अनोखे रक्षाबंधन...

शिक्षण विवेक    21-Aug-2024
Total Views |


अनोखे रक्षाबंधन ... 

अनोखे रक्षाबंधन...

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ, शाळेतील इयत्ता ३री सकाळ व दुपार विभागाच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणाचे एक नवे आणि व्यापक स्वरूप साकारले.

केवळ भावंडांना राखी बांधण्यापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील झाडांना राखी बांधून त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. झाडे ही आपल्या परिसराची रक्षक असून आपल्याला ऑक्सिजन, सावली आणि निवारा देतात हे त्यांना पटले.

त्याचप्रमाणे, शाळेतील चौकीदार, स्वच्छता कर्मचारी, शिपाई आणि सुरक्षा रक्षक यांना राखी बांधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या निःस्वार्थी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांना जाणवले.

सकाळ विभागाच्या वर्गशिक्षिका सौ. मनीषा पेठकर यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कृतज्ञता, सर्वसमावेशकता आणि करुणा या गुणांचे महत्त्व पटवून दिले. रक्षाबंधन हे केवळ भावंडांपुरते मर्यादित नसून आपल्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येकाला आदराने वागण्याचा संदेश त्यांनी यातून स्पष्टपणे सांगितला.

दुपार विभागाच्या तिसरीतील विध्यार्थ्यानी वर्गशिक्षिका सौ. सुवर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 'सायकल वाचवा ' हे नाटक सादर केले, त्यातून सायकल वापरल्यामुळे होणारे राष्ट्रीय, सामाजिक व शारीरिक फायदे सांगण्यात आले.

राष्ट्रीय फायद्यामध्ये इंधन बचत पर्यायाने चलनाची बचत,सामाजिक फायदा म्हणजे प्रदूषण, वाहतूक कोंडी, पार्किंग चा प्रश्न येत नाही आणि शारीरिक फायद्यामध्ये सहज व्यायाम, बळकट स्नायू हे मुद्दे अधोरेखित केले.त्याचबरोबर सायकल चालवण्यासाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था असण्याची गरज ही व्यक्त केली.

ही दिव्य कृती सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. हा संपूर्ण उपक्रम एन. ई. एम. एस.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमांगी देशमुख यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनखाली पार पडला.