कब बुलबुल उपक्रम
# फ्लार हरबेरियम म्हणजेच फुलांचा संग्रह.#
" शाळेत असताना सर्व वाटायच्या निव्वळ थापा
आता कुठे गूढ उलघडतोय वहीतील सुकलेला चाफा."
असे भाष्य आपली आधीची पिढी करायची. जुन्या आठवणींना उजाळा द्यायची. पण आजची पिढी वेगळी, तिचे विचार वेगळे. त्यांचे उपक्रम जगा वेगळेच. असाच आगळावेगळा उपक्रम म्हणजे फ्लार हर्बेरियम फुलांचा संग्रह. डी.ई.एस. प्रायमरी विभागातील कब बुलबुलनी हा उपक्रम अत्यंत आनंदाने आपल्या शाळेत राबविला. यासाठी विद्यार्थ्यांनी उत्तम तयारी केली होती. छान सुंदर सुवासिक ताजी अशी चाफ्याची फुले या ठिकाणी वापरण्यात आली. तुरटी व पाणी यांचे योग्य प्रमाण वापरून त्यांचे सुयोग्य असे मिश्रण तयार करण्यात आले. हवाबंद अशा काचेच्या बाटलीमध्ये हे पाणी व चाफ्याची फुले एकत्रित करण्यात आली. त्यानंतर सीलबंद अशा हवाबंद चाफ्याच्या सुंदर सुवासिक बाटल्या तयार करण्यात आल्या. आजकालच्या या जगामध्ये आकर्षक अशा भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. अशा शोभेच्या वस्तू म्हणजेच चाफ्याच्या फुलांच्या तयार केलेल्या बाटल्या आपल्याला बाजारामध्ये विकण्यासाठी ठेवलेल्या आढळतात. अशा या शोभेच्या वस्तू विकत घेण्यापेक्षा आपण स्वतः स्वतःच्या हाताने बनवाव्यात व आपल्या आप्तेष्टांना सणा सुदीला भेट द्याव्या.अशी संकल्पना लॉक लीडर योगिनी कानडे यांनी मुख्याध्यापिका सौ अर्चना धनावडे यांच्याकडे मांडली. अशा या कृतीशील उपक्रमाला क्षणाचाही विलंब न करता मुख्याध्यापिका सौ अर्चना धनावडे यांनी परवानगी दिली. केवळ परवानगी देऊन त्या थांबल्या नाहीत तर योग्य मार्गदर्शन देखील केले. सकाळ सत्रातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना फ्लॉक लीडर योगिनी कानडे यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले . दुपार सत्रातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना फ्लॉक लीडर सारिका दुसाने यांनी मार्गदर्शन केले. सकाळ सत्रातील पर्यवेक्षिका ग्रेसी डिसुझा व दुपार सत्रातील पर्यवेक्षिका सिमरन गुजर यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम उत्तम रीतीने पार पडला. या शोभेच्या वस्तू या तयार झालेल्या बाटल्या किमान दहा ते पंधरा वर्ष अशाच राहतात व चाफ्याची फुले ताजी तवानी टवटवीत दिसतात. हा उपक्रम करत असताना विद्यार्थ्यांनी नाजूक फुले कसे हाताळावीत यांचे देखील धडे गिरवले. काचेच्या वस्तूंची काळजी कशी घ्यावी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले. तयार झालेल्या फुलांच्या संग्रहांच्या काचेच्या बाटल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेप्रमाणे सजविल्या व सुशोभीकरणासाठी आपल्या घरामध्ये ठेवल्या विद्यार्थ्यांचा हा कृतीशील उपक्रम पाहून पालकांना अत्यंत आनंद झाला व अशा पद्धतीचे उपक्रम शाळेने वारंवार घ्यावेत यासाठी पालकांनी देखील शाळेचे कौतुक केले.
योगिनी कानडे.
फ्लॉक लीडर
डी. ई.एस. प्रायमरी
टिळक रोड पुणे 30