गुरुविणा नाही दुजा आधार...

गुरुविणा नाही दुजा आधार...

शिक्षण विवेक    05-Sep-2024
Total Views |

 
गुरुविणा नाही दुजा आधार...

गुरुविणा नाही दुजा आधार...

आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूर्वीपासून पुढे चालत आलेला वारसा आपल्यापर्यंत पोचवण्याचे काम शिक्षक करत असतात. आपल्याला कठीण काळात प्रोत्साहन देणारे, आपल्यामधील खऱ्या माणसाला जाग करणारे आपले शिक्षक असतात.

५ सप्टेंबर रोजी आपण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करतो. ते एक आदर्शवादी शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. विद्यार्थी या दिवशी शिक्षकांचा आदर - सन्मान करतात. त्यांच्याशी ऋणी राहतात.

शिक्षक व शिक्षण या दोन संकल्पनांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचा खूप मोलाचा वाटा असतो. शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती जी प्रत्येक विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरित करते. विद्यार्थ्यांना प्रेरित करणारे व त्याचसोबत त्यांचे स्थान समाजात निर्माण करण्यास मदत करणारे शिक्षक यांचे आपल्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे.

आपले पहिले गुरु म्हणजे आपले पालक- आईचे सुंदर वर्णन सांगणारी व तिची आपल्या जीवनातील भूमिका सांगणारी कविता आपण ऐकलीच असेल :

आई माझा गुरू, आई कल्पतरू

सौख्याचा सागरू, आई माझी

आपल्या पालकानंतर आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असणारे म्हणजे आपले शिक्षक होय. शाळेत आल्यापासून आपल्याला सांभाळणारे व त्याचसोबत संस्कार देणारे आपले शिक्षक असतात. आपल्यासाठी शिकणे मजेदार व सोपे बनवणारे, मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आपले शिक्षक अहोरात्र मेहनत घेतात. आपल्या शैक्षणिक व शारीरिक विकासावर नेहमीच शिक्षक लक्षण ठेवतात. आपला आत्मविश्वास उंचावण्यास मदत करतात.

सध्या आपल्याला शिक्षकांचे समाजातील स्थान धोक्यात आल्याचे दिसते. आंतरजाल याला आपण जास्त जवळचे मानत आहोत. गुण कमी पडले तर आपण आपली चूक न कबूल करता शिक्षकांना दोषी ठरवत असतो. पण आपल्याला हे कळत नाही की आपण आपल्या गुरूनांच दुखवत असतो. जे व्यक्तिमत्व आपल्यासाठी परिश्रम करतात, आपण एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रयत्न करतात त्यांचीच अवहेलना आपण करत असतो.

शिक्षकांनी दिलेला वारसा हा कधीच आपल्याला आंतरजाल मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षक हे नेहमीच घडत राहणार व या धरणीवर वास्तव्य करणार, जोपर्यंत या धरणीमातेवर चंद्र, सूर्य व तारे यांचे अस्तित्व असेल तोपर्यंत शिक्षक येथे वास्तव्य करतील असे मला नेहमी वाटते. त्यामुळे मला ही ओळ नेहमीचा बरोबर वाटते.

गुरूविणा नाही दुजा आधार

- शार्दुल जोशी, १० वी

डी.ई.एस.सेकंडरी स्कूल, टिळक रोड, पुणे