एकची गंमत
एकात मिळवला एक
त्याचे झाले दोन
मनीच्या मोबाईलला
म्यॉव म्यॉवची टोन
दोनात मिळवला एक
त्याचे झाले तीन
ताईच्या लांब वेणीला
फुलाफुलांची पीन
तिनात मिळवला एक
त्याचे झाले चार
मला माझी शाळा
आवडे फार फार
चारात मिळवला एक
त्याचे झाले पाच
गिरकी घेऊन गोल
सारे करू या नाच
पाचात मिळवला एक
त्याचे झाले सहा
बशी मागते कपाला
गरमगरम चहा
सहात मिळवला एक
त्याचे झाले सात
लिहाया लागले माझे
इवलेइवले हात
सातात मिळवला एक
त्याचे झाले आठ
छान छान गाणी
आम्ही केली पाठ
आठात मिळवला एक
त्याचे झाले नऊ
ससोबाचे अंग
आहे किती मऊ..!
नवात मिळवला एक
त्याचे झाले दहा
चला आता हसू या
हाऽऽ हाऽऽ हाऽऽ
- संदीप वाकोडे