या हिवाळ्यात सीताफळे अवश्य खा. मात्र गोड सीताफळ कितीही आवडत असलं तरी ते बेताने खा बरं! नाहीतर 'अति तेथे माती' अशी गत व्हायची. तसेच सीताफळ खाल्ल्यावर त्यातील बिया कचऱ्याच्या टोपलीत टाकून न देता त्या बियांपासून रोपे तयार करून बघा.

- प्रिया फुलंब्रीकर