परीक्षेला जाताना

शिक्षण विवेक    17-Feb-2025
Total Views |


parikshela jatana

नववीतला राघव परीक्षा द्यायची नाही, म्हणायला लागला. अभ्यासात लक्ष देईनासा झाला. घरात शांतशांत राहू लागला. राघवच्या ताईला त्याच्यात झालेला बदल वेळीच लक्षात आला आणि ताई त्याला समुपदेशकांकडे घेऊन गेली. योग्य त्या समुपदेशनामुळे राघव या सगळ्यांतून बाहेर आला. तो नववीच्या परीक्षेला आनंदाने सामोरा गेला आणि उत्तम गुणांनी उत्तीर्णही झाला.

परीक्षा जवळ आली की, राघवसारखीच गत बऱ्याच मुलांची होते नाही का ! अपुरा सराव, अभ्यासाची टाळाटाळ किंवा अभ्यासाचं खूप जास्त टेन्शन यांमुळे अनेकांना परीक्षेची अति भीती वाटते.

मुलांनो, तुम्हांला हे सगळं टाळायचं असेल, तर परीक्षेच्या आधीपासूनच आपल्याला या भीतीच्या विचारांवर काम करायला हवंय. त्यासाठी काय विचार कराल? याच्या काही टिप्स आजच्या लेखात पाहू या.

१) मुलांनो, खरं तर आपल्याला परीक्षेचा ताण येत नसतो, तर परीक्षेत मिळणाऱ्या गुणांचा ताण येत असतो. जसं पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पडल्यानंतर पाऊस पडणार की नाही? हे आपल्या हातात नसतं, पण घरातून निघताना रेनकोट किंवा छत्री घेऊन जाणं, हे मात्र आपल्या हातात नक्कीच आहे. तसंच पेपर अवघड की सोपा असणार? हे आपल्या हातात नाही, पण मेहनतीने नेटका अभ्यास करून पेपर छान लिहिणं हे मात्र आपल्या हातात आहे. जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळणारच आहेत.

२) परीक्षा काळात तुमचा स्वसंवाद (self talk) खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे पुढील काही वाक्य स्वसंवादात नक्की असू देत. 'मी जो अभ्यास केला आहे तो मनापासून केला आहे. परीक्षा काळात किंवा पेपर लिहिताना मी माझं मन स्थिर ठेवून परीक्षेला सामोरं जात आहे. मी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहे. I am doing my best and leaving the rest.' अशी काही सकारात्मक वाक्य ही परीक्षेबद्दलचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलवतात.

३) मुलांनो, एक नक्की लक्षात ठेवा. कॉपी करण्यापेक्षा न करण्यासाठी जास्त धाडस लागते. त्यामुळे पेपर लिहितानाच्या कोणत्याही व्यत्ययाकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आणि त्याने स्वतःला अस्वस्थही होऊ द्यायचं नाही हे लक्षात असू द्या.

४) ध्यान, प्राणायाम, ओमकार साधना यांसारख्या वेगवेगळ्या पद्धती वर्षभर नियमितपणे केल्यास मनातील भीतीचे विचार कमी व्हायला नक्की मदत होते.

५) पेपर लिहिताना एखादं उत्तर आठवत नसेल, तरी शांत राहा. एक दीर्घ श्वास घ्या आणि घोटभर पाणी किंवा सरबत (तुम्ही जे बरोबर नेलं आहे ते) प्या. पाणी प्यायल्याने आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राहायला मदत होते आणि आपला त्या वेळचा ताण जरा कमी होतो.

६) कोणत्याही परिस्थितीत तुमचे आईबाबा तुमच्या बरोबर आहेत. तुम्ही एकटे नाही. तेव्हा एखादा पेपर अवघड गेला, तरी त्यांच्याशी बोला, मोकळे व्हा आणि पुढच्या पेपरची तयारी सुरू करा. प्रत्येक पेपर हा तुमच्यासाठी नवीन अनुभव घेऊन येणारा आहे, यावर विश्वास ठेवा.

मुलांनो, या काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात घेतल्यास परीक्षेची अवास्तव भीती कमी होईल आणि तुमचा परीक्षेबाबतचा दृष्टिकोन नक्की सकारात्मक होईल. त्यामुळे तुम्ही ही वार्षिक परीक्षा आनंदाने आणि आत्मविश्वासाने द्याल याची खात्री आहे.

 

-रश्मी पटवर्धन

Counselling Psycologist