एकदा एक सावली खूप खूप रुसली. सारखं सारखं उन्हात राहून अगदी कंटाळून गेली.
‘शी बाई. बघावं तेव्हा मी उन्हात. वैताग आलाय मला.'
वडाच्या झाडाला ती रडूनरडून सांगू लागली.
‘बाकी सगळेजण आरामात बसतात अंधारात. मला मात्र कधीच जमत नाही.'
‘अगं, आपल्या प्रत्येकाचं काम वेगळं. आता माझं बघ. सारखा एकाजागी उभा. जराही हलता येत नाही. पण मी करतो का तक्रार? सावले, तुझं आणि सूर्याचं मस्त गूळपीठ आहे. म्हणून तू उन्हात असतेस. इथे-तिथे फिरतेस.'
वडाच्या झाडाने तिला समजावलं.
‘नाव काढू नकोस त्या सूर्याचं. मला त्याचं तोंड पाहायची इच्छा नाही. केवढी काळी झालीय मी. सारखंसारखं त्याच्या उन्हात राहून.'
सावलीला मनापासून वाईट वाटत होतं आणि मग सावली चक्क पळून गेली. सूर्यापासून... उन्हापासून... दूर त्या मोठ्या वडाच्या झाडाच्या ढोलीत लपून बसली. मस्त अंधारात. खूप बरं वाटलं तिला.
‘अहाहा... ऊन नाही. उजेड नाही. किती गारवा आहे इथे आणि मुख्य म्हणजे सूर्याच्या तालावर अजिबात नाचायला नको. कधी उभी, कधी आडवी आणि कधी सर्वांच्या पायात घुटमळायला लावतो तो. आता कसं निवांत! माझी मी एकटीच बरी.'
पृथ्वीवर नेहमीप्रमाणे दिवस उजाडला. सूर्याने किरणांचे पांघरुण घातले. दिवस वर आला. पण सावलीचा पत्ताच नाही.
नुसते रणरणते ऊन.
पशू, पक्षी, माणसं, झाडं, वेली, घरं.. सगळे सगळे उन्हात. एकाचीही सावली दिसेना. एरवी झाडाच्या सावलीत आरामात पहुडणारे गाई, गुरे सगळे उन्हात. कोणाकोणाला सावलीचा ठिपका दिसेना. आभाळात उडणारे पक्षी, शाळेतून घरी निघालेली मुले, वाहने सावली शोधू लागले.
सावलीबाई मात्र जाम रागावलेली. मुळीच बाहेर येईना आणि तिच्याशिवाय पृथ्वीवर कोणालाच करमेना.
‘शी!' किती विचित्र वाटतंय आज. सावलीमुळे सगळे आकार कसे उठून दिसतात.'
‘हो ना! काही तरी अपुरं वाटतंय ना.'
रस्त्यावर मुलांच्या गप्पा रंगल्या होत्या. सावली हळूच ऐकत होती सगळं.
‘पाहिलसं ते वासरू सावली शोधतंय. झाडाभोवती गोल गोल फिरतंय बिचारं. किती ते ऊन. सावली कुठे गेली आपली?'
सगळ्यांना खरचं खूप वाईट वाटत होतं. सावलीची आठवण येत होती. वडाने सावलीला हाक मारली.
‘सावले, ऐकलेस ना. सगळे त्रासलेत बरं का. तुझ्याशिवाय करमत नाही कोणाला. अगं तुझं नाव कौतुकाने घेतो आम्ही. सावली कधीही साथ सोडत नाही म्हणतो आणि तूच पळून आलीस? हे बघ... पृथ्वीवरचे सारे सजीव निर्जीव तुझ्याविना अपुरे आहेत, मग, गेला का राग? जातेस ना बाहेर?
सावली खुदकन हसली.
‘उगाच रागावले मी. चुकलचं माझं. येते रे दादा. वाट बघत आहेत सगळे. सावली हळूच खाली उतरली आणि कामाला लागली.
‘ती बघ सावली'
माझी पण परत आली.
‘अरे, सगळ्यांचीच सावली पुन्हा मिळाली.'
टाळ्यांच्या कडकडायतच सर्वांनी तिचं स्वागत केलं.
सावलीने सूर्याकडे पाहत डोळे मिचकावले.
सूर्य मिशीतल्या मिशीत हळूच हसला.
- संगीता पुराणिक