शिक्षकांच्या समोर असणारे विद्यार्थी हे वयाने त्याच्यापेक्षा लहान असतात. म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचं तर शिक्षक mature, म्हणजे विकसित झालेला असतो; तर विद्यार्थी immature म्हणजे विकसित न झालेले किंवा विकसनशील अवस्थेत असतात. पण हे छोटेसे विकसनशील मानव काही वेळा त्या तथाकथित विकसित मानवाला दाद देत नाहीत. त्याने कितीही प्ररत्न केला तरी जे त्यांच्यासाठी योग्य आहे, असं तो घसा कोरडा होईपर्यंत सांगत असतो. ते त्यांच्या कानात शिरत नाही. मग अशा वेळी मला माझा मित्र जगदीश याच्या कार्यालयात त्याने लावलेलं एक सुंदर पोस्टर परत परत आठवतं. त्या पोस्टरच्या वरच्या भागात दोन माणसं एका रेड्याला ओढत नेत आहेत. रेडा ऐकत नाही. त्याला ओढून नेताना माणसं मात्र खूप दमलेली आहेत, असं चित्र होतं. तर खालच्या भागात एक माणूस चक्क त्या रेड्यावरच बसला आहे आणि हातातल्या काठीला चारा बांधून ती चाऱ्याची बाजू त्याने रेड्यासमोर धरली आहे. त्यामुळे चाऱ्याच्या आशेने रेडा पुढेपुढे चालला आहे. ही व्यक्तीही रेड्यावर बसून निघाली असल्याने तिचीही दमछाक नाही. रेड्यालाही लागेल तेव्हा चारा मिळेल म्हणून तोही खूश आणि दोघांचीही वाटचाल विनासारास सुरू.
अगदी हेच तत्त्व शिक्षकाला वर्गात वापरावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना की, ‘साँप भी मर जाए और लाठी भी ना टूटे.’ अगदी त्याच प्रकारचं. विद्यार्थ्यांमध्ये योग्य तो वर्तनबदल तर करायचा, पण त्यांना दुखवायचं नाही. आमच्या शाळेत असे दोन अनुभव आम्ही घेतले आहेत. पहिला म्हणजे विद्यार्थी टापटीप नसणे. अनेकदा सांगूनही विद्यार्थी टापटीपपणे शाळेत येण्याची टाळाटाळ करत होते. मग एका शिक्षकसभेत आम्ही असं ठरवलं की, ज्या ज्या वेळी काही कार्यक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर पाठवायचं असेल, तेव्हा त्यांना त्याची पूर्वकल्पना न देता अचानक पाठवायचं आणि आल्यावर इतर शाळांच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही कसे अजागळ होतात आणि शाळेचे प्रतिनिधी म्हणून ते कसं खराब वाटत होतं, याची जाणीव करून द्यायची. चार-पाचदा असं घडल्यावर मात्रा अचूक लागू पडली आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्रांवर योग्य तो परिणाम पाहण्यास मिळाला. अगदी तीच गोष्ट वक्तृत्वाबाबतची. चिठ्ठीचपाटी न वापरता तुमचं मत मांडा, असं आम्ही सतत सांगायचो, पण तशी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. जेव्हा विद्यार्थ्यांना शाळेबाहेरील स्पर्धांना प्रेक्षक म्हणून किंवा स्पर्धक म्हणून सातत्याने नेण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला, तेव्हा अनेकजणांमध्ये सकारात्मक बदल दिसू लागला.
माझ्या मुलाचे अकरावीचे जीवशास्त्राचे शिक्षक काळेबाग सर, यांचंही उदाहरण मला आवर्जून द्यायला आवडेल. दहावीपर्यंत मला जीवशास्त्र आवडतंच नाही, असं म्हणणारा माझा मुलगा आज वैद्यकशास्त्रातलं पदव्रुत्तर शिक्षण घेतो आहे. यात सरांनी स्मार्टपणे वापरलेली अध्यापन पद्धती आहे. त्यांची अध्यापन पद्धती खूप आकर्षक होतीच आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतंही पुस्तक हातात न घेता ते शिकवत असत. तसंच विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ते कुठेही देत असत अगदी व्हरांड्यातही.
थोडक्यात काय तर कळ्या उमलून सुंदर फुलं फुलायला हवीत ठिबकसिंचन खुबीने वापरायला हवं हेच खरं.
- मेघना जोशी