'कशाने, काल तर परीक्षा कधी संपते आहे, असं झालं होतं ना तुला ?
'हो, पण कालपर्यंत अभ्यास होता, त्यामुळे वेळ अगदी छान जात होता. काही तरी करायला होतं. आज काहीच नाही करायला.'
'हं... असंच होतं.'
'पण मला खरंच खूप कंटाळा आला - आहे.'
'हो आलाच असेल... मग आता काय करायचं सांग बरं ?'
'ते तूच सांग... मला सुचलं असतं तर मी ते केलंच असतं ना ?'
'हो तेही खरंच आहे म्हणा... मला एक कल्पना सुचते आहे बघ.'
'कोणती ?'
'आण बरं तुझं बालभारतीचं मराठीचं पुस्तकं.'
'ऑ... ए, अभ्यासबिभ्यास नको हा...'
'अगं अभ्यास नाही काही... आधी आण तर...'
'हं... हे घे...'
'आता यातल्या लेखकांची एक यादी करू...'
'थांब, मी पेन-वही घेऊन येते...'
'हो...'
'सांग आता...'
'आचार्य अत्रे, जी.ए. कुलकर्णी, शकुंतला फडणीस, सरिता पदकी, अनंत भावे, माधुरी पुरंदरे, राजीव तांबे, नीलिमा गुंडी, संगीता बर्वे, प्रीता नागनाथ, स्वाती देवळे - बास एवढी...'
'तुला बास वाटतेय का ?
'हो...'
'पण ही नावं तू उभी लिहायला हवी होतीस ना ?'
'पण तू आधी का नाही सांगितलंस?'
'हं, पण ऐक ना... आपण संध्याकाळी ग्रंथालयात जाऊ आणि तिथे जाऊन आपण या नावांच्या पुढे पुस्तकांची नावं लिहू.'
'कसली भारी आयडिया आहे.'
'हं...'
'कसली छान यादी तयार झाली आहे ना ?
आचार्य अत्रे - कावळ्यांची शाळा
जी.ए. कुलकर्णी - बखर बिम्मची
शकुंतला फडणीस - सोन्यासारखी संधी
सरिता पदकी - छोटू हत्तीची गोष्ट
अनंत भावे – पटपटपूर
माधुरी पुरंदरे - राधाचं घर
राजीव तांबे - साहसी पिंकू
नीलिमा गुंडी - आभाळाचा फळा
संगीता बर्वे - पियूची वही
प्रीता नागनाथ - हिरव्या गप्पा
स्वाती देवळे - चिनू चौकस
'पण आता ही यादी करून काय करायचं ?'
'तीच तर खरी गंमत आहे. आता आपण ही पुस्तकं सुट्टीत वाचायची...'
'आपला वेळही छान जाईल आणि गंमतही येईल. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळतीलही...'
'हो ना?'
'अगदी...'
चला तर मग, वाचू वाचू आणि नाचू...
-डॉ. अर्चना कुडतरकर