चंद्राची खोड मोडली

शिक्षण विवेक    20-Mar-2025
Total Views |


चंद्राची खोड मोडली

खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे बरं! खूप जुनी हं! आपली पृथ्वी नियमानं आपल्या भोवती फिरतफिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत होती. एकदा काय झाले, फिरता फिरता चांदोबाच्या रडण्याचा आवाज तिला आला.

"का रे चांदोबा? का रडतोस?"

"बघ की गं अवनीताई, सूर्यदेव मला प्रकाश का नाही देत? मी सारखा अंधारात असतो. तू सांग ना त्यांना." चांदोबा म्हणाला.फिरत फिरत पृथ्वी म्हणाली, "बघते हं सांगून त्यांना." प्रदक्षिणा घालता घालता पृथ्वीने सूर्यदेवांना विनंती केली, "देवा, चांदोबा खूप रडतोय अंधारात." सूर्यदेव हसून म्हणाले, "अगं, अवनी हा चंद्र किती नाठाळ आहे, वात्रट आहे तुला माहिती नाही. दंगेखोरसुद्धा आहे."

"पण देवा, रडतोय ना तो. द्या ना थोडा प्रकाश.", पृथ्वीने विनवले.

"हे बघ, तू म्हणतेस तर देतो थोडा. पण याने.

काही दंगामस्ती केली तर चालणार नाही बरं."

सूर्यदेवांनी रोज थोडी थोडी प्रकाश किरणं द्यायला सुरुवात केली. आपणसुद्धा आता झगमतोय हे चंद्राला समजलं आणि त्यानं पृथ्वीला चिडवायला सुरुवात केली, "बघ मीच किती चमचमतोय. सूर्यदेव रोज माझा प्रकाश वाढवायला लागले आहेत. आता तर मी मोठ्ठा गोल होऊन प्रकाशतोय. बघ बघ, माझ्या प्रकाशात तुझ्या सागरावरच्या लाटा किती उत्साहित झाल्यात, उसळ्या मारून मारून मला भेटायला यायचं म्हणताहेत. आता बघ मी काय करतो ते... हा हा हा" असं म्हणून चंद्राने पृथ्वीवरती दगडं मारायला सुरुवात केली. "नको रे चंद्रा, नको ना मारू. मला खूप दुखतंय. सागरालाही त्रास होतोय." पृथ्वी रडत रडत म्हणायला लागली. पण चमचमत्या चंद्राला काही ऐकू जात नव्हते. चंद्राने केलेले हे दगड मारणे सूर्यदेवांनी पाहिले होते. त्यांच्या लक्षात चंद्राचा वांडपणा लक्षात आला होता.

दुसऱ्या दिवसापासून चंद्राच्या लक्षात आलं, "अरेच्या, आपला प्रकाश थोडा थोडा कमी कसा होतोय ? सूर्यदेवांना समजलं की काय? की पृथ्वीने चुगली केली ?"

त्याने पृथ्वीला विचारले, "पृथ्वी ताई, लागले का गं तुला? चुगली केलीस का सूर्यदेवांकडे? माझा झगझगाट, माझी चमक रोज थोडी थोडी कमी होत चाललीय. काय करू गं?"

पृथ्वी म्हणाली, "अरे चांदोबा, मी नाही हं केली चुगली. सूर्यदेवांना समजतं रे सगळं. तुला सांगत होते की नाही मी ? दगड मारू नको, दंगा करू नको म्हणून. आता यांची माफी माग आणि सांग मी पुनः दगड मारणार नाही म्हणून."

"अरे बापरे, त्यांच्याकडे जायचं सांगायला?" घाबरून चंद्राने विचारले. पृथ्वी समजावत म्हणाली, "नाही रे, मनापासून इथूनच सांग त्यांना. समजतं त्यांना."

सूर्यदेवांनी चंद्राची प्रार्थना ऐकली, पण एका अटीवर पुनः प्रकाश द्यायचं कबूल केलं. "हे बघ चंद्रा तुला शिक्षा तर झालीच पाहिजे. तू वाटोळा होऊन शुभ्र झालास, चमचमायला लागलास की, रोज थोडा थोडा प्रकाश मी कमी करत जाणार आणि मग १५ दिवसांनी तू आकाशात दिसणारच नाहीस. पहिल्या सारखा अंधारात राहशील. त्यानंतर पुन: थोडा थोडा प्रकाश मी देत जाईन आणि १५ दिवसांनी पुन्हा झगमगता वाटोळा प्रकाशमय असशील."

"हो देवा, पुनः मी पृथ्वीताईला त्रास देणार नाही", चंद्र म्हणाला.

आनंदात हसत पृथ्वी म्हणाली, “चंद्रा, जेव्हा तू वाटोळा झगमगशील

ना, ती असेल 'पौर्णिमा' आणि जेव्हा तू अंधारात असशील तिला आम्ही म्हणू 'अमावस्या'.

सूर्यदेवांनी शिक्षा करून अशी खोड मोडली चंद्राची. कळलं ना मुलांनो? म्हणून कुणाला त्रास द्यायचा नाही बरं!

।। अंजली गोखले ।।