भाषा संवर्धनाची गरज

शिक्षण विवेक    10-Mar-2025
Total Views |


भाषा संवार्धानी गरज

प्रत्येक भागाची भाषा वेगळी असते. भारत देश हा विविध भाषांनी सजलेला आहे. मराठी, हिंदी, तमिळ, उर्दू, गुजराती, राजस्थानी, बंगाली, आसामी अशा अनेक भाषा आपल्या देशात बोलल्या जातात. प्रत्येकाला आपली राष्ट्रभाषा आणि मातृभाषा अत्यंत प्रिय असते. आपली भाषा हीच आपली आणि आपल्या देशाची ओळख आणि देशाचा अभिमान असते. आजकाल सर्व जण इंग्रजी बोलताना, शिकताना आढळतात. काळाच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे, हे मान्य. मात्र, आपल्याला आपल्या मातृभाषेचा कुठे तरी विसर पडत चालला आहे का, याचा विचार करायला हवा.

आपल्या भाषेचं संवर्धन करणं, तिचा आदर करणं आणि तिचा अभिमान बाळगणं, हे आपल्या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपलं प्रथम कर्तव्य आहे. केवळ भाषादिनी आपण तिचा अभिमान बाळगणं, भाषेबद्दल बोलणं, व्यक्त होणं, हे पुरेसं नसून वर्षभर भाषेप्रती आदर व्यक्त करायला हवा.

जगातील विविध देशांमध्ये भारतीय राहतात. मात्र, त्यातील अनेक जण तिकडे राहूनही आपल्या देशाचा, भाषेचा अभिमान बाळगतात. बदल हा सृष्टीचा नियम आहे, हे खरं; पण त्यासाठी आपण आपल्या भाषेचा अनादर करतोय का? याकडे आपलं लक्ष असायला हवं. परराष्ट्रात गेल्यावर जसं आपल्याला वाटतं की, आपणही त्यांची भाषा शिकावी, आत्मसात करावी; तसंच आपणही ते आपल्या देशात आल्यावर त्यांना आपली भाषा शिकण्याची इच्छा व्हावी यासाठी काही प्रयत्न करायला हवेतच.

जसं आपलं नाव आणि आपल चारित्र्य ही आपली ओळख असते; तसंच आपली राष्ट्रभाषा ही आपल्या देशाची ओळख असते. आपल्या स्वभावावरून आपण हळूहळू समोरच्याला उमगायला लागतो; तसंच आपल्याला आपल्या भाषेबद्दल किती अभिमान आणि आपुलकी आहे हे आपल्या वाणीतून जाणवतं.

आपण आपल्या देशाचा आणि आपल्या भाषेचा अभिमान शेवटच्या श्वासापर्यंत बाळगायलाच हवा. आपली संस्कृती जगभर पसरावी यासाठी आजवर अनेक महापुरुषांनी खूप प्रयत्न केले आहेत. तोच वारसा पुढे नेऊन आपण भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

- रेवती मधुकर बेदरकर, 10 वी

श्री सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय, माजलगाव