डॉ. पांडुरंग खानखोजे

डॉ. पांडुरंग खानखोजे

शिक्षण विवेक    18-Jul-2023
Total Views |


डॉ. पांडुरंग खानखोजे

डॉ. खानखोजे म्हणजे वऱ्हाडचे सुपुत्र

बालपणीच मनात रुजले देशभक्तीचे चित्र

वडील होते जुन्या चालीचे त्यांचा संताप झाला

परावृत्त करण्याला तयांनी पांडुरंगाच्या लग्नाचा घाट घातला

लग्नाच्या दिवशी समर्थांप्रमाणे पांडुरंग तेथून गायब झाला

देशकार्य करणाऱ्या मित्रांसोबत यवतमाळी राहिला

तिथे दिसली जाहिरात घरच्यांनी पत्रात दिलेली

घरी परतून यावे म्हणूनी विनवणी केलेली

ती पाहून पांडुरंग पुनश्च घरी आला

घरी पुन्हा काही वर्षांनी लग्नाचा बेत ठरला

झाले कडाक्याचे भांडण रडली त्यांची माय

लग्न अथवा गृहत्याग वडिलांनी दिला पर्याय

निश्चयी पांडुरंगाने नंतर तडक सोडले घर

सुरू केले क्रांतिकार्यही, त्या नव्हती कसली डर

सैनिकी शिक्षण घेण्याचे मग पांडुरंगाने ठरवले

लोकमान्य टिळकांचे त्याने मार्गदर्शन घेतले

कष्ट बहुतची सोसुनी ते पोहोचले अमेरिकेला

पडतील ती ती कामे केली, भ्याले ना कष्टाल

प्रवेश मिळवला पांडुरंगाने सैनिकी शाळेत

कित्येक पुस्तके वाचली झाले पारंगत विद्येत

शत्रू कितीतरी प्रबळ आपला झाली याची जाणीव

परीक्षेपेक्षा कितीतरी कमावली ज्ञानाची राणीव

पांडुरंगापुढे आता आली वेळ प्रत्यक्ष कृतीची

त्यासाठी स्थापना केली तयांनी, इंडियन इंडिपेंडन्स लीगची

बोलता बोलता संस्थेचे पाचशेवर सभासद झाले

भारतीय ते अमेरिकेतले स्वातंत्र्यकांक्षेने पेटले

तिथे भेटले नंतर त्यांना विष्णू पिंगळ्यासारखे सहकारी

दोघांनी मग मिळून केली सैनिकी शिक्षणाची तयारी

त्याशिवाय त्यांनी सुरू केला शेतकी विद्येचा अभ्यास

त्यातही त्यांनी पदवी मिळवली प्राविण्यासह खास

पहिले महायुद्ध सुरू जाहले मिळवला जर्मनीचा पाठिंबा

इंग्रजांविरुद्ध युद्धाच्या पूजियले रणखांबा

इराणमधून ब्रिटिशविरोधी उठाव सुरू झाले

आघाडीवर सेनानीने असावे म्हणून खानखोजे इराणात आले

काझघाई टोळीशी भिडूनी प्रत्यक्ष केले युद्ध

बंदुकीच्या लागल्या गोळ्या आणि हरपली शुद्ध

इंग्रजांचे खानखोजे आता युद्धकैदी बनले

नको होते ते संकट त्यावर येऊन कोसळले

पहाऱ्यावरच्या इराणी लोकांची होती सहानुभूती

खानखोज्यांना ह्याचवेळी आठवले राजे शिवछत्रपती

त्यांनीही आजाराचे सोंग केले दाखवला अतिसार

बहीरदिशेला जाऊ लागले दोन दिवस वारंवार

पहारेकऱ्यांनी हळूहळू त्यांच्याकडे दुर्लक्षच केले

संधी साधूनी खानखोजे तेथूनी मग निसटले

खूप कष्ट सोसले पहिले महायुद्धही संपले

त्या वेळी तरी स्वातंत्र्याचे स्वप्न अपूर्णच राहिले

त्यानंतर मग खानखोजे गेले मेक्सिको देशाला

वाहून घेतले तिथे तयांनी शास्त्रीय ज्ञानाला

श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणूनी त्यांची झाली तेथे ख्याती

पण बोलवत होती त्यांना भारतभूची माती

देश स्वतंत्र झाल्यावर ते मायदेशी परतले

देशाच्या उभारणीसह कार्य करण्या खूपच आतुरले

परंतु इथला सरकारांनी केली त्यांचीसुद्धा उपेक्षा

भारतासाठी काही करावी अधुरी एक अपेक्षा

उत्तर आयुष्य गेले त्यांचे अतिशय दारिद्य्रात

थोर देशभक्ताची नव्हती कुणा येथ किंमत

अखेर उपेक्षित अवस्थेतच त्यांना मरण आले

थोर क्रांतीकारकाचे या कुणा स्मरण नुरले

- मकरंद शांताराम