खेळ खेळू या गणिताशी!

लहरी राजा, देई मृत्यूची सजा

शिक्षण विवेक    25-Dec-2023
Total Views |

खेळ खेळू या गणिताशी!
लहरी राजा, देई मृत्यूची सजा
‘चौकस चौकडी’ गप्पा मारत बसली होती. तेवढ्यात संदेशकाका त्यांच्यात येऊन बसला. ‘आज काय?’ चौघेही एकदम उद्गारले. ‘आज एक गोष्टीरूप कोडे.’, काका म्हणाला. ‘फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका देशात एक लहरी राजा राज्य करीत होता. त्याने एकदा असा हुकूम काढला की, ‘जेथे जेथे राजा जाईल तेथील सर्व माणसांनी राजाला वाकून नमस्कार केला पाहिजे. जो वाकून नमस्कार करणार नाही त्याला मृत्युदंड दिला जाईल.’ अर्थातच काही काळाने प्रजाजन वैतागले. एक वृद्ध जाणती स्त्री म्हणाली,‘मी काढते यातून मार्ग.’ आणि ती राजा येण्याच्या रस्त्यावर उभी राहिली पण तिने राजाला नमस्कार केलाच नाही. सैनिकांनी तिला पकडून राजासमोर उभे केले. राजा म्हणाला, ‘हुकूम म्हणजे हुकूम! तुला मृत्युदंड होणारच. तुझी अखेरची इच्छा सांग.’ ती हसत म्हणाली, ‘महाराज, मी मरायला तयार आहे. पण मला मारण्याआधी तुम्ही कुठेही गेलात तरी जो माणूस कधीही तुम्हाला नमस्कार करीत नाही त्याला पहिल्यांदा मृत्युदंड द्या.’ ‘कोण आहे हा नतद्रष्ट माणूस?’ राजाने रागाने विचारले. शहाण्या म्हातारीने हळूच उत्तर दिले. ते उत्तर ऐकताच राजा शरमिंदा झाला आणि त्याने म्हातारीची सन्मानपूर्वक सुटका केली. ‘कोण आहे हा नतद्रष्ट माणूस?’ या प्रश्नाचे उत्तर काय असेल हे तुम्ही सांगू शकाल का?
खूप चर्चा करून चौघांनी उत्तर समजावून घेतले. तरी अशोकने एक मुद्दा काढलाच. तो म्हणाला, ‘काका, यात गणित कुठे आहे?’ काका हसून म्हणाला, ‘खरे आहे तुझे. पण गणितात फक्त अंक, आकृत्या आणि चिन्हेच येत नाहीत. गणितात ठरलेले नियम नीट समजून घेऊन, ते काटेकोरपणे वापरून, काय निघते ते तपासून बघणे यालाही महत्त्व असते. थोडयात म्हणजे तर्क हा गणिताचा पाया आहे.’
उत्तर:
म्हातारी म्हणाली, ‘महाराज तो माणूस म्हणजे आपण स्वतः! आपण कुठेही गेलात तरी आपण कधीही स्वतःला नमस्कार केला आहे का? तुमचा हुकूम सर्वांना लागू आहे आणि सर्वांमध्ये तुम्हीही आलात.’
आपण आपल्या जवळच्या माणसांसाठी अनेक नियम करत असतो, त्यांना शहाणपण शिकवत असतो, पण तेच नियम आपल्यालाही लागू पडतात हे आपण सोयीस्कररीत्या विसरत असतो.
 
- प्रसन्न दाभोलकर