एच. ए. स्कूल प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागात आनंद मेळाव्याचे आयोजन
डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध उत्पादक उपक्रमांद्वारे स्वयंरोजगाराची माहिती मिळावी यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून व शाला समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाला समिती सदस्य श्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते या आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये व्यवसाय करणाऱ्या पालकांना त्यांच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये वडापाव, इडली चटणी, मसाला डोसा, कच्ची दाबेली, मिसळपाव, पावभाजी, भेळ, पाणीपुरी, फ्रेंच फ्राईज, विविध प्रकारचे ज्यूस, कोल्ड कॉफी, दही वडा अशा अनेक रुचकर व पौष्टिक पदार्थांची रेलचेल होती. तसेच इमिटेशन ज्वेलरी, आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने पूजेचे साहित्य, विविध प्रकारचे मसाले, पौष्टिक पीठे, कुरडया, पापड्या, पापड, लोणची, चटण्या, भाजीपाला तसेच हस्तकलेच्या, कलाकुसरीच्या, विणकामाच्या वस्तू अशा विविध गोष्टींचे स्टॉल्स लावण्यात आले होते. यामध्ये प्रत्येक स्टॉलवर विद्यार्थ्यांनीही त्यांच्या आई-बाबांना मदत केली. तसेच या आनंद मेळाव्यात शाळेचे सर्व विद्यार्थी पालक व परिसरातील लोकांनी सहभाग घेतला. या बाल आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार, नफा तोटा, स्वयंरोजगार, उत्पादक उपक्रम यांची आपोआप ओळख झाली व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हेतू सफल झाला. आनंद मेळाव्यास एच. ए. मजदूर संघाचे उपाध्यक्ष संजय देशमुख, जनरल सेक्रेटरी विजय पाटील,ओबीसी संघटनेचे सुनील रिकामे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष महंमद सय्यद, यशोधन गोरे यांनी भेट दिली. या उपक्रमासाठी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख संगीता लोखंडे, पालक संघाचे जितेंद्र बोरनारे यांचे सहकार्य लाभले. तसेच ज्येष्ठ शिक्षक अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे, शिक्षक पालक संघाचे योगेश आंबेकर, स्वाती बनकर, राजेंद्र गेजगे, रवींद्र उदेघ, मयुरेश हिरेमठ, विवेक वाखुरे यांचे मार्गदर्शन लाभले. विठ्ठल मोरे, समीक्षा इसवे, शहनाझ हेब्बाळकर यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमात शाळेचे सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.
वार्तांकन - शहनाझ हेब्बाळकर